Friday, July 30, 2010

व्यक्तिमत्त्वांची घाऊक चोरी

संपर्काचे अतिजलद माध्यम म्हणून आतरजालाच्या दुनियेत (इंटरनेट) सोशल नेटवर्किंग झपाट्याने लोकप्रिय होत आहे. त्यासाठी फेसबुक सारखे नवा नवे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. मैत्री वाढविणे, माहितीची देवाण घेवाण करीत व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगणे अशा गरजेतून फेसबूकचा वापर वाढतो आहे. कुटुंबात, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी एकाकी असणारी मंडळी फेसबूक सारख्या सोशल नेटवकिर्ंंगमध्ये जिवाभावाचे मित्र शोधू लागले आहेत. फेसबूकवर आपले अकाऊंट असणे ही नेटिजन्ससाठी प्रतिष्ठेची बाब मानली जात आहे. पलिकडे कोण आहे, त्याची विश्‍वासार्हाता काय याचा सारासार विचार न करता केवळ संगणकाच्या पडद्यावर दिसेल तेवढ्या तुटपुंज्या माहितीवर ही मैत्री पुढे सरकत आहे. त्यातून फसवणूक, लुबाडणूक, हिरमोड होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: एकाकी महिलांना, मुलींना तसे अनुभव आले आहेत. एकप्रकारे फेसबूकचा हा आंधळा वापर होत आहे. फेसबूकचा सरसकट वापर करणार्‍यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. फेसबूकवर अकाऊंट असलेल्या जगभरातील किमान 10 कोटी लोकांची व्यक्तिगत माहिती इंटरनेटरील चोरांनी हस्तगत केली आहे. इंटरनेटवरील हेे चोर म्हणजे नेट हॅकर्स, नेट ट्रॅकर्स किंवा नेट क्रॅकर्स. इंटरनेटवर माहिती शोधण्याच्या कामासाठी सर्च इंजिन वापरावे लागते. त्यासाठी स्वत:चे अकाऊंट नोंदवावे लागते. कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविण्यासाठी मेल अकाऊंट सुरू करावे लागते. सोशल नेटवर्किंग किंवा ब्लॉग सुरू करण्यासाठी अकाऊंट सुरू करावे लागते. या अकाऊंटमध्ये आपण आपली व्यक्तीगत माहिती नाव, वय, शिक्षण, जन्म तारीख, जन्म गाव, शाळेचे नाव, व्यवसाय, नोकरी आदी माहिती भरतो. तशी ही माहिती आपल्यासाठी सर्वसाधारण असतेे. जनगणनेच्या कामासाठी आलेल्या गणकाकडेही ही माहिती आपण भरून देतो. मात्र, ही माहिती अधिकृत व्यक्तिकडे दिल्यास किंवा अधिकृत संस्थेेकडे नोंदल्यास ती गोपनिय ठेवण्याची जबाबदारी संबंधितांची असते. जनगणनेसाठी दिलेली माहिती गोपनिय ठेवण्याचे वचन केंद्र सरकारही देते. इंटरनेट वापराच्या बाबतीत ही जबाबदारी नेटवर्किंगची सुविधा देणार्‍या सर्व्हिस प्रोव्हायडरची म्हणजे फेसबूकची आहे. या सर्वसाधारण माहितीचा उपयोग नेटवरील कोणत्याही सायबर क्राईमसाठी करता येतो. छायाचित्रांचा वापर अश्‍लिल कामासाठी केला जावू शकतो. आपल्या नावाने, छायाचित्रांचा वापर करुन डमी अकाऊंट इंटरनेटवर सुरू करुन त्याच्या माध्यमातून इतरांची फसवणूक केली जावू शकते. वाईटात वाईट कल्पना केली तर आपले स्वत:चे इंटरनेवरील अकाऊंट घातपाती कारवायांंसाठीही वापरता येवू शकते. इंटरनेटवरील चोर मंडळी जशी व्यक्तीगत माहिती चोरू शकते तशी ती आपले पासवर्डही सहज मिळवू शकते. इंटरनेटचा वापर करणार्‍यांनी अशा प्रकारच्या जोखमीच्या बाजूही वेळीच समजावू घेणे आवश्यक आहे. केवळ अधर्वट माहितीवर नेटिजन्स होण्याचा प्रकार म्हणजे स्वत:ला माहिती मायाजालाच्या दुष्टचक्रात अडकवून घेणे होय. त्यामुळे इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत किंवा कौटुंंबिक माहिती नोंदविताना काळजी घ्यायला हवी. इ बँकिंगचे व्यवहार करणार्‍यांनी बंँकेचे नाव, अकाऊंट नंबर, पासवर्ड अशा आर्थिक बाबी मुळीच नोंदवू नयेत. इंटरनेवर बक्षीस, लॉटरी याबाबत भुलभुलय्या ठरणार्‍या अनेक जाहिराती किंवा संदेश येतात. त्याच्या मोहजालात अडकायला नको. इंटरनेटचा वापर जसा व्यक्तिगत आणि जनहितार्थ आहे तसाच तो सामुहिक आणि विघातकही करणारे समाजकंटक अस्तित्त्वात आहेत, याचा वेळीच विचार करायला हवा. आता इंटरनेट साक्षर होण्याचीही गरज आहे.

