Friday, September 17, 2010

प्रधान सचिवांना दंड


कोणत्याही गुन्हेगारावर काय आरोप ठेवण्यात आला आहे व तो का? त्या गुन्ह्याची शिक्षा काय आहे? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. त्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणार्‍या शासकीय यंत्रणेवरसुद्धा कारवाई होऊ शकते. पण महाराष्ट्र शसन दिवसेंदिवस अधिक संवेदनशून्य होत आहे. त्या संवेदनशून्यतेच्या परिणामाला राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांना सामोरे जावे लागले. मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेचा निकाल देताना त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या एका व्यक्तीला स्थानबद्ध केले गेले. ती कारवाई का केली, अशी विचारणा संबंधिताने नियमानुसार अर्ज करून केली होती. अर्जाला उत्तरच मिळाले नाही म्हणून हायकोर्टात याचिका दाखल झाली. संबंधित विभागाचे प्रशासनप्रमुख म्हणून थेट प्रधान सचिवांना कोर्टाने जबाबदार धरले. ठोठावलेला दंड व्यक्तिगत स्वरुपात भरण्याचाही आदेश दिला. प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांच्या घराण्याला तीन पिढ्यांचा राजकीय वारसा आहे. कारभारात सध्या वाढलेल्या बेशिस्तीला नोकरशाहीइतकेच राजकीय नेतेसुद्धा जबाबदार आहेत, असा जनतेचा समज आहे. तो कितपत योग्य आहे, याचे खरे उत्तर कुणीच देऊ इच्छित नाही. बेजबाबदारपणाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याकडेच संबंधितांचा कल असतो. तथापि कारभारातील बेपर्वाईचे चटके मात्र सामान्य जनतेलाच बसत असतात. ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या त्यांच्या अवस्थेत दिवसेंदिवस भरच पडत आहे, हे वास्तव कसे नाकारणार? प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निकाल स्वागतार्ह खरा; पण गोमेचा एक पाय मोडल्याने गोम पांगळी होत नाही म्हणतात तशी आपल्या राज्याच्या प्रशासन यंत्रणेची परिस्थिती आहे. अगदी तालुकापताळीवरील कोणत्याही कार्यालयाची झाडाझडती घेतली तर अकारण अडवून व अनुत्तरित ठेवलेली हजारो प्रकरणे उघडकीस येतील. प्रत्येक गुन्ह्यात या प्रकारे दंड ठोठावला तर राज्याच्या पंचवार्षिक योजनेसाठी कुठल्याही कराची तरतूद लागणार नाही. हा दंड भरला जाईल किंवा त्याविरुद्ध अपील दाखल होऊन अनेक वर्षे प्रकरण प्रलंबित राहील. कधीकाळी उत्कृष्ट प्रशासनासाठी नावाजलेल्या महाराष्ट्राच्या या दुर्गतीची कुणाला चाड आहे?

Friday, September 3, 2010

गोदावरी प्रदूषणाचे गुन्हेगार कोण?




(सविस्तर वाचा पिपल्स पॉलिटीक्स च्या सप्टेंबर 2010 च्या अंकात)




दर एक तपानंतर गोदावरी काठावर होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे देव तथा संतभूमी त्र्यंबकेश्वर आणि मंदिरांची पवित्र भूमी नाशिक हे जगप्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे गोदावरीचे अस्तित्त्व आकुंचित होत असून, विविध कारणांमुळे प्रदूषित होणारे पाणी हे वापराच्या लायकसुद्धा नाही. माशांचा मृत्यू आणि पात्रात फोफावणार्‍या पाणवेलींच्या समस्येमुळे गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेच्या ऐरणीवर आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा देखावा त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असतात. थातूर- मातूर कारवाई आणि चिल्लर स्वरुपातील स्वच्छता मोहीम अशा पत्रकबाजीत गोदावरी प्रदूषणाचे खरे गुन्हेगार मात्र बाजूला पडत आहेत....
गरूड पुराणात सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाचे महात्म्य स्पष्ट केले आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या अमृतकुंभातील अमृताचे काही थेंब धम्मगिरी पर्वतराजीच्या परिसरातून उगम पावणार्‍या गोदावरी काठावर वसलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात आणि नाशिक महानगरीतील रामकुंडात पडल्याचा उल्लेख या पुराणात आहे. या दोन्ही ठिकाणी दर 12 वर्षांनी साधू-संतांचा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यामुळे त्र्यंबकेश्वर आणि नाशिककडे तपोभूमी म्हणून पाहिले जाते. गोदावरीच्या अस्तित्वामुळे अनेक शहरे, गावे पावन होतात. पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी, विविध प्रकारच्या रोजगार- उद्योगांची संधी यामुळे गोदावरी या भागाची जीवनदायनी ठरते. तिला दक्षिणगंगा असेही संबोधतात.
नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यानचे अंतर साधारणत: 28 किलोमीटर आहे. नाशिक महानगराची लोकसंख्या 18 लाखांच्या आसपास आहे. त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी गोदावरी नाशकातून किमान 18 किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. प्रत्येक नाशिककराचा आणि वर्षभरात येथे लाखोंच्या संख्येत येणार्‍या भाविक, पर्यटकांचा कधीना कधी गोदावरीशी संबंध येतोच.
नाशिकची पाणीपुरवठा व्यवस्था गोदावरीवर अवलंबून आहे. नाशिक परिसरातील शेती सिंचन, उद्योग- व्यवसायासाठी लागणारे पाणी गोदावरीतूनच मिळते. पर्यटनाचा व्यवसाय गोदावरीशी संबंधित परिसरातच फुलतो. नाशिक महानगराचे सौंदर्य गोदाघाटामुळे वाढते. पोथी-पुराणातील गोदावरी महात्म्यपेक्षा गोदावरीचे हे महत्त्व त्रिकाल अबाधित आहे.
कधीकाळी धम्मगिरीच्या पर्वतराजीतून अवखळपणे वाहत येणारी गोदावरी सोमेश्वरपासून शांत- शीतल होत जाते. नाशिक महानगर परिसरात ती अगदी स्थितप्रज्ञ झाल्यासारखी असते. गोदावरी कधीही क्रौर्याने कोपत नाही. पावसाळ्यात संतापली तरी तिचा पूर हा पात्राच्या आवाक्यात असतो. लवकर नियंत्रितही होतो.
गेल्या काही वर्षांत गोदावरीला आकुंचित आणि प्रदूषित करण्याचा अप्रत्यक्ष अपराध विविध प्रकारच्या समाज व शासकीय घटकांकडून होत आहे. काही ठिकाणी ते अनावधानाने घडते आहे तर काही ठिकाणी जाणूनबुजून केले जात आहे. ज्यांनी हे रोखायला हवे त्या संस्था (त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महानगरपिलिका) आणि यंत्रणा (प्रदूषण नियंत्रण महामंडळ) डोळ्यांवर झापडे पांघरून गप्प आहेत.
केंद्र शासनाच्या मध्यवर्ती प्रदूषण नियंत्रण मंडळाचा महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रदूषणाविषयीचा एक अहवाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. त्यात सर्वाधिक प्रदूषित आढळलेल्या नद्यांच्या यादीत गोदावरीचे नाव तिसरे आहे. याशिवाय भीमा, पवना, पंचगंगा, पाताळगंगा, इंद्रायणी, कोयना, कुंडलिका, तापी, गिरणा, वैतरणा, निरा, कृष्णा, पूर्णा, चंद्रभागा, वेण्णा, रंगावली आणि भातसा या नद्या प्रदूषित झाल्याचे सुस्पष्ट मत नोंदविले आहे.
काठावरील कारखाने, साखर कारखाने, सांडपाणी यामुळेे या सर्व नद्यांचे स्रोत प्रदूषित झाल्याचा सविस्तर उल्लेख अहवालात आहे. हा एकमेव अहवाल म्हणजे गोदावरीच्या प्रदूषणाचा दस्तावेज नाही. यापूर्वी किमान 50 वेगवगेळ्या प्रकारच्या अभ्यास गटांनी गोदावरीचे प्रदूषण या विषयावर स्वतंत्रपणे अहवाल तयार केले आहेत. प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनाही सांगितल्या आहेत, मात्र प्रदूषित गोदावरी हे नाशिक शहरासाठी कोट्यवधींचा निधी मिळविण्याचे एक लेखाशीर्ष तयार झाल्यामुळे महानगरपालिकेसाठी गोदावरी ही पैशांची दुभती गाय झालेली आहे. गोदावरी पात्राशी संबंधित अनेक कामांचे ठेके घेण्यामुळे ठाराविक नगरसेवकांची आणि ठेकेदारांचीे पिढीजात पैसा कमावण्याची सोय झाली आहे. गोदावरीची संभाव्य पूररेषा हासुद्धा सर्वसामान्य लोकांना धमकावण्याचा आणि पूररेषेतून घर, जमीन, भूखंड वगळण्याचा नवा धंदा महापालिका अधिकारी तथा पदाधिकार्‍यांना मिळाला आहे.
गोदावरीच्या प्रदूषणाचा विषय त्र्यंबकेश्वर आणि नाशिक महानगर अशा दोन्ही ठिकाणी चर्चेत आहे. यापैकी त्र्यंबक हे तिच्या उगमाचे स्थान. तेथे गोदावरी गावातूनच वाहते. त्यामुळे तिच्या प्रवाहावर ढापे टाकण्यात आले आहेत. उगमाचे ठिकाण छोटे असल्यामुळे गावातील सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थाही गोदावरी पात्रात सोडण्यात आली आहे. अशा स्थितीत उगमाच्या ठिकाणीच गोदावरीचा श्‍वास कोंडलेला दिसतो.
त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थ असून, तेथेच धार्मिक विधी केले जातात. या कुंडाजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने जलशुद्धीकरण यंत्रणा तयार केली होती. कुंभमेळ्यानिमित्त मिळालेल्या सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीत हे काम झाले होते. सध्या ही यंत्रणा बंद आहे. त्र्यंबकची अर्थव्यवस्था पूर्णत: गोदावरीवरच अवलंबून आहे. बाराही महिने तेथे भाविकांची रीघ असते. तेथील नगरपालिकेच्या खर्चाच्या काही मर्यादा आहेत. शिवाय तेथील पुरोहित संघही फार काही करू शकत नाही. गोदावरीच्या महात्म्यामुळे येणारा भाविकांचा व पर्यटकांचा पैसा सर्वांना हवा आहे, मात्र गोदावरीच्या संवर्धन किंवा संरक्षणासाठी कोणीही पदरचे पैसे खर्च करण्यास तयार नाही, असे चित्र आहे. जे काही द्यायचे ते शासनानेच द्यावे, असे प्रत्येकाला वाटते.
त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या गोदावरीचे अस्तित्व सांडपाणी, मलयुक्त पाणी, कचरायुक्त पाणी असेच आहे. पितरांच्या मुक्तीसाठी गोदावरीच्या पवित्र प्रवाहात पिंडदान करण्याच्या अपेक्षेन येणार्‍या भाविकांचा त्यामुळेे हिरमोडच होतो.
गोदावरीच्या प्रदूषणाची नाशिक परिसरातील कहाणी यापेक्षा वेगळी नाही. पावसाळ्यापूर्वी गोदावरी विविध कारणांमुळे प्रदूषित असते. तर पावसाळ्यात पाणवेलींच्या वाढीमुळे अदृश्य झालेली असते.


