नाशिकमधील देवधरलेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि सर्वसामान्य घटकातील रुग्णांना सेवा देण्याचा वसा गेल्या तीन दशकांपासून जपला गेला आहे. ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी आणि विविध आजारांचे 40 तज्ज्ञ डॉक्टर्स यासाठी निरपेक्ष, नि:स्वार्थीपणे काम करीत आहेत. या सर्वांच्या निष्ठांची आणि धडपडीची कहाणी...
सध्या आरोग्यसेवा दोन प्रकारात मिळते. एक सरकारी, जीचे स्वरुप बिनभरवशाचे. दुसरी खासगी, जीचे स्वरुप महागडे. समाजातील आर्थिक दुर्बल आणि सर्व सामान्य घटकाला अत्याधुनिक आरोग्यसेवेचा दर परवडेल की नाही अशी शंका वारंवार घेतली जाते. नाशिक सारख्या विस्तारणार्या महानगरात आता लहान- सहान आजारावर गोळ्या- इंजेक्शन देणार्या फॅमिली डॉक्टरांची संख्याही कमी कमी होत चालली आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा बहुविध सेवा देणार्या हॉस्पिटलची संख्या वाढत आहे.
अशा हिशोबी वातावरणात अजून एक आरोग्यसेवेचा दिलासादायक प्रकार दिसतो. तो म्हणजे धर्मार्थ आरोग्यसेवेचा. गेल्या 33- 34 वर्षांपासून अशा प्रकारच्या सेवेचा निष्ठेने वसा जपला आहे तो रविवारपेठेतील देवधर लेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याने.
सर्व सामान्य घटकाला अत्यंत कमी दरात आणि दारिद्रय रेषेखालील घटकांनामोफत सेवा देणार्या या दवाखान्यात बाह्यरुग्ण विभाग, विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा पॉलिक्लिनिक विभाग, एक्स रे विभाग, कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजिकल लॅब, सोनोग्राफी सेंटर, डेंटल केअर युनिट, लसीकरण आणि क्षयरोग निदान केंद्र आहेत. समाजातील 40 ते 45 तज्ज्ञ डॉक्टर या विभागाच्या माध्यमातून आपल्या सेवा देत आहेत. खासगी स्वरुपात मिळणारी वैद्यकीय सेवा महागडी होत असताना धर्मार्थ स्वरुपात सेवा देणार्या या दवाखान्याची वाटचाल निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेच्या बळावर पुढे पुढे जात आहे. अडचणी आल्या तरी त्यावर समाजातील चांगुलपणाच्या बळावर मात केली जात आहे.
या रुग्णालयाची स्थापना ही दोघा तीघांच्या जिद्दीतून झाली. कोणताही स्वार्थ न बाळगता कमी पैशांत रुग्णसेवा करण्याचा विचार त्या मागे होता. दहा- बारा जणांनी मिळून हजार हजार रुपये गोळा केले. जमलेली रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवली. तीच्या व्याजाच्या रकमेतून सेवा देणे सुरू झाले. साधारणपणे तीन दशकांपूर्वी अवघ्या दोन रुपयांत रुग्णसेवा दिली जात होती. त्यावेळी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू होता.
गरजू रुग्णांची संख्या वाढल्यानंतर इतर तज्ज्ञ डॉक्टरांची तसेच तपासण्यांची गरज भासू लागली. त्यामुळे पाचवर्षांनी पॉलिक्लिनीक विभाग (इतर तज्ज्ञसेवांचा विभाग) सुरू करण्यात आला. समाजातील काही डॉक्टरांना या विभागात सेवा देण्याची विनंती करण्यात आली. त्यापैकी अनेकांनी ती मान्य केली. मोफत नव्हे मात्र नाममात्र मानधन देवून इतर आजारांची तपासणी केली जावू लागली. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी या तपासणीचा दर होता अवघा पाच रुपये. आजही तपासणीचा दर आहे अवघा पाच रुपये. यात रुगाणाला आवश्यक ती औषधे (गोळ्या) दिली जातात. इंजेक्शनसह शुल्क आहे अवघे 15 रुपये.
आज शासकीय रुग्णालयातही तपासणी शुल्क दहा रुपयांच्या पुढे गेले आहे. खासगी रुग्णालयात 150 ते 200 रुपयांच्या पुढे शुल्क आहे. असा स्थितीत अवघ्या पाच रुपयांत सेवा देणार्या महावीर दवाखान्याचे काम तेवढ्याच निष्ठेेन आणि व्यावसायिक तत्परतेने सुरू आहे.
येथील बाह्य रुग्णविभागात रोज किमान 60-70 रुग्ण येतात. पॉलिक्लिनिकमध्ये 25- 30 रुग्ण येतात. एक्सरेसाठी 12- 15 रुग्ण असतात. पॅथॉलॉजीसाठी 15- 20 रुग्ण असतात. या सार्या सेवा अवघ्या नाममात्र शुल्कात दिल्या जातात.
देवधर लेनमधील दवाखान्याचे कामकाज व्यवस्थित सुरू असताना सिडकोतील पवननगर भागातही दवाखान सुरू करण्यात आला. तेथेही रुग्णांची संख्या वाढतच आहे.
