Saturday, August 8, 2015

नदीम आणि अदनानची इनसाइडर स्टोरी

भारतातील गुन्ह्यांसाठी ‘वॉन्टेड’ मात्र परदेशात आश्रित असलेल्या संशयित गुन्हेगारांच्या घरवापसीचा मुद्दा याकूब मेमनच्या फाशीनंतर चर्चेत आला. शरणार्थी असूनही याकूबला फाशी देण्यात आली, त्यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्‍वास उडतो आहे, असेही फसवे चित्र मुस्लिम धर्मियांमध्ये रंगविले जात आहे. हाच मुद्दा पुढे करून संगितकार नदीम सैफी हा सुद्धा भारतात परतायला तयार नाही असा चुकिचा प्रचार होत आहे. नदीमचे उदाहरण देत असताना पाकिस्तानचा गायक अदनान सामी हा मात्र, भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्‍वास ठेवून भारताचे नागरिकत्व मागत आहे, याकडे कडवी मुस्लिम मंडळी कसे काय दुर्लक्ष करू शकते?
भारतीय चित्रपट सृष्टीत पूर्वीपासून संगितकारांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्याच मालिकेत कधीकाळी यशस्वी जोडी म्हणून लौकिक असलेल्या नदीम-श्रवणपैकी नदीम अख्तर सैफी हा सध्या लंडनमध्ये स्थायिक आहे. तसा तो तेथे आश्रित आहे. चित्रपट संगीत क्षेत्राला पूर्णतः व्यावसायिक-उद्योगाचे स्वरुप देणार्‍या ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज’ कंपनीचे सर्वेसर्वा तथा कॅसेटकिंग म्हणून ओळखले जाणारे गुलशन कुमार यांच्या हत्येचा आरोप होता.
होता एवढ्यासाठीच म्हटले आहे की, गुलशन कुमार हत्या प्रकरणाचा निकाल सन २००२ मध्ये लागला असून पुरेशा पुराव्या अभावी न्यायालयानेच खुनाशी संबंधित २६ संशयितांच्या यादीतून नदीमचे नाव वगळून टाकले आहे. म्हणजेच, आता नदीमवर खुनाचा कोणताही आरोप नाही. तरी सुद्धा नदीम हा लंडनमधून भारतात परतायला तयार नाही. यामागे न्यायालयाच्या प्रक्रियेचे एक तांत्रिक कारण आहे. ते समजून घ्यायचे तर थोडे मागे जावे लागेल.
गुलशन कुमार यांचा जुहूमधील जीतनगर भागात भर रस्त्यावर दि. १२ ऑगस्ट १९९७ ला खून झाला होता. याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केल्यानंतर  दि. ३० ऑॅगस्ट १९९७ ला पोलीस आयुक्तांनी खुनाशी संबंधित २६ संशयितांची नावे जाहीर केली. त्यात ‘टीप्स कॅसेट कंपनी’ चे मालक रमेश तौरानी आणि संगितकार नदीमचेही नाव जाहीर होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीसह सर्वच क्षेत्र हादरले.
गुलशन कुमार यांचा खून झाला त्यावेळी नदीम हा भारतात नव्हता. तो लंडनमध्ये पत्नीसोबत होता. त्याची पत्नी गरोदर होती आणि तीला काही शारिरीक त्रास होता. त्यामुळे नदीम तथेच थांबून होता.
इकडे, भारतात पोलिसांनी तौराणी आणि इतर १९ संशयितांना ताब्यात घेवून गुलशन कुमार यांच्या खुनामागील थिअरी जाहीर केली. त्यानुसार  सुपर आणि टीप्स या दोन कॅसेट कंपनीतील स्पर्धा, आघाडीचे दोन संगितकार नदीम आणि अनु मलिक यांच्यातील स्पर्धा, नदीमचा गुलशन कुमारशी झालेला कथित वाद आदी कारणे खुनाच्या मागे होती, असा दावा पोलिसांनी केला. हिच कारणे दाखवून नदीम-तौराणी यांनी अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अबू सालेमच्या मदतीने गुलशन कुमारचा काटा काढला अशी खुनामागील हेतूची मांडणी केली होती. अर्थात, पोलिसांनी या गुन्ह्याचे संशयित म्हणून तौराणी वगैरेंनी अटक केली. मात्र, नदीम लंडनमध्ये असल्यामुळे तो अटकेच्या भीतीने भारतात परतला नाही. तेव्हापासून आजपर्यंत तो तेथेच आहे. संशयित खुन्यांच्या यादीत नाव आल्यानंतर  नदीमने खुलासा केला की, ‘मी गुलशन कुमार यांचा खून केलेला नाही. मी त्यांना पिता म्हणत होतो. मी त्यांचा खून कसा करू शकतो?’ पण, निरपराधत्व सिद्ध करण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेसमोर येण्याचे त्याने टाळले.