Thursday, July 29, 2010

विक्रमादित्य सचिन

आपण मास्टरब्लास्टर का आहोत हे सचिनने बुधवारी आणि गुरूवारी श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात खेळतांना दाखवून दिले. सचिन केवळ स्वार्थासाठी खेळतो अशी टीका त्याच्यावर होत होती. बुधवारी त्याने भारतीय संघ संकटात असतांना टिच्चून फलंदाजी केली आणि कारकिर्दीतले 48 वे शतक ठोकले. तो खेळपट्टीवर टिकला की विक्रम सहज होत असतो याचा प्रत्यय देखील आला. केवळ शतक ठोकण्याच्या इराद्याने तो खेळतो म्हणणे अनेकदा चुकीचे ठरले आहे. आदल्या दिवसाप्रमाणेच सचिनने गुरूवारी देखील टिच्चून फलंदाजी करत पाचवे द्विशतक झळकावले. त्याचे हे द्विशतक भारतीय फलंदाजांमध्ये विक्रमी ठरले. द्विशतकांच्या रांगेत श्रीलंकेचा संगकारा सात द्विशतके झळकावून अग्रस्थानी आहे. सचिन आता त्याच्यामागे दोन पावलांवर आहे. यापूर्वी मास्टरब्लास्टरनने कारकिर्दीत 1999 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध अहमदाबाद येथे पहिले द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 217 धावा केल्या होत्या. यानंतर नागमूरमध्येही त्याने झिम्बाब्वेविरूद्ध अशीच कामगिरी केली होती. 2004 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांच्याच मायदेशात द्विशतक झळकावून आपण खंडाबाहेर संयमित फलंदाजी करु शकतो हे दर्शवून दिले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके असे एक ना अनेक विक्रम या मास्टरब्लास्टरच्या नावावर आहेत. अजून किती विक्रम याच्या नावावर लागतील हे भविष्यात जरी गूढ राहणारे असले तरी मास्टरब्लास्टर लवकरच कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये शतकांचे शर्तक पूर्ण करेल हे सांगण्यास कोणत्या भविष्यवेत्याची गरज पडणार नाही. श्रीलंकेविरूद्धचा आणखी एक कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियन संघ भारत दौर्‍यावर दोन कसोटी सामने खेळणार असतांना सचिन या दोन मालिकांच्या दरम्यान नक्कीच हा विक्रम करेल. मास्टरब्लास्टरने आतापर्यंत कसोटीत 48 शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 शतके ठोकली आहेत. या दोन क्रिकेटच्या प्रारूपाची गोळाबेरीज केली होती. ती संख्या 94 वर जाते. म्हणजेच क्रिकेटच्या दोन प्रारूप मिळून सचिन शतकांचे शतकही साजरे करेल याविषयी कोणाच्याही मनात शंका नसावी.