----

Thursday, September 2, 2010

माहिती आयुक्त की कारकून ?


माहितीच्या अधिकारात माहिती देण्याचे नाकारणार्‍या, विलंब करणार्‍या किंवा चुकीची माहिती देऊन कालापव्यय करणार्‍या राज्यातल्या 347 सरकारी सेवक व अधिकार्‍यांना 26 लाख 57 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती राज्याचे माहिती आयुक्त सुरेश जोशी यांनी दिली. स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची या जोशीबुवांना दांडगी हौस! माहिती आयुक्त म्हणजे काय एखादा वसुली कारकून आहे? माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची व त्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सेवानिवृत्त अधिकार्‍यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग होईल, या कल्पनेने माहिती आयुक्तपद निर्माण केले गेले. महाराष्ट्र हे म्हणे देशातले सर्वात प्रगत राज्य! त्यांना या जबाबदारीसाठी जोशीबुवांसारखा हौशी पर्यटक चक्क सापडला! सरकारी सेवेत जनतेच्या तक्रारी आणि गार्‍हाण्यांबद्दल बहुतेक अधिकारी मुद्दाम बहिरेपण पत्करतात. जोशीबुवांवर त्याबाबतीत निसर्गाचीच कृपा आहे. पत्रकारांबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. जोशीबुवा बोलतील तेच पत्रकारांनी ऐकावे आणि न ऐकणार्‍या जोशीबुवांच्या कार्यक्षमतेची प्रसिद्धी करीत राहावे हीच त्यांची अपेक्षा असावी. त्यांचे देश-विदेशातील पर्यटनसुद्धा संशयास्पद ठरते. माहिती अधिकाराबद्दल जनतेला शक्यतो माहिती न देणे, द्यावीच लागली तर कमीत कमी देणे किंवा नको त्या कागदपत्रांचा भडिमार करणे अशी जनतेची दिशाभूल करण्याचे हजारो किस्से जोशीबुवांच्या दप्तरी दाखल आहेत. त्याबद्दल माहिती देण्याचे हा माहिती आयुक्त कटाक्षाने टाळतो. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हटल्या जाणार्‍या राज्यातही माहिती कायद्याचा अंमल आणि माहिती आयुक्तांचा कारभार अत्यंत असमाधानकारक आहे. त्या कारभाराची चौकशी झाल्यास कदाचित जोशी महाशयांचे नाव माहिती न देण्याबद्दल दंड भरणार्‍यांच्या यादीत पहिलेही असू शकेल.

