खानदेशात लोकसभेच्या चार जागांपैकी जळगाव, रावेर व धुळे या तीन मतदारसंघांचे निकाल भाजप- शिवसेना युतीसाठी आणि नंदुरबार या एका मतदारसंघाचा निकाल कॉंग्रेससाठी अपेक्षित असा लागला आहे. या निकालाची दुसरी बाजू अशी, की जळगाव आणि रावेर या मतदारसंघांचा निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसाठी अनुक्रमे धक्कादायक आणि काहीसा अपेक्षित असा लागला आहे. नंदुरबारमध्ये समाजवादी पक्षाच्या रूपाने उभे राहणारे आव्हान कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक पलटावून लावले आहे. खानदेशात चारपैकी तीन जागा जिंकणाऱ्या भाजपच्या यशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या विक्रमी सभांचा सिंहाचा वाटा आहे.
नवव्यांदा माणिकराव गावित
नंदुरबार मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसचे विद्यमान खासदार तथा माजी मंत्री माणिकराव गावित हे नवव्यांदा विक्रम करीत विजयी झाले. त्यांना अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानपूर्ण वातावरणात तब्बल 40 हजारांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून शरद गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसमोर आव्हान उभे केले होते. शरद गावित राज्यातील मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या माघारीचा व डॉ. गावित यांनी कॉंग्रेस प्रचारात सक्रिय होण्याचा मुद्दा वारंवार कॉंग्रेसतर्फे मांडला जात होता. शरद गावित यांनी मंत्री गावित यांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून जिल्हाभरात प्रभाव निर्माण केलेला असल्यामुळे त्यांची उमेदवारी माणिकराव गावित यांना अडचणीत आणणार, असे वाटत होते. मात्र, निकाल आणि मताधिक्याची टक्केवारी पाहता, माणिकराव गावित यांच्यावर प्रेम करणारा पारंपरिक मतदार आजही त्यांच्यामागे कायम असून, गावित- सुरूपसिंग नाईक आणि चंद्रकांत रघुवंशी या त्रिकुटाची जिल्ह्यावर पकड असल्याचे स्षट होते. येथे भाजप- शिवसेना युतीतर्फे रिंगणात असलेले सुहास नटावदकर यांचा चौथ्यांदा झालेला पराभव चटका लावून जातो. "राजकारण आपल्या घरचेच' असा समज करून असलेल्या मंत्री गावित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षांना "लगाम' लावणारा हा निकाल आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत गावित- नाईक- रघुवंशी हे मंत्री गावित यांना घाम फोडल्यावाचून राहणार नाहीत.
धुळ्यात कॉंग्रेसकडूनच घात
धुळे मतदारसंघात युतीतर्फे भाजपचे शिक्षक आमदार प्रताप सोनवणे अवघ्या बारा हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी आघाडीकडून रिंगणात असलेले कॉंग्रेसचे सर्वार्थाने "पॉवरफुल्ल' आमदार अमरिश पटेल यांचा पराभव केला. अर्थात, या पराभवात कॉंग्रेसचे धुळ्यातील ज्येष्ठ नेते तथा आमदार रोहिदास पाटील व मालेगावातील ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रशांत हिरे यांची निष्क्रियता भोवली आहे. पाटील व हिरेद्वयी यांनी श्री. पटेल यांना उमेदवारी मिळाल्यापासून उघड विरोध केला होता. एवढेच नव्हे; तर ही मंडळी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या जाहीर सभांकडेही फिरकली नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत उघड बंडच केले होते. शिवाय, हे दोघेही मराठा समाजाचेच असल्यामुळे त्यांची निष्क्रियता श्री. सोनवणे यांच्या पथ्यावर पडली. कॉंग्रेसचे श्री. पटेल यांच्या जातीचा मुद्दा प्रथमच एवढ्या उघडपणे चर्चेत आला. भाजपचा पारंपरिक मतदार आणि पाटील- हिरे यांच्या दुसऱ्या पिढीचे थेट सहकार्य यातून अवघ्या 12 हजारांच्या मताधिक्याने का होईना श्री. सोनवणे विजयी झाले. मात्र, आता पाटील- हिरेद्वयी यांच्याबाबत पक्षांतर्गत काय निर्णय होणार? याविषयी उत्सुकता आहे. श्रीमती गांधी यांच्या सभा झालेल्या ठिकाणी पक्षाचा पराभव होता, ही बाब कॉंग्रेस पक्ष मोठ्या गांभीर्याने घेणार, हे निश्चित. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत रोहिदास पाटील हे खानदेश विकास प्रतिष्ठानच्या नावावर वेगळी खेळी खेळण्याची शक्यता आहे.
