Friday, January 26, 2018

जलक्रांती घडविणारे भोणे ...

पाणी अडवा पाणी जिरवा या मूळ संकल्पनेवर आधारित अनेक सरकारी योजना आल्या. गाव आणि शेत शिवारापर्यंत पोहचल्या. काहींचा गवगवा झाला. काही नावाला सुरु राहिल्या. बहुतेक आल्या कधी आणि गेल्या कधी समजले नाही. सरकारी खर्चही भरपूर होवून फारसा परिणाम काही साध्य झाला नाही. मागील वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेचा बोलबाला आहे. काही गावांमध्ये काम होते आहेत. काही ठिकाणी देखावा सुध्दा आहे.

पावसाचे पाणी हे जमिनीत जिरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र वापरले जाते. गाव व शेत शिवार लगतच्या नाल्यांचा कठीण झालेला पृष्ठभाग फोडून त्यांचे खोलीकरण करण्याचा शिरपूर पॅटर्ननुसार प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी ठरतो आहे. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेत शिवारातील नाल्यांचे आणि जुन्या बंधाऱ्यांजवळ पाणी साठवण जागेचे खोलीकरण स्वखर्चातून केले आहे. नियोजनबध्द पध्दतीने काम केलेल्या ठिकाणी भूजल पातळी तर वाढलीच आहे पण उन्हाळी हंगामापर्यंत पाणी उपलब्ध झाले आहे. भोणे (ता. धरणगाव) येथील नाला खोलीकरणाची कथा ही अशीच जलक्रांती प्रकारात मोडणारी आहे.

या गावाजवळच्या तीन वेगवेगळ्या नाल्यांचे खोलीकरण शेतकरी तथा ग्रामस्थांनी स्व खर्चातून केले. कधीकाळी अवर्षण प्रवण क्षेत्रात असलेल्या भोणे परिसरात आज शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. हे सारे साध्य करताना संबंधितांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. नाला खोलीकरणाचा पहिल्यांदा प्रस्ताव मांडणाऱ्यास, यात तुझा काही तरी लाभ आहे अशा संशयाने पाहणारी मंडळी आता लोकवर्गणी द्यायला पुढाकार घेते आहे. पाण्याच्या एकेक थेंबाने जसा दाण्यादाण्याला अंकूर दिला तसा पाण्याचा प्रत्येक थेंब माणसांमधील नाती सुध्दा ओलसर करुन गेला. भोण्यातील जलक्रांती सुरु झाली दोन वर्षांपूर्वी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकारातून काही जण एकत्र आले. पहिल्या वर्षी एक टप्पा आणि गतवर्षी दुसरा टप्पा पूर्ण झाला.

भोणे जवळ शेतीलायक क्षेत्र सुमारे २,५०० एकर आहे. यात खरीप हंगामचे क्षेत्र ९० टक्के असून कपाशीचे क्षेत्र जास्त आहे. सोबत मका, ज्वारी, मूग,उडीद घेतला जातो. थोड्या क्षेत्रात भाजीपाला घेणारेही आहेत. त्यात कारले, भेंडी जास्त असते. या भागातील खरीप हंगाम पावसावर घेतला जातो. त्यानंतर रब्बीसाठी पाटाद्वारे तीन पाळ्यांमध्ये पाणी मिळेल अशी आशा असते. उन्हाळी हंगाम सहसा होत नाही.

परिसरातील शेतकरी विहिरींमधील पाण्याच्या भरवशावर रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका घेतात. अशाही स्थितीत २,५०० एकर पैकी केवळ २०० एकरात रब्बी हंगाम असतो. गिरणा धरण परिसरात पाऊस सरासरी ८५० ते ९०० मिलीमीटर झाल्यास रब्बी हंगामात पाणी मिळण्याची शक्यता असते. पाण्याच्या २ / ३ पाळ्या मिळणार असतील तर रब्बीचे क्षेत्र ८०० एकरापर्यंत जाते. 