Wednesday, July 28, 2010

महावीर जैन धर्मार्थ दवाखाना

नाशिकमधील देवधरलेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि सर्वसामान्य घटकातील रुग्णांना सेवा देण्याचा वसा गेल्या तीन दशकांपासून जपला गेला आहे. ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी आणि विविध आजारांचे 40 तज्ज्ञ डॉक्टर्स यासाठी निरपेक्ष, नि:स्वार्थीपणे काम करीत आहेत. या सर्वांच्या निष्ठांची आणि धडपडीची कहाणी...
सध्या आरोग्यसेवा दोन प्रकारात मिळते. एक सरकारी, जीचे स्वरुप बिनभरवशाचे. दुसरी खासगी, जीचे स्वरुप महागडे. समाजातील आर्थिक दुर्बल आणि सर्व सामान्य घटकाला अत्याधुनिक आरोग्यसेवेचा दर परवडेल की नाही अशी शंका वारंवार घेतली जाते. नाशिक सारख्या विस्तारणार्‍या महानगरात आता लहान- सहान आजारावर गोळ्या- इंजेक्शन देणार्‍या फॅमिली डॉक्टरांची संख्याही कमी कमी होत चालली आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा बहुविध सेवा देणार्‍या हॉस्पिटलची संख्या वाढत आहे.
अशा हिशोबी वातावरणात अजून एक आरोग्यसेवेचा दिलासादायक प्रकार दिसतो. तो म्हणजे धर्मार्थ आरोग्यसेवेचा. गेल्या 33- 34 वर्षांपासून अशा प्रकारच्या सेवेचा निष्ठेने वसा जपला आहे तो रविवारपेठेतील देवधर लेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याने.
सर्व सामान्य घटकाला अत्यंत कमी दरात आणि दारिद्रय रेषेखालील घटकांनामोफत सेवा देणार्‍या या दवाखान्यात बाह्यरुग्ण विभाग, विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा पॉलिक्लिनिक विभाग, एक्स रे विभाग, कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजिकल लॅब, सोनोग्राफी सेंटर, डेंटल केअर युनिट, लसीकरण आणि क्षयरोग निदान केंद्र आहेत. समाजातील 40 ते 45 तज्ज्ञ डॉक्टर या विभागाच्या माध्यमातून आपल्या सेवा देत आहेत. खासगी स्वरुपात मिळणारी वैद्यकीय सेवा महागडी होत असताना धर्मार्थ स्वरुपात सेवा देणार्‍या या दवाखान्याची वाटचाल निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेच्या बळावर पुढे पुढे जात आहे. अडचणी आल्या तरी त्यावर समाजातील चांगुलपणाच्या बळावर मात केली जात आहे.
या रुग्णालयाची स्थापना ही दोघा तीघांच्या जिद्दीतून झाली. कोणताही स्वार्थ न बाळगता कमी पैशांत रुग्णसेवा करण्याचा विचार त्या मागे होता. दहा- बारा जणांनी मिळून हजार हजार रुपये गोळा केले. जमलेली रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवली. तीच्या व्याजाच्या रकमेतून सेवा देणे सुरू झाले. साधारणपणे तीन दशकांपूर्वी अवघ्या दोन रुपयांत रुग्णसेवा दिली जात होती. त्यावेळी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू होता.
गरजू रुग्णांची संख्या वाढल्यानंतर इतर तज्ज्ञ डॉक्टरांची तसेच तपासण्यांची गरज भासू लागली. त्यामुळे पाचवर्षांनी पॉलिक्लिनीक विभाग (इतर तज्ज्ञसेवांचा विभाग) सुरू करण्यात आला. समाजातील काही डॉक्टरांना या विभागात सेवा देण्याची विनंती करण्यात आली. त्यापैकी अनेकांनी ती मान्य केली. मोफत नव्हे मात्र नाममात्र मानधन देवून इतर आजारांची तपासणी केली जावू लागली. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी या तपासणीचा दर होता अवघा पाच रुपये. आजही तपासणीचा दर आहे अवघा पाच रुपये. यात रुगाणाला आवश्यक ती औषधे (गोळ्या) दिली जातात. इंजेक्शनसह शुल्क आहे अवघे 15 रुपये.
आज शासकीय रुग्णालयातही तपासणी शुल्क दहा रुपयांच्या पुढे गेले आहे. खासगी रुग्णालयात 150 ते 200 रुपयांच्या पुढे शुल्क आहे. असा स्थितीत अवघ्या पाच रुपयांत सेवा देणार्‍या महावीर दवाखान्याचे काम तेवढ्याच निष्ठेेन आणि व्यावसायिक तत्परतेने सुरू आहे.
येथील बाह्य रुग्णविभागात रोज किमान 60-70 रुग्ण येतात. पॉलिक्लिनिकमध्ये 25- 30 रुग्ण येतात. एक्सरेसाठी 12- 15 रुग्ण असतात. पॅथॉलॉजीसाठी 15- 20 रुग्ण असतात. या सार्‍या सेवा अवघ्या नाममात्र शुल्कात दिल्या जातात.
