
भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीतून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निरीक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना "भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवा' असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या "दखल'मध्ये ऊहापोह
जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे "आलो जन्मभरी मागाया' हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांविषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधिक चित्रण त्यात आहे. वेगळ्या विषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. "भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली' अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये "गर्दूल्ले' जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.इंटरनेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एके दिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करून माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यटनाचा काय संबंध? उत्सुकता वाढली. "भारतात पर्यटनाला जाता आहात?' असा प्रश्न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याविषयी या वेबसाइटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात "भारतातील भिकाऱ्यांपासून सावध!' असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या. या तिन्ही वेबसाइटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या पाच ते सात टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भीक मागतात. मात्र, काही देखावा करतात, उपाशी मुले दाखवून भीक मागणाऱ्या महिला असतात, वाहनातून उतरल्यानंतर लगेच काही देऊ नका, तर परत जाताना द्या, मुलांना भीक देताना भावनाशील होऊ नका; कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात. मुलांना रोख स्वरूपात भीक देऊ नका; कारण पालक ती हिसकावून घेतात. काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा, अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यटनविषयक आणि सामाजिक चेहऱ्याचे विद्रुपीकरण या वेबसाइटच्या माध्यमातून कसे होत आहे? असा प्रश्न मनात निर्माण झाला. त्या वेळी प्रा. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग-बगीचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत. त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाइटच्या माध्यमातून व्यक्त होतो, हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांविषयी अशीच; मात्र भारतीय संस्कृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, "भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भीक मागता आली पाहिजे'. ही माहितीसुद्धा चेहरा बिघडवणारीच वाटते.भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत "भिक्षा मागणे' हासुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी अशा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरविणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्याचा हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरुदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भिक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृतीदर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही, हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात "भिक्षा' शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, "शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.'इंटरनेटवर "भिकारी' विषयावरील शोधमोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यांपैकी चार पोस्ट ग्रॅज्युएट, सहा पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरुष व 1541 महिला शारीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई?) 500 रुपये होती.भिकाऱ्यांसंदर्भात अशीच एक आकडेवारी लक्ष वेधून गेली. 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवी दिल्लीत 60 हजार, मुंबईत तीन लाख, कोलकात्यात 75 हजार, तर बंगळूरमध्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे, की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे... आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते. आज तेथे सहा लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते? याबाबतची आकडेवारीही राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि तो आकडा आहे... 180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सारंगपूरच्या एक भिकाऱ्याने सामाजिक कार्यात सव्वा लाखाची देणगी दिली होती.हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले, तरी विदेशी पर्यटकांना त्यांच्या रूपात भारताची ओळख होत आहे, याविषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. मायी यांच्या पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी "बेगर्स होम' उभारले गेले पाहिजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी संस्थांनी वेगळा विचार करायला काय हरकत आहे?-------------------सदराशी संबंध नसलेली गोष्टएका आयटी कंपनीच्या समोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यास म्हणाला, "महाशय, आपण काही अडचणीत आहात का? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात?' तो अधिकारी म्हणाला, "होय, पूर्वी माझे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्चशिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉलेजात गेली. तिचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे.' तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, "तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का?' अधिकारी म्हणाला, "होय, एक लहान मुलगा आहे.' त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, "महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करू नका.'
No comments:
Post a Comment