जळगावात जैन यांचा प्रभाव
जळगाव मतदारसंघाची जागा भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा परत मिळविली. युतीअंतर्गत भाजपमध्ये नवखे असलेले आणि निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले "एटी' उर्फ अशोक तापीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळते खासदार वसंतराव मोरे यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला. ए. टी. पाटील यांच्या विजयात शिवसेनेत नुकतेच स्थिरावलेले सुरेशदादा जैन यांच्या प्रभावाचा मोठा हिस्सा आहे. श्री. जैन यांचे जळगाव शहर- जळगाव ग्रामीण भागासह इतर तालुक्यांत मोठ्या संख्येत समर्थक आहेत. श्री. मोरे 18 महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून विजयी झाले होते, तेव्हा जळगावचा हा भाग जुन्या एरंडोल मतदारसंघास जोडलेला नव्हता. ए. टी. पाटील व श्री. मोरे हे पारोळा या एकाच गावातील व तालुक्यातील असूनही तेथे ए. टी. पाटील यांचेच हितचिंतक जास्त असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे श्री. मोरे यांच्यासाठी व रावेर मतदारसंघात प्रचारासाठी तीन वेळा दौऱ्यावर आले. त्यांनी पहिल्यांदा आक्रमकपणे विचार मांडले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर परखडपणे टीका केली. कॉंग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. कारण, जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्यामुळे पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसची मनधरणी करण्यातच बराच वेळा गेला. कॉंग्रेस नेतेही शेवटपर्यंत रावेरच्या जागेसाठी हटून बसले होते. अखेर, दाखवायचे म्हणून कॉंग्रेसची मंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आली. मात्र, जैन व एकनाथ खडसे यांच्या प्रचाराच्या झंझावातासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन, राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व अरुण गुजराथी यांचे प्रयत्न कमकुवत ठरले. गेल्या अठरा महिन्यांत श्री. मोरे यांनी खासदार म्हण
ून निधी खर्चाचा बऱ्यापैकी पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही, हाही मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यात जागावाटपात कॉंग्रेससाठी जागावाटपाचा ताळमेळ साधावा लागणार आहे.
जावळे यांना पुन्हा संधी
रावेर मतदारसंघातून युतीतर्फे भाजपचे मावळते खासदार हरिभाऊ जावळे 25 हजार मताधिक्याने विजयी झाले. येथे मराठा जातीचे कार्ड प्रभावी वाटत असताना जावळे यांनी मिळविलेला विजय हा त्यांचा व्यक्तिगत संपर्क, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार गिरीश महाजन यांचे वर्चस्व सिद्ध करणारा आहे. श्री. महाजन यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. रवींद्र पाटील उमेदवार होते. श्री. पाटील यांची राजकीय कुवत मर्यादितच होती; पण त्यांचे मराठा असणे आणि या मतदारसंघात मराठा समाजाचे गठ्ठा मतदान असणे याचा काही मेळ घातला येईल का? याचाच विचार स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी केला होता. बहुतांशी तो विजयाच्या जवळ जाणारा होता, हे जावळे यांना मिळालेले कमी मताधिक्य दर्शविते. जावळे यांना केवळ लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविणे, हे भाजपमधील काही नेत्यांनाही मान्य नव्हते; परंतु श्री. खडसे, पांडुरंग फुंडकर, श्री. महाजन, डॉ. राजेंद्र फडके, चैनसुख संचेती आदींनी घेतलेली मेहनत विजय निश्चित करून गेली. श्री. खडसे हे भाजपअंतर्गत राजकारण करताना पक्षाच्या राज्यस्तरावरील संघटनात्मक पदांवर लक्ष ठेवून आहेत. श्री. मुंडे यांच्यापाठोपाठ त्यांनाही महत्त्वाकांक्षा आहेच. रावेरसह जळगावची जागा परत मिळविल्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपची उमेदवारी देताना, तसेच शिवसेनेचे उमेदवार देतानाही खडसे- जैन संमतीचा प्रभाव राहणारच आहे.