देवधर लेनमधील दवाखान्याचे कामकाज व्यवस्थित सुरू असताना सिडकोतील पवननगर भागातही दवाखान सुरू करण्यात आला. तेथेही रुग्णांची संख्या वाढतच आहे.
या ठिकाणी एक बाब आवर्जून नोंदवावी लागेल. ती म्हणजे दवाखान्याचे ट्रस्टी खरोखर समाजाचे विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. येथील कोणत्याही सेवेतून किंवा आर्थिक बाबीतून लाभ घेण्याची त्यांना अपेक्षा नाही. धर्मार्थ दवाखाना आहे म्हणून देणगीदारांकडून पावत्या फाडून निधी जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचीही त्यांना अपेक्षा नाही. कर्मचारी वर्गही नम्रतापूर्वक उत्तमसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आवर्जून लिहावे लागेल.
गरज असेल तेव्हा देणगीदार स्वत: निधी देतात किंवा लागणारी यंत्रणा, उपकरणे, सुविधा खेरदी करुन देतात. म्हणूनच आज देवधरलेनमध्ये दवाखान्याची स्वत:ची इमारत आहे. पवननगरमध्ये एका दानशूर व्यक्तीने नाव जाहीर न करताच दवाखान्याची इमारत बांधून दिली आहे.
ट्रस्टी आणि कर्मचार्‍यांची निष्ठा, प्रामाणिकपणा लक्षात घेऊन समाजातील विविध 40 डॉक्टरही नि:स्वार्थीपणे येथे सेवा देत आहेत. ते समाजात बाहेर वैद्यकीय व्यवसाय करीत असले तरी या दवाख्यान्यात त्यांचा सहयोग सेवा देण्याचाच आहे.
टु डी इकोे कलर डॉपलर, पलमनरी फंक्शन टेस्ट, ब्रान्फोस्कोपी यासह विविध महागड्या तपासण्या येथे याच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात अत्यंत अल्प दरात होत आहे. गरीब रुग्ण सेवा निधी अंतर्गत द्रारिद्रय रेषेखालील पिवळे कार्डधारक रुग्णांना मोफत सेवा तर केशरी कार्डधारक रुग्णांना अवघ्या 50 टक्के सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. मध्यंतरी चिंतामुक्त शिबिर घेेऊन सर्वसामान्यांना आरोग्यासाठी आवश्यक रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तघटक अशा तपासण्या अल्पदरांत करुन देण्यात आल्या. नाक- कान- घसा तपासणी, कॅन्सर तपासणी, नेत्र- दंत तपासणी अशी शिबिरे वारंवार घेेतली जातात.
संस्थेच्या कामकाजासाठी कार्यकारणी सदस्य, वैद्यकीय समिती, आमंत्रीत सदस्य हे वळोवेळी सूचना, सहकार्य करतात.
कोणत्याही धर्मार्थ संस्थेचे अस्तित्व हे समाजाच्या सकारात्मक आणि क्रियाशिल सहकार्यावरच टीकून राहते. दोन्ही दवाखान्यांचा वार्षिक खर्च सरासरी 35 लाखांपर्यंत आहे. केवळ रुग्णांच्या शुल्कातून हा खर्च भरून निघत नाही. गरजेच्यावेळी देणगीदारांचे सहकार्य मिळते. अत्याधुनिक सेवांसाठी यंत्रणा खरेदी करायची तर निधी गोळा करण्याचेही आव्हान असतेच. ट्रस्टी मात्र कुठेही पावत्या घेऊन हिंडत नाहीत. संस्थेचे काम पाहूनच स्वयंप्रेरणेने दानशूर मंडळी निधी किंवा आवश्यक यंत्रणा देतात.
आगामी वर्षांत 200 खाटांचे धर्मार्थ रुग्णालय उभारण्याचा ट्रस्टींचा संकल्प आहे. यासाठी आर. टी. ओ. कार्यालयाजवळ दीडएकर जागाही घेण्यात आली आहे. येथे रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यासाठी मनपाच्या लाफितीचा कारभार आडवा आलाच. जागा दवाखान्यासाठी वापरता येईल हॉस्पिटलसाठी नाही, असे संबंधित विद्वान बाबूंनी सांगितले. त्यामुळे आराखडा मंजूर होणे तब्बल पाच वर्षेे रखडले. या प्रकल्पासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये गोळा करण्याचा प्रयत्न आहे. अजून कोणाकडे एक रुपयाही मागण्यात आलेला नाही. मात्र, संकल्प साध्य होईल हा ट्रस्टींना विश्वास आहे.
अध्यक्ष हुकूमचंद बागमार, उपाध्यक्ष मोहनलाल साखला, सरचिटणीस डॉ. प्रकाश हिरण, खजिनदार नंदलाल पारख यांच्या सोबत इतर 22 सदस्य या दवाखान्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.
भविष्य काळातील आरोग्यसेवेतील विविध आव्हाने लक्षात घेता श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्यासारख्या संस्था टिकल्या पाहिजेत याच हेतूने समजाने गरजेचे सहकार्य करायलाच हवे. कधी देणगी देवून तर कधी कौैतुकाचे चार शब्द बोलून.
(पत्ता - श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान, देवधर लेन, रविवार पेठ, नाशिक 1)