Sunday, August 29, 2010

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा




त्र्यंबकेश्‍वरला श्रावणातील तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मतगरी प्रदक्षिणेला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी एकलाखावर भाविक या खडतर प्रदक्षिणेत सहभागी होतात.
श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी बाविक गर्दी करतात. पुण्यदायी, मोक्षाकडे सन्मार्गाकडे नेणारी प्रदक्षिणा म्हणून बाविकांचा समज आहे. ‘भोलेहरऽऽऽ’च्या जयघोषाने त्र्यंबक परिसर दुमदुमला जातो. दरवर्षी सुमारे लाखावर भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही प्रदक्षिणा करण्याची परंपरा अतिप्राचीन आहे. सातशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तीनाथ महाराज व संत ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्तबाई यांनी प्रदक्षिणा करून जगाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सन्मार्ग सांगितला. त्याच मार्गाने आजही जनतेची वाटचाल सुरू आहे.
या प्रदक्षिणेत वृद्धांचा मोठा सहभाग असतो. यात सहभागी होणारे 75 टक्के भाविक असले तरी 25 टक्के मंडळी सहल म्हणून प्रदक्षिणा करतात. 80 टक्के भाविक नेहमी येणारे असतात तर तर 20 टक्के भाविक दरवर्षी नव्याने येतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पंचलिंग पट्ट्यात पर्वतराज ब्रह्मगिरी असून या पर्वतावरुनच पवित्र गोदामाईचा उगम झाला आहे. पंचलिंग डोंगरातून पाच नद्यांचा उगम झाला आहे. यात अहिल्या, गोदावरी, त्र्यंबकेश्‍वरी संगम घाटात दृष्टीत पडतात तर बाणगंगा वैतरणा यांचा संगम धाडोशीनजीक गणपती मंदिराजवळ दृष्टीस पडतो. येथे स्नान करून प्रदक्षिणार्थी पुढची वाटचाल करतात.
गोदावरीने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले. पंचनद्यांनी इगतपुरी पट्टा हरित केला. वैतरणा नदी, धरण मुंबईकरांसाठी जीवनदायी ठरली. गोहत्येचे पातक नष्ट करण्यासाठी महर्षी गौतमांनी येथे प्रदीर्घ तपश्‍चर्या केली व गंगेला शिवशंकराच्या जटेतून भूलोकी आणलेे. अशा रितीने गोदावरीचा उगम झाला. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्ताई हे चौघे भावंड प्रदक्षिणा करीत असतांना वाटेत त्यांच्या पाठीमागे वाघ लागल्याने जंगलात या भावंडांची ताटातूट झाली. संत निवृत्तीनाथ बचाव करण्यासाठी गुरू गहिनीनाथांच्या गुहेत शिरले. तिथेच संत निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दिक्षा गहिनीनाथांनी दिली. धर्माचे (आजच्या भागवत व वारकरी संप्रदाय) जनकल्याणाचे कार्य संत निवृत्तीनाथांनी केले. या पौराणिक कथेनुसार ब्रह्मगिरी प्रदक्षिणा निराकार भावनेतून करावी. परमेश्‍वर व निसर्गाशी एकरुप व्हावे. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, सर्व समाजाने एकत्र येऊन धार्मिक वृत्ती जोपासून देशचे कल्याण करावे. ही उदात्त शिकवणही प्रदक्षिणा देते. ‘त्र्यंबक महात्म्य व त्र्यंबकराज निवृत्ती विजय’ या ग्रंथात प्रदक्षिणेचे महत्त्व वर्णिलेले आहे. पेशवे काळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून उपप्रदक्षिणा घालण्यास सांगितले जात असे.
कुशावर्तावरून प्रदक्षिणेला ब्रह्ममुहूर्तावर प्रारंभ करावा. प्रयागतीर्थ, पहिणे बारी, भिलमाळ, कोजुर्ण धाडोशी गांवावरुन तेथे उजव्या हाताने वळण गौतमाचा धस (गौतमाचे मंदिर) तळेगांव धरणाजवळून नमस्कार, सापगांव शिवार, गणपत बारी, पुन्हा त्र्यंबकेश्‍वर असा छोट्या प्रदक्षिणेचा मार्ग आहे. ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत, पंचलिंंग डोंगर, गौतम धस, लग्नस्तंभ डोंगर, दुर्गा भांडार, मेटघेर किला अशा डोंगरांनाही प्रदक्षिणा होते. रामतीर्थ, बहुतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, भागिरथी तीर्थ, अंकुर तीर्थ, भुजंग तीर्थ, नरसिंहतीर्थ इ. तीर्थ मंदिरे प्रदक्षिणा मार्गात लागतात व हे अंतर 24 कोसाचे आहे. धाडोशीच्या नवीन पुलावरुन अथवा सामुंडी गावावरुन मासळी घाट, हर्षेवाडी डोंगर, यात हरीहर डोंगर किल्ला यात नागमोडी रडकुंडी यामार्गावर मोठी प्रदक्षिणा केली जाते.
हरीहर पायथ्यानजीक मोठे सरोवर आहे. पुढे लेकुरवाळी देवीपर्यंत यावे लागते. या प्रदक्षिणा मार्गात विविध 108 तीर्थ लागतात. शेवाळावरुन चालणे, नितळ थंड पाण्यात स्नान करणे, धुक्यात वाटचाल तर नागमोडी व रडकुंडी येथे विषववृत्तीय जंगलाची अनुभूती, सूर्यदर्शन जवळपास नाही, अशा अवर्णनीय वातावरणात मोठी प्रदक्षिणा करण्यात येते. यासाठी गाईड अथवा जाणकार सोबत हवा. निसर्ग फेरी करा, निसर्गाशी एकरुप व्हा व ईश्‍वराचे लाभ स्मरण करून जीवन समृद्ध करा अशी शिकवण या प्रदक्षिणेतून मिळते. हर हर गंगे ऽऽऽ असा गगनभेदी जयघोष मोठ्या प्रदक्षिणेत केला जातो. ही प्रदक्षिणा करताना तुमच्या सादाला निसर्ग प्रतिसाद देतो याचा अनुभव येईल.

Wednesday, August 25, 2010

काश्मिरातील उलटे वारे !


काश्मिरात फुटीरतावाद्यांनी उच्छाद मांडला आहे. पाकिस्तानच्या अप्रत्यक्ष चितावणी व पैशांच्या पुरवठ्यावर या मंडळींनी काश्मिरी जनतेला वेठीस धरले आहे. रोज हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, बंद यामुळे तेथील सर्वसामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. कोणत्याही अन्यायकारक दडपशाहीचा चिमटा जेव्हा सामान्य लोकांच्या पोटाला पीळ टाकतोे तेव्हा तेथे बंडखोरीची ठिणगी पेट घेते. काश्मिरमध्ये आता हे घडू लागले असून सर्वसामान्यांच्या मनांत बंडखोरीची ठिणगी पेटली आहे. गेल्या दोन- तीन महिन्यांपासून फुटीरतावाद्यांनी लादलेल्या अन्यायाच्याविरोधात तेथील स्थानिक लोक फुटीरतावाद्यांवर दगडफेक करु लागले असून त्यांच्या समर्थकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्यादही दाखल होवू लागल्या आहेत. काश्मिरमधील हे वारे उलटे वाहू लागले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या गेल्या 63 वर्षांमध्ये काश्मिरीजनतेची सातत्याने होरपळ होते आहे. आम्ही काश्मिरी, आम्ही भारतीय, आम्ही पाकिस्तानचे समर्थक, आम्ही स्वायत्त की आम्ही कोणीच नाही असे स्वत्त्वाविषयीचे अनेक प्रश्‍न काश्मिरी जनतेला भेडसावत आहेत. आतापर्यंत पाकिस्तानच्या चिथावणीवर फुटीरतावाद्यांनी काश्मिरची राखरांगोळी करण्यातच धन्यता मांडली. कुठे हल्ला, कुठे घुसखोरी, कुठे गोळीबार, कुठे स्फोट असा प्रकारांनी काश्मिरची होरपळ होतेच आहे. या सार्‍या प्रकाराकडे काश्मिरी जनताही तस्थपणेच पाहात राहीली. अन्यायाविरुद्ध गप्प राहणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अन्याय करणार्‍याचे किंवा त्याच्या विचारांचे समर्थन करणे हेही व्यावहारीक सूत्र आहे. पाकिस्तान त्याचाच लाभ घेत काश्मिरमधील मुठभर फुटीरांच्या संघर्षांला स्थानिकांचाच लढा असे म्हणत आला आहे. आंतराष्ट्रीय जन सुदायासमोरही तशी मखलाशी त्याने वारंवार केली आहे. काश्मिरीजनतेने आजपर्यंत कधीही उडपणे फुटीतरवाद्यांना विरोध केला नाही किंवा त्यांच्या मागण्यांना समर्थनही दिलेले नाही. काश्मिरीजनतेला स्वायत्तताही हवी की नको हा विषय गुलदस्त्यात आहे. अर्थात या मागे भारत सरकारचे काश्मिरबाबत धरसोड धोरण हेही कारणीभूत आहे. मंगळवारी काश्मिरात घडलेल्या काही घटनांनी मात्र यिोग्य प्रकारे योग्य प्रकारे फुटीरतावाद्यांना खोर्‍यातून पिटाळून लावण्याचा निर्धार केलेला दिसत आहे. काश्मिर खोरे बंद करण्याचा प्रकत्न करणार्‍या फुटीरतावाद्यांवर तेथील दुकानदार व सामान्य जनतेने दगडफेक केली. एवढेच नव्हेतर काही फुटीरतावाद्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदविला. काश्मिरीजनतेच्या या बदलत्या मानसिकतेला विधायक सहकार्याची जोड तेथील राज्य प्रशासन, सुरक्षा दल आणि केंंद्रीय प्रशासनाने द्यायला हवी. यापूर्वीही काश्मिरातील धाडसी महिलांनी घरात घुसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेले आहे. अशा बाबींचा योग्य प्रकारे लाभ उठवीत भारताच्या नंदनवनात शांतता व सुव्यस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काश्मिरीजनतेचा पाठींबा हवा असेल तर आता तेथे फुटीरतावाद्यांच्या विरोधातील हातांना केंद्र सरकारच्या मदतीचा हात मिळायला हवा.