जळगाव- रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंगेसला कॉंग्रेसची निष्क्रियता अपयशाकडे नेणारी ठरली. हा पराभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नाराज करणारा आहे. खानदेशात श्री. पवार यांचे आपल्याकडे मुक्कामी थांबणे किंवा आपल्या निवासस्थानी जेवण घेणे, अशा गोष्टींचे प्रचारासाठी भांडवल करणारे नेते आहेत. मात्र, या नेत्यांना अशा प्रभावाचे मतांमध्ये रूपांतर करता येत नाही, हे जळगाव महापालिका निवडणूक व आताच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. म्हणूनच, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्याने मांडणी करावी लागणार आहे.
Wednesday, May 20, 2009
Monday, May 4, 2009
ओम भवती भिक्षांदेही!

भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीतून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निरीक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना "भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवा' असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या "दखल'मध्ये ऊहापोह
जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे "आलो जन्मभरी मागाया' हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांविषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधिक चित्रण त्यात आहे. वेगळ्या विषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. "भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली' अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये "गर्दूल्ले' जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.इंटरनेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एके दिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करून माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यटनाचा काय संबंध? उत्सुकता वाढली. "भारतात पर्यटनाला जाता आहात?' असा प्रश्न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याविषयी या वेबसाइटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात "भारतातील भिकाऱ्यांपासून सावध!' असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या. या तिन्ही वेबसाइटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या पाच ते सात टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भीक मागतात. मात्र, काही देखावा करतात, उपाशी मुले दाखवून भीक मागणाऱ्या महिला असतात, वाहनातून उतरल्यानंतर लगेच काही देऊ नका, तर परत जाताना द्या, मुलांना भीक देताना भावनाशील होऊ नका; कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात. मुलांना रोख स्वरूपात भीक देऊ नका; कारण पालक ती हिसकावून घेतात. काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा, अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यटनविषयक आणि सामाजिक चेहऱ्याचे विद्रुपीकरण या वेबसाइटच्या माध्यमातून कसे होत आहे? असा प्रश्न मनात निर्माण झाला. त्या वेळी प्रा. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग-बगीचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत. त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाइटच्या माध्यमातून व्यक्त होतो, हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांविषयी अशीच; मात्र भारतीय संस्कृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, "भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भीक मागता आली पाहिजे'. ही माहितीसुद्धा चेहरा बिघडवणारीच वाटते.भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत "भिक्षा मागणे' हासुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी अशा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरविणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्याचा हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरुदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भिक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृतीदर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही, हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात "भिक्षा' शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, "शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.'इंटरनेटवर "भिकारी' विषयावरील शोधमोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यांपैकी चार पोस्ट ग्रॅज्युएट, सहा पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरुष व 1541 महिला शारीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई?) 500 रुपये होती.भिकाऱ्यांसंदर्भात अशीच एक आकडेवारी लक्ष वेधून गेली. 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवी दिल्लीत 60 हजार, मुंबईत तीन लाख, कोलकात्यात 75 हजार, तर बंगळूरमध्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे, की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे... आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते. आज तेथे सहा लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते? याबाबतची आकडेवारीही राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि तो आकडा आहे... 180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सारंगपूरच्या एक भिकाऱ्याने सामाजिक कार्यात सव्वा लाखाची देणगी दिली होती.हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले, तरी विदेशी पर्यटकांना त्यांच्या रूपात भारताची ओळख होत आहे, याविषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. मायी यांच्या पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी "बेगर्स होम' उभारले गेले पाहिजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी संस्थांनी वेगळा विचार करायला काय हरकत आहे?-------------------सदराशी संबंध नसलेली गोष्टएका आयटी कंपनीच्या समोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यास म्हणाला, "महाशय, आपण काही अडचणीत आहात का? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात?' तो अधिकारी म्हणाला, "होय, पूर्वी माझे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्चशिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉलेजात गेली. तिचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे.' तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, "तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का?' अधिकारी म्हणाला, "होय, एक लहान मुलगा आहे.' त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, "महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करू नका.'