येथे थोडी अधिक माहिती अशीही आहे की, गुलशन कुमार यांच्या सुपर कॅसेट कंपनी सोबत असलेल्या नदीम-श्रवणच्या जोडीने त्याकाळात (१९९१-९५) लोकप्रियता मिळविली होती. गुलशन कुमार यांनी जुन्या चित्रपटांची गाणी नव्या कलाकारांकडून गाऊन घेत पायरसीचा नवा अध्याय सुरू केला होता. त्यांच्या या प्रयोगामुळे सुपर कॅसेटच्या टेप कॅसेट, सीडी रसिकांना स्वस्तात मिळत होत्या. जवळपास ६५ टक्के बाजारपेठ सुपर कॅसेटच्या ताब्यात होती. दुसरीकडे अनु मलिक आणि टीप्सचे तौराणी एकत्र होते. त्यांचीही गुलशन कुमार व नदीम-श्रवण जोडीशी दुहेरी स्पर्धा होती. अनु मलिकला चित्रपट हवे होते आणि तौराणींना धंदा-व्यवसाय. याच वातावरणात नदीम आणि सुपर कॅसेटच्या भागिदार तथा सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचे बिनसले. त्यामुळे गुलशन कुमार हे आपल्याला टाळू लागले आहेत, असा नदीमचा गैरसमज झाला. याच वातावरणात कधीतरी दुबईला विक्की गोस्वामीच्या कार्यक्रमात गेलेल्या नदीमचे आणि अंडरवर्ल्डमधील अनिस कासकर, अबू सालेम, कय्यूम आदींशी संबंध आले. तेथे गुलशन कुमारच्या हत्येचा कट शिजला अशीही गुन्ह्यामागील कारणांची पोलिसांची संपूर्ण थिअरी होती. त्यानुसारच मुंबई पोलिसांनी तपासकाम पूर्ण केले.
गुलशन कुमारच्या खुनाचे आरोपपत्र दि. २८ नोव्हेंबर १९९७ ला पोलिसांनी न्यायालयात सादर केले. ते सुमारे ४०० पानांचे होते. न्यायालयीन प्रक्रियेनुसार भारतीय पोलिसांनी लंडन पोलिसांकडे नदीम प्रत्यार्पणाचीही लढाई सुरू केली. भारतात नियमित खटला सुरू असताना मुंबई पोलीस नदीमला भारतात परत आणण्यासाठी कायदेशिर लढाई करीत होते. नदीम हा पोलिसांच्या दप्तरी फरार गुन्हेगार होता. त्यामुळे त्याच्या अटकेचे ‘अजामीनपात्र अटक वॉरंट’ न्यायालयाने काढले.
लंडनच्या न्यायालयाने नदीमच्या विरोधातील पुरावे मुंबई पोलिसांकडे मागितले. उपलब्ध पुरावे देण्यात आले. मात्र, लंडनच्या कायद्यानुसार ते पुरेसे नसल्यामुळे नदीमच्या प्रत्यार्पणास नकार दिला गेला. मुंबई पोलीस तेथे अपयशी ठरले. भारतातील न्यायालयातीही खटल्याच्या नियमित सुनावणीत मुंबई पोलीस नदीमच्या विरोधात पुरेसे पुरावे देवू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने संशयित आरोपींच्या यादीतून नदीमचे नाव वगळले. नंतर अंतिम निकालात संशयित १९ पैकी १८ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली.