Tuesday, August 24, 2010

मंगळागौरीचे व्रत


श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.असे करतात मंगळागौरीचे व्रत:- आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते. ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. जागरणाची धमाल:- फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.
श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.असे करतात मंगळागौरीचे व्रत:- आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते. ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. जागरणाची धमाल:- फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.



















































Friday, August 20, 2010

चला त्र्यंबकेश्वरला !!


श्रावणाचा महिना. अधुनमधून पडणार्‍या सरी. मध्येच ढगाआडून डोकावणारा सूर्य. सह्याद्रीनेे लपेटलेला हिरवा शालू. पावसामुळे न्हाऊन निघालेल्या वृक्षांना आलेली नवी पालवी- तजेली. डोंगराच्या उतारावरून खळाळणारे झरे, दरीत कोेसळणारे धबधबे. अशा प्रसन्न आणि रोमांचित करणार्‍या वातावरणात छोटा ट्रेक आणि जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर चला त्र्यंबकेश्वरला. सध्या येथे मस्त माहौल आहे...
नाशिकची थंडी, नाशिकचा पाऊस कधीतरी अनुभवावा. इगतपुरी घोटी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचे घुमशान काय असते ? हे अनुभवता येते. धुवांधार कोसळणारा पाऊस. सात- आठ हजार फुट उंचावरील डोंगरांच्या रांगा. बाष्ष घेऊन जाणारे काळे ढग. त्यात भटकंती करतानाच ओले होणारे कपडे. हे सारे सारे वेगळ्याच विश्वात नेणारे. त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी असो की अंजेनेरीचा अंजनीगड. तेथून परतावे असे वाटतच नाही. बहुधा स्वर्ग असावा तर तो असाच...
त्र्यंबकेश्वर... ब्रह्मा- विष्णू- महेशाच्या निवासाचे स्थान. संतांची भूमी. निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीस्थळ. कुंभमेळ्याचे पवित्र स्थान. विविध साधू- महंतांच्या आखाड्याचे स्थान. असे काय काय वर्णन करावे ?
नाशिकपासून अवघ्या 28 किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर आहे. (नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून 38 किलोमीटरवर) येथे 12 पैकी एक असलेले त्रंबकेश्वराचे ज्योतिलिर्ंंग आहे. त्यात ब्रह्मा- विष्णू- महेशाचे रुप पाहात येते. महेशाचे हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. तेथे दिवसातून 4 वेळा पूजा केली जाते.
येथे पवित्र कुशावर्त तीर्थ आहे. समुद्र मंथनाच्यानंतर निघालेल्या अमृत कुंभातील अमृताचे काही थेंब या कुंडात पडल्याच्या अख्यायिका आहेत. त्यामुळेच येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याच्या शाहीस्नान पर्वणीच्यावेळी येते भल्या पहाटे सशस्र नागा साधुंच्या मिरवणुका निघतात. पवित्र दक्षिणगंगा तथा गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर परिसरात होतो. तेथून ती नाशिककडे वाहते. येथे गोदावरी- अहिल्यानदीचा संगम आहे. तेथे कालसर्प योेगाशी संबंधित नारायण नागबळी विधी होतात.
त्र्यंबकेश्वर परिसरात भटकंतीच्या अनेक जागा आहेत. ब्रह्मगिरीचे फेरी हा स्वर्गिय आनंद देणारा प्रकार. गंगाद्वार, बिल्व तीर्थ, गौतम तीर्थ, इंद्र तीर्थ, अहिल्या संगम, नील पर्वत, निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर येथे आहेत. येथे डोंगर प्रदक्षिणेचे दोन मार्ग आहेत एक ब्रम्हगिराली प्रदक्षिणा आणि दुसरी हरिहरगिरीला प्रक्षिणा.
जाणार कसे ?
विमानाने - नाशिकचे विमानतळ (तेथून त्र्यंबकेश्वर 39 किलोमीटर)
रेल्वेने - नाशिकरोड रेल्वेस्थानक (तेथून त्र्यंबकेश्वर 38 किलोमीटर)
रस्त्याने -मुंबई- त्र्यंबकेश्वर 180 किलोमीटर, पुणे- त्र्यंबकेश्वर 200 किलेमीटर
निवास - नाशिकला मुक्कामासाठी चांगल्या हॉटेल्स आहेत. धर्मशाळांमध्येही उत्तम व्यवस्ता होते.

पोरचेष्टांचे बक्षीस


भारतीय संसदीय कार्यप्रणालीचे आधारस्तंभ असलेल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचे दारिद्रय एका फटक्यात दूर करणारा ऐतिहासीक निर्णय शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. खासदारांचे दरमहा वेतन आता 16 हजार ऐवजी 50 हजार रुपये झाले आहे. याशिवाय इतर भत्तेही वाढले आहेत.