गेल्या काही वर्षांत गिरणा धरणातील पाण्यावर इतरांचे आरक्षण व हक्क वाढत चालले आहेत. शेती पेक्षा पिण्यासाठी पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देणे ही दुय्यम जबाबदारी ठरते आहे. याचा परिणाम म्हणजे भोणे येथील रब्बी हंगाम कमी होत असून उन्हाळी हंगाम बंद झाला आहे. हे आता पर्यंतचे वास्तव राहिले आहे.

मागील काही वर्षांत विहिरींमधील पाण्यावर रब्बी हंगाम घेण्याची पध्दत सुरु झाल्यानंतर हातात पैसा असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात विहिरी खोदल्या. काहींनी उभे आडवे बोअर मारले. २,५०० एकरात विहिरींची संख्या झाली २००/ २५० पेक्षा जास्त. याचा व्हायचा तो परिणाम होवून २००/ ३०० फुटांवरील पाणी ४०० / ५०० फुटांवर गेले. विहिरी उपसा काढू लागल्या. काही पावसाळा संपला की डिसेंबरमध्ये कोरड्या व्हायला लागल्या.

भोणे येथील शेत जमिनीचा पिकाऊ पोत आणि त्या खालील प्रस्तर याची एक समस्या आहे. येथे शेत जमिनीवर मातीचा पोत सरासरी ४ /५ फूट आहे. त्याखाली काळा पाषाण आहे. तो फोडून मगच खाली पाणी लागते. विहिर खोदायची किंवा बोअर मारायचा खर्च अवाढव्य. एवढे करुनही पाणी किती पुरेल याची शाश्वती नाही.

अशा या अडचणीच्या वातावरणात नाला खोलीकरणाचा पहिला प्रयोग सुरु झाला एप्रिल २०१६ मध्ये. शेतकरी व ग्रामस्थांना एकत्र करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सेवा विभाग प्रमुख योगेश्वर गर्गे, ग्रामविकास प्रमुख विनय कानडे, जळगावचे बालरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत पाटील, व सागर धनाड यांच्यासह जळगावच्या केशव स्मृती परिवार यांनी नदी व नाला खोलीकरणाबाबत मार्गदर्शन केले. जनजागरणासाठी अनेक वेळा ग्रामस्थांसोबत बैठक व सभा घेतल्या. त्यांनी मार्गदर्शन केल्यानुसार गावालगत कयनी पात्रात ६०० मीटर लांब, २० मीटर रुंद २ मीटर खोलीकरण करुन लघु तलाव तयार केला गेला. यासाठी लोक सहभागातून १ लाख रुपये खर्च झाले. त्यावर्षी पावसाळ्यात या तलावात पाणी साठले. त्यानंतर पहिला चमत्कार शेतकऱ्यांनी अनुभवला. दरवर्षी डिसेंबर अखेरीस आटणाऱ्या विहिरी एप्रिलपर्यंत चालल्या. रब्बीचे क्षेत्र गिरणेच्या आवर्तनाशिवाय २०० वरून ६०० एकरपर्यंत वाढले. गिरणेच्या आवर्तनामुळे ते १,००० एकरवर पोहोचले. गतवर्षी (सन २०१७) मध्ये परिसरात सरासरी २९० मिलीमीटर इतका कमी पाऊस होऊन सुध्दा कयनी पात्रातील लघु तलावात साठलेल्या पाण्यामुळे नोव्हेंबरपर्यंत सुमारे ५० विहिरींना भरपूर पाणी होते.

कयनीच्या खोली करणामुळे मिळणारा पाण्याचा लाभ पाहून यावर्षी परिसरातील नाला खोली करणाची कामे वाढली. त्यासाठी लोक सहभागाचा खर्च २ लाखांवर पोहोचला. औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषि प्रतिष्ठानने सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौघरी, जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी, देवगिरी प्रांताचे ग्रामविकास प्रमुख विनय कानडे, प्रांत संयोजक बापू रावगावकर, संघाचे जलगतीविधी प्रमुख सर्जेराव वाघ योगेश्वर गर्गे, डॉ. हेमंत पाटील यांनीही गरजेनुसार मार्गदर्शन केले.