आता न्यायालयीन व्यवस्थेचा तांत्रिक मुद्दा आहे तो येथे. एखाद्या संशयित आरोपीच्या विरोधात कोणत्याही न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले असेल तर ते वॉरंट एकाच पद्धतीत रद्द होते. ती म्हणजे, स्वतः आरोपीने न्यायालयासमोर हजर राहून आपली बाजू मांडणे. तसे होणे हे न्यायालयाच्या प्रक्रियेत सर्वसाधारण आहे. पण, नदीमचा याच व्यवस्थेवर विश्‍वास नाही असे त्याचे हितचिंतक म्हणतात. अर्थात, मुंबईतील फौजदारी खटल्यांमधील बचाव पक्षांचे सुप्रसिद्ध वकिल माजिद मेमन यांनी नदीमला ‘तू भारतात परत ये, तुला न्यायालयीन प्रक्रियेचे पूर्णतः संरक्षण मिळवून देतो’ असा विश्‍वास दिला आहे. तरी सुद्धा नदीम परतायला तयार नाही. तो म्हणतो, ‘गेली १८ वर्षे मी परदेशात आहे. काही मंडळींनी कारस्थान करून माझ्यावर खुनाच्या आरोपाचे बालंट आणले. ते आता खोटे ठरले आहे. भारत सरकारने माझी माफी मागावी आणि मला सन्मानाने भारताय येवू द्यावे. मी पुन्हा माझे संगीतकार म्हणून करियर करायला उत्सूक आहे. मला अन्याय आणि आरोप शिरावर घेवून मरायचे नाही. मला माझ्या वृद्ध आई-वडिलांना भेटायचे आहे’
नदीमची गल्लत आहे ती येथे. कोणत्याही खटल्यात सरकार पक्ष असला तरी केंद्र किंवा राज्य सरकार म्हणून तो खटला चालवला जात नाही. खटल्यात फिर्यादी पक्ष पोलीस हेच असतात. तेच तपासी अंमलदार आणि सरकारचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे खटला यशस्वी झाला तरी ते यश पोलिसांचे असते आणि अपयशी ठरला तरी त्याचा दोष तपासाच्या यंत्रणेवर जातो. यात थेट सरकारचा संबंध नाही. म्हणूनच सरकारने माझी माफी मागावी ही नदीमने केलेली मागणी एकांगी आणि पूर्ण न करण्याजोगी आहे. नदीमने भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवून परत आले पाहिजे आणि आपले संगितकार म्हणून करियर पुन्हा सुरू केले पाहिजे.
नदीमची कहाणी अंतिम टप्प्यात थोडी भावनिक जरूर आहे. अलिकडे काही माध्यमांमधून त्याची बाजूही समोर आली आहे. पण, येथे एकच मार्ग त्याच्या समोर आहे तो म्हणजे, त्याने भारतीय न्यायासनासमोर येवून आपली बाजू मांडावी. आता मुद्दा फक्त अटक वॉरंट रद्द करण्याचाच आहे. गुलशन कुमार खून खटला पुन्हा सुरू होणार नाही, हे त्याने लक्षात घ्यावे.
नदीमच्या कहाणी बरोबरच दुसरी एक कहाणी समोर येते. ती आहे पाकिस्तानी गायक अदनान सामी याची. अदनान हा पाकिस्तानी गायक तथा संगीतकारही आहे. गेली १४-१५ वर्षे तो भारतीय चित्रपटसृष्टीत पार्श्‍वगायन आणि स्वतंत्रपणे अल्बम काढण्याचा व्यवसाय करीत आहे. ‘बॉलिवूड’  मधील चित्रपटसृष्टीचा झगमगाट, भरपूर पैसा आणि मान-सन्मानाची त्याला सवय झाली आहे. सुदैवाने त्याचे ‘खान कंपनी’शी चांगले संबंध आहेत.
असा हा अदनान आज भारतात ठराविक मुदतीसाठी मिळणारा पर्यटक व्हिसा काढून वारंवार तो रिन्यूअल करून तिसर्‍या परदेशी पत्नी रोया फराबीसह निवास करीत आहे. त्याने भारताचे नागरिकत्व मिळावे असा अर्ज केला आहे. तो भारतीय न्यायव्यवस्था आणि परराष्ट्र व्यवहार-शिष्टाचार विभागाच्या आवश्यक त्या कार्यवाहीची पूर्तता कुरबूर न करता करीत आहे.
अदनानला घरगुती हिंसाचाराच्या खटल्यातही सामोरे जावे लागले आहे. त्याच्या घटस्फोटीत दुसरी पत्नी साबा गलदारी (यूएई निवासी) ने भारतीतील न्यायालयात अदनान विरोधात सुमारे ६४ कोटी रुपयांच्या पोटगी (मेहेर) साठी दावा दाखल केला होता. अर्थात, त्याचा निकाल अदनानच्या बाजूने लागला आहे. याच साबाने चित्रपट अभिनेत्री पूजा बेदीच्या विरोधातही तक्रार केली होती. कारण पूजा ही अदनानच्या कॅन्सरग्रस्त वडिलांची काळजी घेत होती आणि तीने त्यांच्या घरात प्रवेश करायला साबाला विरोध केला होता.
