आयुष्याच्या अर्ध शतकात महात्मा गांधी जाणून
बुजून कधी स्वीकारावा लागला नाही. पाठ्यपुस्तकातला गांधी कधी तरी वाचला.
जयंती-पुण्यतिथीला कोणाच्या तरी तोंडून ऐकला. टपाल तिकीटाच्या रुपात गांधी
चिटकवला. कमवायला लागल्यावर गांधी खिशातही बाळगला. पण, गांधी मार्गावर चालण्याची वेळ कधी आली
नाही. जळगावकरांना गांधीमार्च मध्ये चालण्याची संधी मिळते आहे. जळगाव फर्स्ट या
बिगर राजकीय संघटनने दि. 30 जानेवारीस समांतर रस्त्यांच्या मागणीकडे सरकारी यंत्रणांचे लक्ष
वेधण्यासाठी गांधीमार्च आयोजित केला आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील
वाहतूक कोंडी आणि अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक
जळगावकरने या गांधीमार्चमध्ये चालायला हवे.
पाळधी बायपास ते नशिराबाद अशा जवळपास २० किलोमीटर
क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा जळगावकरांसाठी जिवघेणा ठरतोय.
जिल्ह्यातील इतर तालुकेही याच महामार्गाने जळगावशी जोडले जातात. जिल्हावासियांची
या महामार्गावरुन वर्दळ असते.
जळगावच्या प्रत्येक नागरिकाचा महामार्गाशी रोजच कधीतरी संबंध येतोच.
बांभोरी ते गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान घडणाऱ्या अपघातांची संख्या वर्षभरात
शेकड्यावर जाते. सध्याची आकडेवारी लक्षात घेतली तर महामार्गावरील मृतांची संख्या
१६० वर गेली आहे. साधारणतः दर दोन दिवसात एकाचा बळी महामार्गावर जातो. यात
वयोगटाचा विचार केला तर दुचाकी पळविणाऱ्या युवावर्गातील बळी जास्त आहेत. यात
कोणाचा एकुलता एक मुलगा आहे. कोणाचा भाऊ आहे. कोणी नवविवाहीत आहे. प्रत्येक
अपघातामागील कहाणी ही भीषण आहे.
जळगाव शहरातून जाणारा महामार्ग हा विषय राजकीय
दप्तरी भिजते घोंगडे आहे. मनपा, सार्वजनिक
बांधकाम विभाग, राष्ट्रीय
महामार्ग प्राधीकरण, महसूल
प्रशासन आणि पोलीस विभाग यावर पत्रापत्री शिवाय फार काही करु शकलेले नाहीत.
जळगावकरांनी खुप वेळा असंतोषाने रस्तारोको, तोडफोड केली. वृत्तपत्रांनी पाने भरभरुन लिहीले.
पण समस्या सुटायचे लक्षण नाही. महामार्ग लगतच्या साईडपट्ट्या भरण्याविषयी सर्वच
विभाग हात वर करतात. रोज घडणाऱ्या लहान मोठ्या अपघातांचे एक कारण साईडपट्ट्या डांबरी
रस्त्यापेक्षा खोल जाणे हेही आहे. खड्डे बुजविण्याचा विषय वेगळाच. याच खड्ड्यांपायी एका
आमदाराच्या तरुण मुलाचा बळी गेला आहे.
महामार्ग शहरातून जातो, त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे झेंगट मनपा
स्वीकारत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आता केवळ टपालाचे काम करतो. कारण, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे (नही कडे) गेला आहे. त्यांच्या दृष्टीने या
महामार्गाचे चौपदरीकरण होईल तेव्हाच प्रश्न सुटेल. यापूर्वी चौपदरीकरणाचे काम
कोणाच्या, कोणत्या
इंटरेस्टमुळे रोखले गेले आणि रखडले हा इतिहास सर्वांना माहित आहे. मध्यंतरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जळगावात आले. हजारो कोटींचे आकडे सांगून गेले.
त्यानंतरही चौपदरीकरणाच्या निविदा मंजूर होवू शकलेल्या नाही. आता नवे पालकमंत्री
काय करतात याकडे लक्ष आहे. त्यांच्या दरबारी सर्व पक्षीय गाऱ्हाणे पोहचले आहे.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग लगतचे खड्डे
बहुतांश ठिकाणी माती किंवा इतर मटेरियल टाकून भरले आहेत. काही जागा अजुनही
भरायच्या आहेत. तरी सुध्दा दादावाडी, गुजराल पंप, आयटीआय, प्रभात चौक, आकाशवाणी चौक, ईच्छादेवी चौक, रिलायन्स पंप, औरंगाबाद चौफुली परिसरात समांतर रस्ता होवू शकेल
असे भराव झाले आहेत. जाणिवपूर्वक नियोजन केले तर किमान कच्चा समांतर रस्ता तयार
होवू शकतो. अन्यथा जेथे भराव झाले तेथे अतिक्रमणे सुरु झाली आहेत. याच विषयाकडे
लक्ष वेधायला जळगाव फर्स्ट या संघटनने गांधीमार्च आयोजित केला आहे.
जळगाव फर्स्ट हे डॉ. राधेशाम चौधरी यांचे पक्ष
विरहीत संघटन आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी समांतर रस्त्याचा पाठपुरावा थेट
हायकोर्ट बेंचपर्यंत केला. मनपा,
महामार्ग प्राधिकरण,
महसूल, पोलीस, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदने दिली. सह्यांची
मोहिम राबविली. त्यांच्यासोबत सर्व पक्षीय नेते मंडळीही अनेकवेळा सहभागी झाली. आता
गांधी पुण्यतिथीचे निमित्त साधून गांधीमार्च काढण्याची कल्पनाही डॉ. चौधरी यांचीच.
मिठाचा कायदा मोडायला गांधीजींनी दांडीयात्रा काढली. त्याप्रमाणेच समांतर
रस्त्याच्या विषयाकडे लक्ष वेधायला दि. 30 जानेवारीचा हा गांधीमार्च निघतोय.
कालिंकामाता मंदिरापासून सकाळी ९.३० वाजता
गांधीमार्च सुरु होईल. महामार्गावरून चालत खोटेनगर बस स्टॉपवर पोहचेल. तेथे
मान्यवर नागरिक गांधीजींच्या फोटोला पुष्पहार घालून समारोप करतील. एक जळगावकर
म्हणून मी यात सहभागी होणार आहे. कारण सध्याचा महामार्ग हा माझ्याही जीवन मरणाचा
अविभाज्य भाग बनला आहे. दि. 30 जानेवारीला मी सुध्दा काही काळ गांधीमार्गावर चाललो
याचे किमान समाधान मला असेल. आपणही वेळ काढून जरुर सहभागी व्हा ...
No comments:
Post a Comment