आता भोणे येथील शेतकऱ्यांना जलक्रांतीचा सुनियोजित  मार्ग सापडला आहे. परिसरातील नाले खोलीकरणाचे नियोजन करायला १० जणांची समिती तयार झाली आहे. या समितीचे प्रमुख संजय भास्कर पाटील आहेत. समिती कामाचे नियोजन कसे करते त्याचे एक चांगले उदाहरण आहे. पहिल्या वर्षी खोलीकरणाचे काम ११ दिवस चालले. गतवर्षी खोलीकरणाचे काम २३ दिवस चालले. पहिल्या वर्षी ६०० मीटर काम झाले होते. तर गतवर्षी २, ४०० मीटर काम झाले. या कामासाठी सुमारे २५ कार्यकर्ते व असंख्य गावकरी राबले. चिंतामण पाटील, माजी सरपंच दिनेश निळकंठ पाटील व सरपंच मच्छिंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तेव्हा जिल्हाधिकारी असलेल्या रुबल अग्रवाल यांनी जेसीबी वापरासाठी डिझेल अनुदान मंजूर केले होते. त्याचीही या कामात मदत झाली.

कयनी पात्रातील खोली करणासह परिसरातील तीन नाल्यांचेही जवळपास २, ४०० मीटर खोलीकरण लोक सहभागातून झाले आहे. यात सारवे नाला ६०० मीटर लांब सरासरी १८ मिटर रुंद व २.५ मिटर खोल, बघा नाला ६०० मीटर लांब, ८ मीटर रुंद वा २.५ खोल आणि लेंडी नाला १,२०० मीटर लांब, ५ मीटर रुंद व २ मीटर खोल करण्यात आला आहे.  गेल्या पावसाळ्यात हे सर्व नाले आता तुडूंब भरून वाहत होते. त्यात आता पाणीसाठा झालेला आहे. या नाले खोलीकरणासाठी महात्मा फुले कृषि प्रतिष्ठानचे अभियंता पराग पंचभाई यांनी कामापूर्वी व कामानंतरचे मोजमाप केले. तसेच मार्गदर्शन केले. गतवर्षीच्या २ लाख रुपयांच्या लोक वर्गणी व महात्मा फुले कृषि प्रतिष्ठानच्या आर्थिक सहकार्यामुळे सुमारे ७ लाख रुपयांचे काम झाले.

भोणे परिसरात तीन नाले व नदीपात्रात खोलीकरणामुळे सुमारे ७ कोटी लिटर पाणी साठा निर्माण झालाआहे. त्याळे सुमारे २,००० एकर शेतीसाठी मार्च, एप्रिल २०१८ पर्यंत पाणी मिळेल. शिवाय गावातील पाणी टंचाई पासून सुटका होणार आहे.  उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटेल.

भोणे येथे मी स्वतः जावून लोकांनी झपाटून केलेले काम पाहून आलो. खरे तर या जलक्रांती विषयी सोशल मीडियात लिहावे असा आग्रह माझे मित्र चिंतामण पाटील (रास्वसं जळगाव विभाग जलगतीविधी प्रमुख) यांनी केला होता. आज लिहू उद्या लिहू करीत उशिरच झाला. पण एक गोष्ट नक्की ... पाण्याच्या उपलब्धतेने गाव समृध्द कसे करावे, हे समजून घ्यायचे असेल तर एकदा भोणे येथील वारी करावीच !!!

1 comment:

  1. श्री चिंतामण पाटील , संजय भास्कर पाटील सह इतर सारे भोणे ग्रामस्थ (ता धरणगांव )यांच्या सामुदायिक अतिशय प्रामाणिक प्रयत्नातून केलेले कार्य हे अतिशय कौदुस्पादक आहे असेच कार्य या पुढे होत राहो याच या निमित्ताने मनापासून धन्यवाद व शुभेच्छा --संजय (बाळासाहेब ) वाघ.भोणे ता धरणगांव ह.मु.जळगाव .

    ReplyDelete