या सार्‍या वेतनवाढीची एकत्रित बेरीज केल्यास ती 300 पट होते. स्वतंत्र भारतात आजपर्यंत एवढी वेतनवाढ कोणत्याही कामगार, कर्मचारी किंवा लोकसेवकांना मिळालेली नाही. खासदारांचे वेतन वाढविण्यावर गेल्या कित्येकवर्षानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले होते. गेल्या आठ महिन्यांपासून महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत असून सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. त्याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष नाही मात्र, महागाईची झळ खासदारांना सोसवेना म्हणून वेतनवाढ करण्यावर सार्‍यांचे एकमत झाले. खासदारांची वेतनवाढ 80 हजार करण्याची शिफारस संसदीय समितीने मंत्रीमंडळाकडे केली होती. एवढी वेतनवाढ करण्यास मंत्रिमंडळाने विरोध करून ती 50 हजार रुपयांवर आणली. अखेर सभागृहात त्यानुसार ठराव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूरही झाला. येथे विरोधकांनी ओंगळवाणे प्रदशर्र्न करीत वेतनवाढ 80 हजार रुपये करण्याची मागणी लावून धरली. ती सत्ताधारी गटाने फेटाळून कामकाज गुंडाळले. त्यानंतर संपूर्ण जगाने भारतीय संसदेतील पोरकट चाळे पाहिले. उत्तरप्रदेश, बिहार किंवा मध्यप्रदेशात नौटंकी हा करमणूक प्रधान कार्यक्रम लोककलावंत सादर करतात. तशीच नौटंकी लोकसभेच्या सभागृहात रंगली. लहान मुले डॉक्टर- डॉक्टर किंवा चोर- पोलिस असा लुटूपुटू खेळ खेळतात. तसा खेळ लालुप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव व गोपिनाथ मुंडे यांनी खेळला. खासदारांचे वेतन 60 हजार ऐवजी 80,001 करावे या मागणीसाठी या तिघांच्या नेतृत्वात पीएम- स्पिकर खेळ मांडण्यात आला. औटघटकेचे पंतप्रधानपद लालुंनी स्विकारले, मुंडे स्पिकर झाले तर मुलायम सल्लागार. या प्रती सरकाने मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकार बरखास्त केले आणि आपल्या अधिकारात खासदारांची वेतनवाढ मंजुरीचा ठराव टाकला. एखाद्या साखर काखानास्थळी किंवा सहकारी संस्थेत वार्षिक किंवा विशेष सभा आटोपती घेतल्यानंतर मूठभर विरोधक प्रती सभा घेण्याचा जसा घोळ घालतात अगदी तसाच हा पोरखेळ रंगला. विरोधकांनी महागाईत होरपळणार्‍या सर्वसामान्यांचा विचार करुन वेतनववाढीली विरोधाची भूमिका घ्यायला हवी होती. तसे न करता त्यांनी स्वार्थासाठी संसदेचे सभागृह वापरले. दारिद्रय रेषेखालील भारताची 40 टक्के लोकसंख्या असहाय्यपणे ही नौटंकी पााहत होती. खासदारांचं बेसिक 16 हजारांवरून एकदम 50 हजार रुपये झाले आहे. तरी सुद्धा गरीब नाशुष असल्याचे विदारक दृश्य दिसत होते. केंद्रीय सेवेतील सचिवापेक्षा जास्त वेतनवाढ हवी अशी मागणी करणार्‍या खासदारांच्या कामगगिरीच्या मुल्यमापनाच्या निकषावर मात्र कोणीही बोलले नाही. किती खासदार चर्चेत भाग घेत नाहीत, किती मौनी आहेत, किती जण केवळ भत्ते घेतात अशा प्राथमिक प्रश्‍नांचा ऊहापोह कोणीही केला. लोकशाहीच्या नावाने सार्‍यांनी स्वत:चे चांगभले केले. खासदारांच्या कार्यालयीन खर्चासाठी आता दरमहा 20 हजाराऐवजी 40 हजार रुपये दिले जाणार आहेत. खासदारांना वाहन खरेदीसाठी आत्तापर्यंत अल्प व्याजदराने 1 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जात होते , ते आता 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. खासदारांना सरकारी कामासाठी प्रवास करावा लागला तर त्यांना 16 रुपये प्रती किलोमीटरनुसार भत्ता दिला जाईल. सध्या तो 13 रुपये प्रती किलोमीटर आहे. खासदारांच्या पत्नीवरही सरकार प्रसन्न झाले आहे. त्यांना फर्स्ट क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासने कुठेही कितीही मोफत प्रवास करता येणार आहे. सेवानिवृत्ती वेतनातही तब्बल 12 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या दरमहा 8 हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन दिलं जाते. ते 20 हजारावर जाणार आहे. ही आकडेवारी पाहता कोण म्हणेल भारताची लाकेशाही व अर्थव्यवस्था दुबळी आहे ?महिन्यांपासून महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत असून सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. त्याकडे सत्तााधारी आणि विरोधकांचे लक्ष नाही मात्र, महागाईची झळ खासदारांना सोसवेना म्हणून वेतनवाढ करण्यावर सार्‍यांचे एकमत झाले. खासदारांची वेतनवाढ 80 हजार करण्याची शिफारस संसदीय समितीने मंत्रीमंडळाकडे केली होती. एवढी वेतनवाढ करण्यास मंत्रिमंडळाने विरोध करून ती 50 हजार रुपयांवर आणली. अखेर सभागृहात त्यानुसार ठराव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूरही झाला. येथे विरोधकांनी ओंगळवाणे प्रदशर्र्न करीत वेतनवाढ 80 हजार रुपये करण्याची मागणी लावून धरली. ती सत्ताधारी गटाने फेटाळून कामकाज गुंडाळले. त्यानंतर संपूर्ण जगाने भारतीय संसदेतील पोरकट चाळे पाहिले. उत्तरप्रदेश, बिहार किंवा मध्यप्रदेशात नौटंकी हा करमणूक प्रधान कार्यक्रम लोककलावंत सादर करतात. तशीच नौटंकी लोकसभेच्या सभागृहात रंगली. लहान मुले डॉक्टर- डॉक्टर किंवा चोर- पोलिस असा लुटूपुटू खेळ खेळतात. तसा खेळ लालुप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव व गोपिनाथ मुंडे यांनी खेळला. खासदारांचे वेतन 60 हजार ऐवजी 80,001 करावे या मागणीसाठी या तिघांच्या नेतृत्वात पीएम- स्पिकर खेळ मांडण्यात आला. औटघटकेचे पंंतप्रधानपद लालुंनी स्विकारले, मुंडे स्पिकर झाले तर मुलायम सल्लागार. या प्रती सरकाने मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकार बरखास्त केले आणि आपल्या अधिकारात खासदारांची वेतनवाढ मंजुरीचा ठराव टाकला. एखाद्या साखर काखानास्थळी किंवा सहकारी संस्थेत वार्षिक किंवा विशेष सभा आटोपती घेतल्यानंतर मूठभर विरोधक प्रती सभा घेण्याचा जसा घोळ घालतात अगदी तसाच हा पोरखेळ रंगला. विरोधकांनी महागाईत होरपळणार्‍या सर्वसामान्यांचा विचार करुन वेतनववाढीली विरोधाची भूमिका घ्यायला हवी होती. तसे न करता त्यांनी स्वार्थासाठी संसदेचे सभागृह वापरले. दारिद्रय रेषेखालील भारताची 40 टक्के लोकसंख्या असहाय्यपणे ही नौटंकी पााहत होती. खासदारांचं ‘बेसिक’ 16 हजारांवरून एकदम 50 हजार रुपये झाले आहे. तरी सुद्धा ‘गरीब’ नाशुष असल्याचे विदारक दृश्य दिसत होते. केंद्रीय सेवेतील सचिवापेक्षा जास्त वेतनवाढ हवी अशी मागणी करणार्‍या खासदारांच्या कामगगिरीच्या मुल्यमापनाच्या निकषावर मात्र कोेेणीही बोलले नाही. किती खासदार चर्चेत भाग घेत नाहीत, किती मौनी आहेत, किती जण केवळ भत्ते घेतात अशा प्राथमिक प्रश्‍नांचा ऊहापोह कोणीही केला. लोकशाहीच्या नावाने सार्‍यांनी स्वत:चे चांगभले केले. खासदारांच्या कार्यालयीन खर्चासाठी आता दरमहा 20 हजाराऐवजी 40 हजार रुपये दिले जाणार आहेत. खासदारांना वाहन खरेदीसाठी आत्तापर्यंत अल्प व्याजदराने 1 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जात होेते , ते आता 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. खासदारांना सरकारी कामासाठी प्रवास करावा लागला तर त्यांना 16 रुपये प्रती किलोमीटरनुसार भत्ता दिला जाईल. सध्या तो 13 रुपये प्रती किलोमीटर आहे. खासदारांच्या पत्नीवरही सरकार प्रसन्न झाले आहे. त्यांना फर्स्ट क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासने कुठेही कितीही मोफत प्रवास करता येणार आहे. सेवानिवृत्ती वेतनातही तब्बल 12 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या दरमहा 8 हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन दिलं जाते. ते 20 हजारावर जाणार आहे. ही आकडेवारी पाहता कोण म्हणेल भारताची लाकेशाही व अर्थव्यवस्था दुबळी आहे ?

Monday, August 2, 2010

राष्ट्रकुलचा महाघोटाळा

आयपीएलच्या पाठोपाठ राष्ट्रकुल क्रीडा संयोजन समितीने विविध 16 स्टेडियमच्या बांधकामातील घोटाळे उघड केले आहेत. अलीकडे भारतीय खेळाडू विविध खेळ आणि मैदाने गाजवत आहेत. क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मात्र जमेल ते ओरबाडण्यात गुंतले आहेत. 72 देशांचा सहभाग असलेल्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांच्या प्रतिनिधींनी स्टेडियमच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर भारतात होणार्‍या घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. नंतर स्टेडियमची कामे रेंगाळल्याची चर्चा होती. आता केंद्रीय दक्षता आयोगानेच स्टेडियमच्या बांधकामातील महाघोटाळ्याची तक्रार क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. प्रसार माध्यमांनी त्यातील गंभीर गैरप्रकार चव्हाट्यावर आणले. या घोटाळ्याचे धागे-दोरे बरेच खोलवर पोहोचले असावेत. संयोजन समितीचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी त्याबद्दल इन्कार केला खरा, पण त्या इन्काराचे पोकळपण पत्रकारांना त्यांच्या चेहर्‍यावर वाचता आले. 655 कोटी रुपये खर्चाचा मूळ आराखडा आता बेहिशेब वाढला आहे. आजवर 24 हजार कोटींहून जास्त खर्च झाला आहे. काही कामे अजून पूर्ण नाहीत. जी पूर्ण झाली ती समाधानकारक नाहीत. लाखो पाऊंडांच्या रकमा परकीय चलनात विदेशातील काही व्यक्तींच्या खासगी कंपन्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत. त्याबद्दलचे कसलेही कागद किंवा करारपत्र उपलब्ध नाहीत. तशी कबुली संबंधित विदेश निवासी व्यक्तीने दूरदर्शन वाहिन्यांवर दिली आहे. लंडनमधील भारतीय वकिलातीने त्याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. तर संयोजन समितीच्या अध्यक्षांनी तेथील कारकून दर्जाच्या व्यक्तीचे नाव सांगून वेळ मारुन नेण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला आहे. यापूर्वी क्रिकेटचा आयपीएल घोटाळा उघड झाला. तो अद्याप गाजत आहे. त्या संघटनेवर ना. शरद पवार यांची हुकूमत चालते. राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्षपद खा. कलमाडींकडे आहे. दोघेही मराठी खासदार खास पुणेरी आहेत. सहाजिकच घोटाळ्यांच्या इतिहासात महाराष्ट्राचे नाव लाल शाईने लिहिले जाईल. पेशवाईनंतर पुण्याची दुष्कीर्ती जगात घोटाळ्यांनी अजरामर करण्याचा मान यानिमित्ताने दोन बाजीरावांना मिळू पहात आहे. संपत्तीच्या मोहाने भल्याभल्यांची बुद्धी डगमगते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या क्विन बॅटन रिलेच्या सोहळ्यातही कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. यंदाच्या घोटाळ्याचे धागे-दोरेसुद्धा आत्ताच लंडनपर्यंत पोहोचले आहेत. भारतात भ्रष्टाचारापासून कोणतेही क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही. जे केंद्रीय पातळीवर दिल्लीत घडते त्याचेच ओघळ गल्लीपर्यंत झिरपत असतात. हे उबगवाणे चित्र भारताच्या महासत्ता बनण्याच्या स्वप्नाला छेद दिल्याशिवाय कसे राहील?

Friday, July 30, 2010

व्यक्तिमत्त्वांची घाऊक चोरी

संपर्काचे अतिजलद माध्यम म्हणून आतरजालाच्या दुनियेत (इंटरनेट) सोशल नेटवर्किंग झपाट्याने लोकप्रिय होत आहे. त्यासाठी फेसबुक सारखे नवा नवे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. मैत्री वाढविणे, माहितीची देवाण घेवाण करीत व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगणे अशा गरजेतून फेसबूकचा वापर वाढतो आहे. कुटुंबात, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी एकाकी असणारी मंडळी फेसबूक सारख्या सोशल नेटवकिर्ंंगमध्ये जिवाभावाचे मित्र शोधू लागले आहेत. फेसबूकवर आपले अकाऊंट असणे ही नेटिजन्ससाठी प्रतिष्ठेची बाब मानली जात आहे. पलिकडे कोण आहे, त्याची विश्‍वासार्हाता काय याचा सारासार विचार न करता केवळ संगणकाच्या पडद्यावर दिसेल तेवढ्या तुटपुंज्या माहितीवर ही मैत्री पुढे सरकत आहे. त्यातून फसवणूक, लुबाडणूक, हिरमोड होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: एकाकी महिलांना, मुलींना तसे अनुभव आले आहेत. एकप्रकारे फेसबूकचा हा आंधळा वापर होत आहे. फेसबूकचा सरसकट वापर करणार्‍यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. फेसबूकवर अकाऊंट असलेल्या जगभरातील किमान 10 कोटी लोकांची व्यक्तिगत माहिती इंटरनेटरील चोरांनी हस्तगत केली आहे. इंटरनेटवरील हेे चोर म्हणजे नेट हॅकर्स, नेट ट्रॅकर्स किंवा नेट क्रॅकर्स. इंटरनेटवर माहिती शोधण्याच्या कामासाठी सर्च इंजिन वापरावे लागते. त्यासाठी स्वत:चे अकाऊंट नोंदवावे लागते. कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविण्यासाठी मेल अकाऊंट सुरू करावे लागते. सोशल नेटवर्किंग किंवा ब्लॉग सुरू करण्यासाठी अकाऊंट सुरू करावे लागते. या अकाऊंटमध्ये आपण आपली व्यक्तीगत माहिती नाव, वय, शिक्षण, जन्म तारीख, जन्म गाव, शाळेचे नाव, व्यवसाय, नोकरी आदी माहिती भरतो. तशी ही माहिती आपल्यासाठी सर्वसाधारण असतेे. जनगणनेच्या कामासाठी आलेल्या गणकाकडेही ही माहिती आपण भरून देतो. मात्र, ही माहिती अधिकृत व्यक्तिकडे दिल्यास किंवा अधिकृत संस्थेेकडे नोंदल्यास ती गोपनिय ठेवण्याची जबाबदारी संबंधितांची असते. जनगणनेसाठी दिलेली माहिती गोपनिय ठेवण्याचे वचन केंद्र सरकारही देते. इंटरनेट वापराच्या बाबतीत ही जबाबदारी नेटवर्किंगची सुविधा देणार्‍या सर्व्हिस प्रोव्हायडरची म्हणजे फेसबूकची आहे. या सर्वसाधारण माहितीचा उपयोग नेटवरील कोणत्याही सायबर क्राईमसाठी करता येतो. छायाचित्रांचा वापर अश्‍लिल कामासाठी केला जावू शकतो. आपल्या नावाने, छायाचित्रांचा वापर करुन डमी अकाऊंट इंटरनेटवर सुरू करुन त्याच्या माध्यमातून इतरांची फसवणूक केली जावू शकते. वाईटात वाईट कल्पना केली तर आपले स्वत:चे इंटरनेवरील अकाऊंट घातपाती कारवायांंसाठीही वापरता येवू शकते. इंटरनेटवरील चोर मंडळी जशी व्यक्तीगत माहिती चोरू शकते तशी ती आपले पासवर्डही सहज मिळवू शकते. इंटरनेटचा वापर करणार्‍यांनी अशा प्रकारच्या जोखमीच्या बाजूही वेळीच समजावू घेणे आवश्यक आहे. केवळ अधर्वट माहितीवर नेटिजन्स होण्याचा प्रकार म्हणजे स्वत:ला माहिती मायाजालाच्या दुष्टचक्रात अडकवून घेणे होय. त्यामुळे इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत किंवा कौटुंंबिक माहिती नोंदविताना काळजी घ्यायला हवी. इ बँकिंगचे व्यवहार करणार्‍यांनी बंँकेचे नाव, अकाऊंट नंबर, पासवर्ड अशा आर्थिक बाबी मुळीच नोंदवू नयेत. इंटरनेवर बक्षीस, लॉटरी याबाबत भुलभुलय्या ठरणार्‍या अनेक जाहिराती किंवा संदेश येतात. त्याच्या मोहजालात अडकायला नको. इंटरनेटचा वापर जसा व्यक्तिगत आणि जनहितार्थ आहे तसाच तो सामुहिक आणि विघातकही करणारे समाजकंटक अस्तित्त्वात आहेत, याचा वेळीच विचार करायला हवा. आता इंटरनेट साक्षर होण्याचीही गरज आहे.

Thursday, July 29, 2010

विक्रमादित्य सचिन

आपण मास्टरब्लास्टर का आहोत हे सचिनने बुधवारी आणि गुरूवारी श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात खेळतांना दाखवून दिले. सचिन केवळ स्वार्थासाठी खेळतो अशी टीका त्याच्यावर होत होती. बुधवारी त्याने भारतीय संघ संकटात असतांना टिच्चून फलंदाजी केली आणि कारकिर्दीतले 48 वे शतक ठोकले. तो खेळपट्टीवर टिकला की विक्रम सहज होत असतो याचा प्रत्यय देखील आला. केवळ शतक ठोकण्याच्या इराद्याने तो खेळतो म्हणणे अनेकदा चुकीचे ठरले आहे. आदल्या दिवसाप्रमाणेच सचिनने गुरूवारी देखील टिच्चून फलंदाजी करत पाचवे द्विशतक झळकावले. त्याचे हे द्विशतक भारतीय फलंदाजांमध्ये विक्रमी ठरले. द्विशतकांच्या रांगेत श्रीलंकेचा संगकारा सात द्विशतके झळकावून अग्रस्थानी आहे. सचिन आता त्याच्यामागे दोन पावलांवर आहे. यापूर्वी मास्टरब्लास्टरनने कारकिर्दीत 1999 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध अहमदाबाद येथे पहिले द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 217 धावा केल्या होत्या. यानंतर नागमूरमध्येही त्याने झिम्बाब्वेविरूद्ध अशीच कामगिरी केली होती. 2004 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांच्याच मायदेशात द्विशतक झळकावून आपण खंडाबाहेर संयमित फलंदाजी करु शकतो हे दर्शवून दिले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके असे एक ना अनेक विक्रम या मास्टरब्लास्टरच्या नावावर आहेत. अजून किती विक्रम याच्या नावावर लागतील हे भविष्यात जरी गूढ राहणारे असले तरी मास्टरब्लास्टर लवकरच कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये शतकांचे शर्तक पूर्ण करेल हे सांगण्यास कोणत्या भविष्यवेत्याची गरज पडणार नाही. श्रीलंकेविरूद्धचा आणखी एक कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियन संघ भारत दौर्‍यावर दोन कसोटी सामने खेळणार असतांना सचिन या दोन मालिकांच्या दरम्यान नक्कीच हा विक्रम करेल. मास्टरब्लास्टरने आतापर्यंत कसोटीत 48 शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 शतके ठोकली आहेत. या दोन क्रिकेटच्या प्रारूपाची गोळाबेरीज केली होती. ती संख्या 94 वर जाते. म्हणजेच क्रिकेटच्या दोन प्रारूप मिळून सचिन शतकांचे शतकही साजरे करेल याविषयी कोणाच्याही मनात शंका नसावी.