Saturday, May 2, 2009
मुद्दा 49 अंश तापमानाचा !

अत्याधुनिक तंत्रज्ञान ः अत्यंत संवेदनशिल नोंदीजळगावमध्ये तापमानाचा पारा अखेर 49 अंश सेल्सिअसच्या वर गेला. काल (ता.29) दुपारी एक वाजून 16 मिनीटांनी जळगावमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 49.2 अंस सेल्सिअस नोंदले गेले. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात "सकाळ' च्या माध्यमातून पोचली. "इ सकाळ' च्या माध्यमातून जगभर पोचली. आज (ता. 30) या बातमीविषयी संपूर्ण महाराष्ट्रातून जळगावकरांना विचारणा व्हायला लागली. त्यात कुतूहल, जिज्ञासा, चिंता आणि उपहास असा अनेक भावनांचे मिश्रण अनुभवाला आले. यातूनच मुद्दा 49 अंश तापमानाचा समोर आला. एक बाब प्रथम स्पष्ट करायला हवी ती म्हणजे, जी मंडळी ही ऐतिहासीक नोंद लोकांच्यापर्यंत पोचवू शकले नाहीत, त्यांनी या मुद्याचा उलटा प्रवास सुरू केला. हे कसे शक्य आहे ? लोक कसे राहू शकतील ? ज्यांनी हे नोंदले किंवा सांगितले त्यांच्या तंत्रज्ञानाविषयी शंका असावी ? असेही मुद्दे समोर आले.49.2 अंश तापमानाची नोंद ही रस्त्यावरच्या कोणत्याही संस्थेने केलेली नाही. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या जैन उद्योग समुहाच्या ग्रीनहाऊसमधील अत्याधुनिक यंत्रणेच्या संगणक मापनावर ही नोंद झाली आहे. सर्वाधिक तापमानाची ही नोंद केवळ 15 मिनीटांसाठी आहे. 1 वाजून 02 मिनीटाला तापमान 47 अंश, 1 वाजून 17 मिनीटाला 49.02 आणि 1 वाजून 32 मिनीटाला पुन्हा 48 अंश सेल्सिअस अशी नोंद आहे.जळगाव शहरात अजून दोन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तापमानाची नोंद केली जाते. तेथे वापरल्या जाणाऱ्या पद्धतीविषयी शंका घेण्याचे कारण नाही. किंवा त्यांचीच पद्धत खरी असे कोणीही छाती टोकून सांगू शकत नाही. आता मुद्दा हा आहे की, जैन उद्योग समुहातील ग्रीन हाऊसमधील नोंद कितपत विश्वासार्हा मानावी ?जैन उद्योग समुहाचे शेती संशोधन केंद्र मोहाडी रस्स्यावरील जैन हिल्स परिसरात आहे. तेथे उतीसंवंर्धन केंद्रात विविध पिकांच्या रोपांसाठी ग्रीनहाऊस उभारले आहे. या ग्रीन हाऊसमधील तापमान कमाल आणि किमान 27 सेल्सिअस ठेवावे लागते. सापेक्ष आर्द्रता 70 टक्के असावी लागते. म्हणजे रोजच तापमान नोंदविणे व ते नियंत्रणात ठेवण्याचे काम. पूर्वी केवळ ग्रीन हाऊसमधील तापमानाची नोंदणी आणि निरीक्षण केले जात होते. यात सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान याच्या नोंदी केल्या जातात. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. भवरलाल जैन यांनी बाहेरील तापमानाच्या नोंदीसाठी डिसेंबर 2002 मध्ये अमेरिकन तंत्रज्ञान असलेली संगणक प्रणाली मागविली. आपल्या भागातील शेतकऱ्यांना तापमानाचे निष्कर्ष देता यावेत हीच त्या मागची भावना होती. अर्थात बारमतीच्या प्रतिभा प्रतिष्ठानमध्ये ज्या प्रणालिचा उपयोग केला जातो तिच ही प्रणाली.