अदनानच्या विरोधात व्हिसा मुदत संपूनही भारतात निवास करणे, त्याची हकालपट्टी करा अशी मागणी मनसेने करणे, घटस्फोटीत पत्नीने पोटगीचा दावा करणे असे त्रासाचे व त्राग्याचे प्रकार झाले आहेत. तरी सुद्धा हा ‘बंदा’ भारतात राहून संगीतकार म्हणून करिअर करू इच्छितो.
अदनानचा प्रवासही तसा लक्षवेधी आहे. त्याचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. तो १५ पेक्षा जास्त वाद्ये उत्तमपणे वाजवू शकतो. त्याने पाकिस्तानात येवून संगीतकार व गायक म्हणून करिअर सुरू केले. १९८६ मध्ये त्याचा पहिला इंग्रजीतील गाण्याचा अल्बम आला. त्यानंतर १९८९, १९९१ मध्ये आलेल्या अल्बममुळे त्याला भारतातही ओळख मिळाली. २००२ मध्ये सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी अदनानसोबत अल्बम केला. हा अल्बम रसिकांमध्ये खूप गाजला. यानंतर दिग्दर्शक बोनी कपूर यांनी त्याला चित्रपटाच्या संगीतासाठी संधी दिली. येथून अदनानला सतत काम मिळत गेले. ते अगदी अलिकडच्या ‘बजरंगी भाईजान’ मधील गाण्यापर्यंत.
सारे सुरळीत सुरू असताना सन २००६ च्या दरम्यान अदनानला अती वजनामुळे (सुमारे २३० किलो) गुडघेदुखी आणि इतर आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. डॉक्टरांनी त्याला जगण्याची केवळ सहा महिन्यांची मुदत दिली. त्याने आजारातून बाहेर निघायचेच हा संकल्प करून लंडनमधील अत्याधुनिक सेवेच्या रुग्णालयात जावून विविध अवघड शस्त्रक्रिया स्वतःवर करून घेतल्या. नियमित व्यायाम करीत जवळपास १४५ किलो वजन कमी केले. आता त्याचे वजन ८५ किलो आहे. हा सारा शारिरीक त्रास त्याने अवघ्या १६ महिन्यांत ठरवून सहन केला. आज अदनानचे रुप ‘एक स्लिम’ व्यक्ती म्हणून सर्वांच्या समोर आहे.
या सार्‍या प्रवासात अदनानच्या वैवाहिक जीवनातही आडवळणे आहेत. त्याचे पहिले लग्न १९९३ मध्ये झेबा बख्तियारशी झाले. दुसरे लग्न २००१ मध्ये साबा गलदारीशी झाले. त्यांना एक मूल झाले. दीड वर्षांत दोघांचा घटस्फोटही झाला. २००८ मध्ये साबा अदनानकडे भारतात परत आली. तीने दुसर्‍यांदा अदनानशी लग्न केले. मात्र, पुन्हा वर्षभरात दोघांमध्ये वाद झाला. साबाने भारतीय कायद्यांचा आधार घेत अदनानच्या विरोधात पोटगीचा दावा केला. त्याचा निकाल अदनानच्या बाजूने लागला. २०१० मध्ये अदनानने तिसरे लग्न अफगाणी तरुणी रोया फराबीशी केले. तेव्हापासून तो तीच्या सोबत मुंबईत निवास करीत आहे.
अदनान जेव्हा भारतात आला तेव्हा भारत-पाकिस्तान संबंध तणावाचेच होते. पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात खेळविण्यास शिवसेनेचा विरोध होता. पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रमही होवू नयेत, त्यांना टीव्ही शोमध्ये बोलावू नयेत असे वातावरण होते. पण, भारतात आलेल्या अदनानने या वातावरणात कोणतीही चुकीची प्रतिक्रिया दिली नाही. म्हणूनच तो टीकून राहू शकला.
अशा अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेचे कज्जे-खटले अनुभवलेले असतानाही अदनान सामी भारतीय नागरिकत्व मागत आहे. कारण, त्याला माहिती आहे की, भारत हिच भूमी त्याला व त्याच्यातील कलावंताला कायमस्वरुपी जागा, काम, लोकप्रियता आणि पैसा देवू शकेल. अदनान सामीच्या विश्‍वासासमोर नदीम सैफीचा अविश्‍वास हा खूपचा खुजा, एककल्ली वाटतो. अदनान पाकिस्तानचा नागरिक असून भारतात राहून भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्‍वास व्यक्त करतो. नदीम भारताचा नागरिक असूनही त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्‍वास नाही, हे अस्वस्थ करणारे आहे.

No comments:

Post a Comment