Wednesday, July 28, 2010

महावीर जैन धर्मार्थ दवाखाना

नाशिकमधील देवधरलेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि सर्वसामान्य घटकातील रुग्णांना सेवा देण्याचा वसा गेल्या तीन दशकांपासून जपला गेला आहे. ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी आणि विविध आजारांचे 40 तज्ज्ञ डॉक्टर्स यासाठी निरपेक्ष, नि:स्वार्थीपणे काम करीत आहेत. या सर्वांच्या निष्ठांची आणि धडपडीची कहाणी...
सध्या आरोग्यसेवा दोन प्रकारात मिळते. एक सरकारी, जीचे स्वरुप बिनभरवशाचे. दुसरी खासगी, जीचे स्वरुप महागडे. समाजातील आर्थिक दुर्बल आणि सर्व सामान्य घटकाला अत्याधुनिक आरोग्यसेवेचा दर परवडेल की नाही अशी शंका वारंवार घेतली जाते. नाशिक सारख्या विस्तारणार्‍या महानगरात आता लहान- सहान आजारावर गोळ्या- इंजेक्शन देणार्‍या फॅमिली डॉक्टरांची संख्याही कमी कमी होत चालली आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा बहुविध सेवा देणार्‍या हॉस्पिटलची संख्या वाढत आहे.
अशा हिशोबी वातावरणात अजून एक आरोग्यसेवेचा दिलासादायक प्रकार दिसतो. तो म्हणजे धर्मार्थ आरोग्यसेवेचा. गेल्या 33- 34 वर्षांपासून अशा प्रकारच्या सेवेचा निष्ठेने वसा जपला आहे तो रविवारपेठेतील देवधर लेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याने.
सर्व सामान्य घटकाला अत्यंत कमी दरात आणि दारिद्रय रेषेखालील घटकांनामोफत सेवा देणार्‍या या दवाखान्यात बाह्यरुग्ण विभाग, विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा पॉलिक्लिनिक विभाग, एक्स रे विभाग, कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजिकल लॅब, सोनोग्राफी सेंटर, डेंटल केअर युनिट, लसीकरण आणि क्षयरोग निदान केंद्र आहेत. समाजातील 40 ते 45 तज्ज्ञ डॉक्टर या विभागाच्या माध्यमातून आपल्या सेवा देत आहेत. खासगी स्वरुपात मिळणारी वैद्यकीय सेवा महागडी होत असताना धर्मार्थ स्वरुपात सेवा देणार्‍या या दवाखान्याची वाटचाल निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेच्या बळावर पुढे पुढे जात आहे. अडचणी आल्या तरी त्यावर समाजातील चांगुलपणाच्या बळावर मात केली जात आहे.
या रुग्णालयाची स्थापना ही दोघा तीघांच्या जिद्दीतून झाली. कोणताही स्वार्थ न बाळगता कमी पैशांत रुग्णसेवा करण्याचा विचार त्या मागे होता. दहा- बारा जणांनी मिळून हजार हजार रुपये गोळा केले. जमलेली रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवली. तीच्या व्याजाच्या रकमेतून सेवा देणे सुरू झाले. साधारणपणे तीन दशकांपूर्वी अवघ्या दोन रुपयांत रुग्णसेवा दिली जात होती. त्यावेळी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू होता.
गरजू रुग्णांची संख्या वाढल्यानंतर इतर तज्ज्ञ डॉक्टरांची तसेच तपासण्यांची गरज भासू लागली. त्यामुळे पाचवर्षांनी पॉलिक्लिनीक विभाग (इतर तज्ज्ञसेवांचा विभाग) सुरू करण्यात आला. समाजातील काही डॉक्टरांना या विभागात सेवा देण्याची विनंती करण्यात आली. त्यापैकी अनेकांनी ती मान्य केली. मोफत नव्हे मात्र नाममात्र मानधन देवून इतर आजारांची तपासणी केली जावू लागली. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी या तपासणीचा दर होता अवघा पाच रुपये. आजही तपासणीचा दर आहे अवघा पाच रुपये. यात रुगाणाला आवश्यक ती औषधे (गोळ्या) दिली जातात. इंजेक्शनसह शुल्क आहे अवघे 15 रुपये.
आज शासकीय रुग्णालयातही तपासणी शुल्क दहा रुपयांच्या पुढे गेले आहे. खासगी रुग्णालयात 150 ते 200 रुपयांच्या पुढे शुल्क आहे. असा स्थितीत अवघ्या पाच रुपयांत सेवा देणार्‍या महावीर दवाखान्याचे काम तेवढ्याच निष्ठेेन आणि व्यावसायिक तत्परतेने सुरू आहे.
येथील बाह्य रुग्णविभागात रोज किमान 60-70 रुग्ण येतात. पॉलिक्लिनिकमध्ये 25- 30 रुग्ण येतात. एक्सरेसाठी 12- 15 रुग्ण असतात. पॅथॉलॉजीसाठी 15- 20 रुग्ण असतात. या सार्‍या सेवा अवघ्या नाममात्र शुल्कात दिल्या जातात.
देवधर लेनमधील दवाखान्याचे कामकाज व्यवस्थित सुरू असताना सिडकोतील पवननगर भागातही दवाखान सुरू करण्यात आला. तेथेही रुग्णांची संख्या वाढतच आहे.
या ठिकाणी एक बाब आवर्जून नोंदवावी लागेल. ती म्हणजे दवाखान्याचे ट्रस्टी खरोखर समाजाचे विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. येथील कोणत्याही सेवेतून किंवा आर्थिक बाबीतून लाभ घेण्याची त्यांना अपेक्षा नाही. धर्मार्थ दवाखाना आहे म्हणून देणगीदारांकडून पावत्या फाडून निधी जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचीही त्यांना अपेक्षा नाही. कर्मचारी वर्गही नम्रतापूर्वक उत्तमसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आवर्जून लिहावे लागेल.
गरज असेल तेव्हा देणगीदार स्वत: निधी देतात किंवा लागणारी यंत्रणा, उपकरणे, सुविधा खेरदी करुन देतात. म्हणूनच आज देवधरलेनमध्ये दवाखान्याची स्वत:ची इमारत आहे. पवननगरमध्ये एका दानशूर व्यक्तीने नाव जाहीर न करताच दवाखान्याची इमारत बांधून दिली आहे.
ट्रस्टी आणि कर्मचार्‍यांची निष्ठा, प्रामाणिकपणा लक्षात घेऊन समाजातील विविध 40 डॉक्टरही नि:स्वार्थीपणे येथे सेवा देत आहेत. ते समाजात बाहेर वैद्यकीय व्यवसाय करीत असले तरी या दवाख्यान्यात त्यांचा सहयोग सेवा देण्याचाच आहे.
टु डी इकोे कलर डॉपलर, पलमनरी फंक्शन टेस्ट, ब्रान्फोस्कोपी यासह विविध महागड्या तपासण्या येथे याच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात अत्यंत अल्प दरात होत आहे. गरीब रुग्ण सेवा निधी अंतर्गत द्रारिद्रय रेषेखालील पिवळे कार्डधारक रुग्णांना मोफत सेवा तर केशरी कार्डधारक रुग्णांना अवघ्या 50 टक्के सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. मध्यंतरी चिंतामुक्त शिबिर घेेऊन सर्वसामान्यांना आरोग्यासाठी आवश्यक रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तघटक अशा तपासण्या अल्पदरांत करुन देण्यात आल्या. नाक- कान- घसा तपासणी, कॅन्सर तपासणी, नेत्र- दंत तपासणी अशी शिबिरे वारंवार घेेतली जातात.
संस्थेच्या कामकाजासाठी कार्यकारणी सदस्य, वैद्यकीय समिती, आमंत्रीत सदस्य हे वळोवेळी सूचना, सहकार्य करतात.
कोणत्याही धर्मार्थ संस्थेचे अस्तित्व हे समाजाच्या सकारात्मक आणि क्रियाशिल सहकार्यावरच टीकून राहते. दोन्ही दवाखान्यांचा वार्षिक खर्च सरासरी 35 लाखांपर्यंत आहे. केवळ रुग्णांच्या शुल्कातून हा खर्च भरून निघत नाही. गरजेच्यावेळी देणगीदारांचे सहकार्य मिळते. अत्याधुनिक सेवांसाठी यंत्रणा खरेदी करायची तर निधी गोळा करण्याचेही आव्हान असतेच. ट्रस्टी मात्र कुठेही पावत्या घेऊन हिंडत नाहीत. संस्थेचे काम पाहूनच स्वयंप्रेरणेने दानशूर मंडळी निधी किंवा आवश्यक यंत्रणा देतात.
आगामी वर्षांत 200 खाटांचे धर्मार्थ रुग्णालय उभारण्याचा ट्रस्टींचा संकल्प आहे. यासाठी आर. टी. ओ. कार्यालयाजवळ दीडएकर जागाही घेण्यात आली आहे. येथे रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यासाठी मनपाच्या लाफितीचा कारभार आडवा आलाच. जागा दवाखान्यासाठी वापरता येईल हॉस्पिटलसाठी नाही, असे संबंधित विद्वान बाबूंनी सांगितले. त्यामुळे आराखडा मंजूर होणे तब्बल पाच वर्षेे रखडले. या प्रकल्पासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये गोळा करण्याचा प्रयत्न आहे. अजून कोणाकडे एक रुपयाही मागण्यात आलेला नाही. मात्र, संकल्प साध्य होईल हा ट्रस्टींना विश्वास आहे.
अध्यक्ष हुकूमचंद बागमार, उपाध्यक्ष मोहनलाल साखला, सरचिटणीस डॉ. प्रकाश हिरण, खजिनदार नंदलाल पारख यांच्या सोबत इतर 22 सदस्य या दवाखान्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.
भविष्य काळातील आरोग्यसेवेतील विविध आव्हाने लक्षात घेता श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्यासारख्या संस्था टिकल्या पाहिजेत याच हेतूने समजाने गरजेचे सहकार्य करायलाच हवे. कधी देणगी देवून तर कधी कौैतुकाचे चार शब्द बोलून.
(पत्ता - श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान, देवधर लेन, रविवार पेठ, नाशिक 1)