वॉचडॉग ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान नोंदविण्यासाठी स्पेक्ट्रम सिस्टिम विकसीत केली आहे. ग्रीन हाऊसच्या बाहेर सेन्सर लावण्यात आला आहे. त्याला प्रती 20 मिनीटांचा अवधी देत तापमान नोंदविण्याची सोय केली आहे. या सर्व नोंदी संगणक करतो. माणूस नाही. या सेन्सरजवळ नेहमीचे तापमापकही जोडलेले आहे.काल (ता. 29) याच सेन्सरच्या संवेदशिलतेवरुन 49.02 अंश सेल्सिअसची नोंद झाली. या साऱ्या माहितीचे विश्लेषण करणारी व्यक्ती कोण आहे ? त्या आहेत कल्याणी किरण मोहरीर. त्यांचे शिक्षण बीएस्सी बॉटनी, एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी. कामाचा अनुभव 1996 पासून याच ग्रीन हाऊसमध्ये वातावरणाच्या, तापमानाच्या बदलाच्या नोंदी करणे त्या अभ्यासणे. आता हे सारेच विश्वासार्हा असल्यावर अविश्वास ठेवणार कोण ? आहेत काही जण. त्यापैकी एक शासकीय यंत्रणा. जिच्याकडे कोणत्याही अत्याधुनिक सोयी- सुविधा नाहीत अशी अधिकारी- कर्मचारी मंडळी. बरे, तापमान अधिकच वाढले म्हटल्यावर वेगळ्या मागण्या पुढे येवू नयेत ही प्रशासन प्रमुखाला चिंता. वाढीव तापमानामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचा लाभ घेण्याची प्रवृत्ती वाढू नयेही, ही सुद्दा चिंताच. आणि काही जणांना वृत्त चुकल्याची चिंता. म्हणूनच, थेट सारे समाजून घेण्याचा आणि वाचकांच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न केला. (या विषयाच्या संदर्भात कोणाकडेही काहीही शास्त्रशुद्ध माहिती असल्यास "सकाळ"कडे पाठवा. किंवा तेट बोला 9881099189 वर)जगाच्या पाठीवरही नोंदजळगावच्या काल (ता.29) च्या तापमानाची नोंद जगाच्या पाठीवरही झालेली आहे. ही नोंद योग्य असल्याचा हा दुसरा पुरावा. जगभरातील हवामानाचा, वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्था आहेत. उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवरून सध्याचे वातावरण आणि पुढील 24 तासाचे वातावरण या विषयी या संस्था अंदाज देतात. या पैकीच एक असलेल्या ऍक्युव्हेदर डॉट कॉम या संस्थेच्या वेबसाईटवरही कालचे जळगावचे तापमान 49 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. या वेबसाईटवर हवामानाशी संबंधित अनेक बाबी आपण पाहू शकतो. येथे एक उलेल्ख करावा लागेल. तो म्हणजे चार वर्षांपूर्वी पाऊस कृत्रिम पद्धतीने पाडण्याचा प्रकल्प वर्षा हा प्रयोग शेगाव (जि. बुलडाणा) येथून राबविला जात होता. त्यावेळी "व्हेदर मॉडिफिकेशन' याच वेबसाईटवर उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ढगांच्या छाचित्रावरुन अंदाज घेत किमान पाचहाजर फूट उंचावर हेलिकॉप्टर पाठवून पुरेसे बाष्प असलेल्या ढगांमध्ये (काळे ढग) द्रावण फवारून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडला जात होता. (कृत्रिम पाऊस नाही. पाऊस खराच मात्र, तो पाडण्याची पद्धत मानवी...कृत्रिम)
Subscribe to:
Posts (Atom)