या ठिकाणी एक बाब आवर्जून नोंदवावी लागेल. ती म्हणजे दवाखान्याचे ट्रस्टी खरोखर समाजाचे विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. येथील कोणत्याही सेवेतून किंवा आर्थिक बाबीतून लाभ घेण्याची त्यांना अपेक्षा नाही. धर्मार्थ दवाखाना आहे म्हणून देणगीदारांकडून पावत्या फाडून निधी जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचीही त्यांना अपेक्षा नाही. कर्मचारी वर्गही नम्रतापूर्वक उत्तमसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आवर्जून लिहावे लागेल.
गरज असेल तेव्हा देणगीदार स्वत: निधी देतात किंवा लागणारी यंत्रणा, उपकरणे, सुविधा खेरदी करुन देतात. म्हणूनच आज देवधरलेनमध्ये दवाखान्याची स्वत:ची इमारत आहे. पवननगरमध्ये एका दानशूर व्यक्तीने नाव जाहीर न करताच दवाखान्याची इमारत बांधून दिली आहे.
ट्रस्टी आणि कर्मचार्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा लक्षात घेऊन समाजातील विविध 40 डॉक्टरही नि:स्वार्थीपणे येथे सेवा देत आहेत. ते समाजात बाहेर वैद्यकीय व्यवसाय करीत असले तरी या दवाख्यान्यात त्यांचा सहयोग सेवा देण्याचाच आहे.
टु डी इकोे कलर डॉपलर, पलमनरी फंक्शन टेस्ट, ब्रान्फोस्कोपी यासह विविध महागड्या तपासण्या येथे याच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात अत्यंत अल्प दरात होत आहे. गरीब रुग्ण सेवा निधी अंतर्गत द्रारिद्रय रेषेखालील पिवळे कार्डधारक रुग्णांना मोफत सेवा तर केशरी कार्डधारक रुग्णांना अवघ्या 50 टक्के सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. मध्यंतरी चिंतामुक्त शिबिर घेेऊन सर्वसामान्यांना आरोग्यासाठी आवश्यक रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तघटक अशा तपासण्या अल्पदरांत करुन देण्यात आल्या. नाक- कान- घसा तपासणी, कॅन्सर तपासणी, नेत्र- दंत तपासणी अशी शिबिरे वारंवार घेेतली जातात.
संस्थेच्या कामकाजासाठी कार्यकारणी सदस्य, वैद्यकीय समिती, आमंत्रीत सदस्य हे वळोवेळी सूचना, सहकार्य करतात.
कोणत्याही धर्मार्थ संस्थेचे अस्तित्व हे समाजाच्या सकारात्मक आणि क्रियाशिल सहकार्यावरच टीकून राहते. दोन्ही दवाखान्यांचा वार्षिक खर्च सरासरी 35 लाखांपर्यंत आहे. केवळ रुग्णांच्या शुल्कातून हा खर्च भरून निघत नाही. गरजेच्यावेळी देणगीदारांचे सहकार्य मिळते. अत्याधुनिक सेवांसाठी यंत्रणा खरेदी करायची तर निधी गोळा करण्याचेही आव्हान असतेच. ट्रस्टी मात्र कुठेही पावत्या घेऊन हिंडत नाहीत. संस्थेचे काम पाहूनच स्वयंप्रेरणेने दानशूर मंडळी निधी किंवा आवश्यक यंत्रणा देतात.
आगामी वर्षांत 200 खाटांचे धर्मार्थ रुग्णालय उभारण्याचा ट्रस्टींचा संकल्प आहे. यासाठी आर. टी. ओ. कार्यालयाजवळ दीडएकर जागाही घेण्यात आली आहे. येथे रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यासाठी मनपाच्या लाफितीचा कारभार आडवा आलाच. जागा दवाखान्यासाठी वापरता येईल हॉस्पिटलसाठी नाही, असे संबंधित विद्वान बाबूंनी सांगितले. त्यामुळे आराखडा मंजूर होणे तब्बल पाच वर्षेे रखडले. या प्रकल्पासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये गोळा करण्याचा प्रयत्न आहे. अजून कोणाकडे एक रुपयाही मागण्यात आलेला नाही. मात्र, संकल्प साध्य होईल हा ट्रस्टींना विश्वास आहे.
अध्यक्ष हुकूमचंद बागमार, उपाध्यक्ष मोहनलाल साखला, सरचिटणीस डॉ. प्रकाश हिरण, खजिनदार नंदलाल पारख यांच्या सोबत इतर 22 सदस्य या दवाखान्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.
भविष्य काळातील आरोग्यसेवेतील विविध आव्हाने लक्षात घेता श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्यासारख्या संस्था टिकल्या पाहिजेत याच हेतूने समजाने गरजेचे सहकार्य करायलाच हवे. कधी देणगी देवून तर कधी कौैतुकाचे चार शब्द बोलून.
(पत्ता - श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान, देवधर लेन, रविवार पेठ, नाशिक 1)
Wednesday, July 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment