Wednesday, May 20, 2009

विक्रमवीर गावित आणि भाजपचे एकतर्फी वर्चस्व

खानदेशात लोकसभेच्या चार जागांपैकी जळगाव, रावेर व धुळे या तीन मतदारसंघांचे निकाल भाजप- शिवसेना युतीसाठी आणि नंदुरबार या एका मतदारसंघाचा निकाल कॉंग्रेससाठी अपेक्षित असा लागला आहे. या निकालाची दुसरी बाजू अशी, की जळगाव आणि रावेर या मतदारसंघांचा निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसाठी अनुक्रमे धक्कादायक आणि काहीसा अपेक्षित असा लागला आहे. नंदुरबारमध्ये समाजवादी पक्षाच्या रूपाने उभे राहणारे आव्हान कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक पलटावून लावले आहे. खानदेशात चारपैकी तीन जागा जिंकणाऱ्या भाजपच्या यशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या विक्रमी सभांचा सिंहाचा वाटा आहे.

नवव्यांदा माणिकराव गावित

नंदुरबार मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसचे विद्यमान खासदार तथा माजी मंत्री माणिकराव गावित हे नवव्यांदा विक्रम करीत विजयी झाले. त्यांना अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानपूर्ण वातावरणात तब्बल 40 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून शरद गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसमोर आव्हान उभे केले होते. शरद गावित राज्यातील मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या माघारीचा व डॉ. गावित यांनी कॉंग्रेस प्रचारात सक्रिय होण्याचा मुद्दा वारंवार कॉंग्रेसतर्फे मांडला जात होता. शरद गावित यांनी मंत्री गावित यांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून जिल्हाभरात प्रभाव निर्माण केलेला असल्यामुळे त्यांची उमेदवारी माणिकराव गावित यांना अडचणीत आणणार, असे वाटत होते. मात्र, निकाल आणि मताधिक्‍याची टक्केवारी पाहता, माणिकराव गावित यांच्यावर प्रेम करणारा पारंपरिक मतदार आजही त्यांच्यामागे कायम असून, गावित- सुरूपसिंग नाईक आणि चंद्रकांत रघुवंशी या त्रिकुटाची जिल्ह्यावर पकड असल्याचे स्षट होते. येथे भाजप- शिवसेना युतीतर्फे रिंगणात असलेले सुहास नटावदकर यांचा चौथ्यांदा झालेला पराभव चटका लावून जातो. "राजकारण आपल्या घरचेच' असा समज करून असलेल्या मंत्री गावित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षांना "लगाम' लावणारा हा निकाल आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत गावित- नाईक- रघुवंशी हे मंत्री गावित यांना घाम फोडल्यावाचून राहणार नाहीत.

धुळ्यात कॉंग्रेसकडूनच घात

धुळे मतदारसंघात युतीतर्फे भाजपचे शिक्षक आमदार प्रताप सोनवणे अवघ्या बारा हजारांचे मताधिक्‍य घेऊन विजयी झाले. त्यांनी आघाडीकडून रिंगणात असलेले कॉंग्रेसचे सर्वार्थाने "पॉवरफुल्ल' आमदार अमरिश पटेल यांचा पराभव केला. अर्थात, या पराभवात कॉंग्रेसचे धुळ्यातील ज्येष्ठ नेते तथा आमदार रोहिदास पाटील व मालेगावातील ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रशांत हिरे यांची निष्क्रियता भोवली आहे. पाटील व हिरेद्वयी यांनी श्री. पटेल यांना उमेदवारी मिळाल्यापासून उघड विरोध केला होता. एवढेच नव्हे; तर ही मंडळी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या जाहीर सभांकडेही फिरकली नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत उघड बंडच केले होते. शिवाय, हे दोघेही मराठा समाजाचेच असल्यामुळे त्यांची निष्क्रियता श्री. सोनवणे यांच्या पथ्यावर पडली. कॉंग्रेसचे श्री. पटेल यांच्या जातीचा मुद्दा प्रथमच एवढ्या उघडपणे चर्चेत आला. भाजपचा पारंपरिक मतदार आणि पाटील- हिरे यांच्या दुसऱ्या पिढीचे थेट सहकार्य यातून अवघ्या 12 हजारांच्या मताधिक्‍याने का होईना श्री. सोनवणे विजयी झाले. मात्र, आता पाटील- हिरेद्वयी यांच्याबाबत पक्षांतर्गत काय निर्णय होणार? याविषयी उत्सुकता आहे. श्रीमती गांधी यांच्या सभा झालेल्या ठिकाणी पक्षाचा पराभव होता, ही बाब कॉंग्रेस पक्ष मोठ्या गांभीर्याने घेणार, हे निश्‍चित. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत रोहिदास पाटील हे खानदेश विकास प्रतिष्ठानच्या नावावर वेगळी खेळी खेळण्याची शक्‍यता आहे.

जळगावात जैन यांचा प्रभाव

जळगाव मतदारसंघाची जागा भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा परत मिळविली. युतीअंतर्गत भाजपमध्ये नवखे असलेले आणि निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले "एटी' उर्फ अशोक तापीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळते खासदार वसंतराव मोरे यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला. ए. टी. पाटील यांच्या विजयात शिवसेनेत नुकतेच स्थिरावलेले सुरेशदादा जैन यांच्या प्रभावाचा मोठा हिस्सा आहे. श्री. जैन यांचे जळगाव शहर- जळगाव ग्रामीण भागासह इतर तालुक्‍यांत मोठ्या संख्येत समर्थक आहेत. श्री. मोरे 18 महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून विजयी झाले होते, तेव्हा जळगावचा हा भाग जुन्या एरंडोल मतदारसंघास जोडलेला नव्हता. ए. टी. पाटील व श्री. मोरे हे पारोळा या एकाच गावातील व तालुक्‍यातील असूनही तेथे ए. टी. पाटील यांचेच हितचिंतक जास्त असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे श्री. मोरे यांच्यासाठी व रावेर मतदारसंघात प्रचारासाठी तीन वेळा दौऱ्यावर आले. त्यांनी पहिल्यांदा आक्रमकपणे विचार मांडले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर परखडपणे टीका केली. कॉंग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. कारण, जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्यामुळे पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसची मनधरणी करण्यातच बराच वेळा गेला. कॉंग्रेस नेतेही शेवटपर्यंत रावेरच्या जागेसाठी हटून बसले होते. अखेर, दाखवायचे म्हणून कॉंग्रेसची मंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आली. मात्र, जैन व एकनाथ खडसे यांच्या प्रचाराच्या झंझावातासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन, राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व अरुण गुजराथी यांचे प्रयत्न कमकुवत ठरले. गेल्या अठरा महिन्यांत श्री. मोरे यांनी खासदार म्हण
ून निधी खर्चाचा बऱ्यापैकी पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही, हाही मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यात जागावाटपात कॉंग्रेससाठी जागावाटपाचा ताळमेळ साधावा लागणार आहे.

जावळे यांना पुन्हा संधी

रावेर मतदारसंघातून युतीतर्फे भाजपचे मावळते खासदार हरिभाऊ जावळे 25 हजार मताधिक्‍याने विजयी झाले. येथे मराठा जातीचे कार्ड प्रभावी वाटत असताना जावळे यांनी मिळविलेला विजय हा त्यांचा व्यक्तिगत संपर्क, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार गिरीश महाजन यांचे वर्चस्व सिद्ध करणारा आहे. श्री. महाजन यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. रवींद्र पाटील उमेदवार होते. श्री. पाटील यांची राजकीय कुवत मर्यादितच होती; पण त्यांचे मराठा असणे आणि या मतदारसंघात मराठा समाजाचे गठ्ठा मतदान असणे याचा काही मेळ घातला येईल का? याचाच विचार स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी केला होता. बहुतांशी तो विजयाच्या जवळ जाणारा होता, हे जावळे यांना मिळालेले कमी मताधिक्‍य दर्शविते. जावळे यांना केवळ लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविणे, हे भाजपमधील काही नेत्यांनाही मान्य नव्हते; परंतु श्री. खडसे, पांडुरंग फुंडकर, श्री. महाजन, डॉ. राजेंद्र फडके, चैनसुख संचेती आदींनी घेतलेली मेहनत विजय निश्‍चित करून गेली. श्री. खडसे हे भाजपअंतर्गत राजकारण करताना पक्षाच्या राज्यस्तरावरील संघटनात्मक पदांवर लक्ष ठेवून आहेत. श्री. मुंडे यांच्यापाठोपाठ त्यांनाही महत्त्वाकांक्षा आहेच. रावेरसह जळगावची जागा परत मिळविल्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपची उमेदवारी देताना, तसेच शिवसेनेचे उमेदवार देतानाही खडसे- जैन संमतीचा प्रभाव राहणारच आहे.
जळगाव- रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंगेसला कॉंग्रेसची निष्क्रियता अपयशाकडे नेणारी ठरली. हा पराभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नाराज करणारा आहे. खानदेशात श्री. पवार यांचे आपल्याकडे मुक्कामी थांबणे किंवा आपल्या निवासस्थानी जेवण घेणे, अशा गोष्टींचे प्रचारासाठी भांडवल करणारे नेते आहेत. मात्र, या नेत्यांना अशा प्रभावाचे मतांमध्ये रूपांतर करता येत नाही, हे जळगाव महापालिका निवडणूक व आताच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. म्हणूनच, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्याने मांडणी करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment