Friday, July 30, 2010

व्यक्तिमत्त्वांची घाऊक चोरी

संपर्काचे अतिजलद माध्यम म्हणून आतरजालाच्या दुनियेत (इंटरनेट) सोशल नेटवर्किंग झपाट्याने लोकप्रिय होत आहे. त्यासाठी फेसबुक सारखे नवा नवे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. मैत्री वाढविणे, माहितीची देवाण घेवाण करीत व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगणे अशा गरजेतून फेसबूकचा वापर वाढतो आहे. कुटुंबात, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी एकाकी असणारी मंडळी फेसबूक सारख्या सोशल नेटवकिर्ंंगमध्ये जिवाभावाचे मित्र शोधू लागले आहेत. फेसबूकवर आपले अकाऊंट असणे ही नेटिजन्ससाठी प्रतिष्ठेची बाब मानली जात आहे. पलिकडे कोण आहे, त्याची विश्‍वासार्हाता काय याचा सारासार विचार न करता केवळ संगणकाच्या पडद्यावर दिसेल तेवढ्या तुटपुंज्या माहितीवर ही मैत्री पुढे सरकत आहे. त्यातून फसवणूक, लुबाडणूक, हिरमोड होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: एकाकी महिलांना, मुलींना तसे अनुभव आले आहेत. एकप्रकारे फेसबूकचा हा आंधळा वापर होत आहे. फेसबूकचा सरसकट वापर करणार्‍यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. फेसबूकवर अकाऊंट असलेल्या जगभरातील किमान 10 कोटी लोकांची व्यक्तिगत माहिती इंटरनेटरील चोरांनी हस्तगत केली आहे. इंटरनेटवरील हेे चोर म्हणजे नेट हॅकर्स, नेट ट्रॅकर्स किंवा नेट क्रॅकर्स. इंटरनेटवर माहिती शोधण्याच्या कामासाठी सर्च इंजिन वापरावे लागते. त्यासाठी स्वत:चे अकाऊंट नोंदवावे लागते. कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविण्यासाठी मेल अकाऊंट सुरू करावे लागते. सोशल नेटवर्किंग किंवा ब्लॉग सुरू करण्यासाठी अकाऊंट सुरू करावे लागते. या अकाऊंटमध्ये आपण आपली व्यक्तीगत माहिती नाव, वय, शिक्षण, जन्म तारीख, जन्म गाव, शाळेचे नाव, व्यवसाय, नोकरी आदी माहिती भरतो. तशी ही माहिती आपल्यासाठी सर्वसाधारण असतेे. जनगणनेच्या कामासाठी आलेल्या गणकाकडेही ही माहिती आपण भरून देतो. मात्र, ही माहिती अधिकृत व्यक्तिकडे दिल्यास किंवा अधिकृत संस्थेेकडे नोंदल्यास ती गोपनिय ठेवण्याची जबाबदारी संबंधितांची असते. जनगणनेसाठी दिलेली माहिती गोपनिय ठेवण्याचे वचन केंद्र सरकारही देते. इंटरनेट वापराच्या बाबतीत ही जबाबदारी नेटवर्किंगची सुविधा देणार्‍या सर्व्हिस प्रोव्हायडरची म्हणजे फेसबूकची आहे. या सर्वसाधारण माहितीचा उपयोग नेटवरील कोणत्याही सायबर क्राईमसाठी करता येतो. छायाचित्रांचा वापर अश्‍लिल कामासाठी केला जावू शकतो. आपल्या नावाने, छायाचित्रांचा वापर करुन डमी अकाऊंट इंटरनेटवर सुरू करुन त्याच्या माध्यमातून इतरांची फसवणूक केली जावू शकते. वाईटात वाईट कल्पना केली तर आपले स्वत:चे इंटरनेवरील अकाऊंट घातपाती कारवायांंसाठीही वापरता येवू शकते. इंटरनेटवरील चोर मंडळी जशी व्यक्तीगत माहिती चोरू शकते तशी ती आपले पासवर्डही सहज मिळवू शकते. इंटरनेटचा वापर करणार्‍यांनी अशा प्रकारच्या जोखमीच्या बाजूही वेळीच समजावू घेणे आवश्यक आहे. केवळ अधर्वट माहितीवर नेटिजन्स होण्याचा प्रकार म्हणजे स्वत:ला माहिती मायाजालाच्या दुष्टचक्रात अडकवून घेणे होय. त्यामुळे इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत किंवा कौटुंंबिक माहिती नोंदविताना काळजी घ्यायला हवी. इ बँकिंगचे व्यवहार करणार्‍यांनी बंँकेचे नाव, अकाऊंट नंबर, पासवर्ड अशा आर्थिक बाबी मुळीच नोंदवू नयेत. इंटरनेवर बक्षीस, लॉटरी याबाबत भुलभुलय्या ठरणार्‍या अनेक जाहिराती किंवा संदेश येतात. त्याच्या मोहजालात अडकायला नको. इंटरनेटचा वापर जसा व्यक्तिगत आणि जनहितार्थ आहे तसाच तो सामुहिक आणि विघातकही करणारे समाजकंटक अस्तित्त्वात आहेत, याचा वेळीच विचार करायला हवा. आता इंटरनेट साक्षर होण्याचीही गरज आहे.

No comments:

Post a Comment