Monday, August 2, 2010

राष्ट्रकुलचा महाघोटाळा

आयपीएलच्या पाठोपाठ राष्ट्रकुल क्रीडा संयोजन समितीने विविध 16 स्टेडियमच्या बांधकामातील घोटाळे उघड केले आहेत. अलीकडे भारतीय खेळाडू विविध खेळ आणि मैदाने गाजवत आहेत. क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मात्र जमेल ते ओरबाडण्यात गुंतले आहेत. 72 देशांचा सहभाग असलेल्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांच्या प्रतिनिधींनी स्टेडियमच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर भारतात होणार्‍या घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. नंतर स्टेडियमची कामे रेंगाळल्याची चर्चा होती. आता केंद्रीय दक्षता आयोगानेच स्टेडियमच्या बांधकामातील महाघोटाळ्याची तक्रार क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. प्रसार माध्यमांनी त्यातील गंभीर गैरप्रकार चव्हाट्यावर आणले. या घोटाळ्याचे धागे-दोरे बरेच खोलवर पोहोचले असावेत. संयोजन समितीचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी त्याबद्दल इन्कार केला खरा, पण त्या इन्काराचे पोकळपण पत्रकारांना त्यांच्या चेहर्‍यावर वाचता आले. 655 कोटी रुपये खर्चाचा मूळ आराखडा आता बेहिशेब वाढला आहे. आजवर 24 हजार कोटींहून जास्त खर्च झाला आहे. काही कामे अजून पूर्ण नाहीत. जी पूर्ण झाली ती समाधानकारक नाहीत. लाखो पाऊंडांच्या रकमा परकीय चलनात विदेशातील काही व्यक्तींच्या खासगी कंपन्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत. त्याबद्दलचे कसलेही कागद किंवा करारपत्र उपलब्ध नाहीत. तशी कबुली संबंधित विदेश निवासी व्यक्तीने दूरदर्शन वाहिन्यांवर दिली आहे. लंडनमधील भारतीय वकिलातीने त्याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. तर संयोजन समितीच्या अध्यक्षांनी तेथील कारकून दर्जाच्या व्यक्तीचे नाव सांगून वेळ मारुन नेण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला आहे. यापूर्वी क्रिकेटचा आयपीएल घोटाळा उघड झाला. तो अद्याप गाजत आहे. त्या संघटनेवर ना. शरद पवार यांची हुकूमत चालते. राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्षपद खा. कलमाडींकडे आहे. दोघेही मराठी खासदार खास पुणेरी आहेत. सहाजिकच घोटाळ्यांच्या इतिहासात महाराष्ट्राचे नाव लाल शाईने लिहिले जाईल. पेशवाईनंतर पुण्याची दुष्कीर्ती जगात घोटाळ्यांनी अजरामर करण्याचा मान यानिमित्ताने दोन बाजीरावांना मिळू पहात आहे. संपत्तीच्या मोहाने भल्याभल्यांची बुद्धी डगमगते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या क्विन बॅटन रिलेच्या सोहळ्यातही कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. यंदाच्या घोटाळ्याचे धागे-दोरेसुद्धा आत्ताच लंडनपर्यंत पोहोचले आहेत. भारतात भ्रष्टाचारापासून कोणतेही क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही. जे केंद्रीय पातळीवर दिल्लीत घडते त्याचेच ओघळ गल्लीपर्यंत झिरपत असतात. हे उबगवाणे चित्र भारताच्या महासत्ता बनण्याच्या स्वप्नाला छेद दिल्याशिवाय कसे राहील?

No comments:

Post a Comment