Saturday, April 18, 2009

व्ही. यू. नाना !

कार्पोरेट कल्चरमध्ये जागतिक स्तरावरील संस्थांचे प्रतिनिधित्व करीत ग्रामीण शेतकऱ्यांशी संपर्क हरवून बसलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील यांना शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. स्वतः 26 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या, तब्बल 19 वर्षे अध्यक्षपद स्वतः सांभाळलेल्या श्री. पाटील यांना उतारवयात सत्ता गमावण्याचा हा अनुभव कायम यातना देत राहील. सहकारी संस्थांना "स्वतःची जहागीर' समजून वागणाऱ्या नेत्यांना शिरपूर कारखान्याचा हा निकाल धडा शिकवतो. श्री. पाटील यांच्यासह त्यांच्या चेल्याचपाट्यांचा पराभव नव्या दमाच्या वसंतराव उत्तमराव पाटील ऊर्फ व्ही. यू. नाना पाटील यांच्यासारख्या कर्तव्यकठोर प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्याने केला. सहकारात यापुढे अशाच नेतृत्वाची गरज आहे, हेही साऱ्यांनी ध्यानात घ्यावे. व्ही. यू. नानांची ओळख करून देणारी ही दखल...


काही माणसे कर्तृत्वामुळे खूप-खूप मोठी होतात. अशा मोठ्या माणसांच्या सावल्याही मोठ्या पडतात. या सावल्यांच्या आडोशात हळूहळू विभिन्न प्रवृत्तींचे अनेक कार्यकर्ते घुसतात. त्यापैकी बहुतांश सावलीचा गैरवापर करणारेच असतात. त्यांच्या उपद्रवामुळे इतर माणसे मोठ्यांच्या सावलीत येत नाहीत. सुरवातीला सावली बदनाम होते. नंतर त्यातील माणसे विश्‍वास हरवून बसतात. आणि जेव्हा सावलीही हरवून जाते, तेव्हा मोठी झालेली माणसे बिनसावलीची होतात. जो सावली देत नाही, त्याच्या आश्रयाला कोण थांबते? कोणीही नाही. मग मोठी माणसे केवळ उंचीने मोठी राहतात. वाढलेल्या वयात आणि थकलेल्या डोळ्यांत आपली सावली शोधत राहतात...
असेच काहीसे झाले ते सहकारातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते शिवाजीराव गिरधर पाटील यांचे. त्यांची ओळख साऱ्या जगाला. जागतिक साखर-बीट महासंघाचे अध्यक्ष म्हणून. भारतात ओळख ती राज्यसभेचे खासदार आणि साखर महासंघाचे अध्यक्ष म्हणून. खानदेशात ओळख ती शिरपूर साखर कारखान्याचे अध्यक्ष व धुळे जिल्हा बॅंक, राज्य शिखर बॅंकेचे संचालक म्हणून. संवेदनशील अभिनेत्री कै. स्मिता पाटील यांचे पिताश्री म्हणूनही त्यांचा लौकिक होताच. असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवाजीराव पाटील यांना शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव पाहावा लागला. 17 पैकी त्यांच्यासह 16 जण पराभूत. वर म्हटल्याप्रमाणे "सावलीच हरवल्याचा' हा परिणाम म्हणावा लागेल. शिवाजीरावांच्या कार्याविषयी येथे लिहिण्याचे कारण नाही. मात्र, ज्यांच्यामुळे शिवाजीराव यांना हाही अनुभव घ्यावा लागला त्या व्ही. यू. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी ही दखल आहे.
कोण आहेत हे व्ही. यू. नाना? यांचे नाव सहकारात पुढारी म्हणून कुठे वाचले नाही. हो, कधीतरी शिरपूर कारखान्यात हा माणूस सहाय्यक लेखापाल, नंतर कार्यकारी संचालक आणि अल्पकाळ कार्याध्यक्ष होता, असे कुठेतरी स्मरणात आहे. मग, मध्येच कसा काय पुढारी झाला? प्रशासकाचा नेता होण्याचा हा प्रवास कसा? अशा अनेक प्रश्‍नांच्या उत्तरांतून व्ही. यू. नानांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द, मेहनतीच्या जोरावर काहीतरी वेगळे करून दाखविण्याची ईर्षा मनात बाळगली आणि ते साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली तर काय घडते? याचे उत्तर आहे वसंतराव उत्तमराव पाटील तथा व्ही. यू. नाना पाटील. शिरपूर कारखान्यात सहाय्यक लेखापाल, मुख्य लेखापाल, सचिव, कार्यकारी संचालक, कार्याध्यक्ष असा प्रवास करत आज ते अध्यक्ष झाले आहेत. थोडे फिल्मी वाटावे असेच हे कथानक. रहिमपुरे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे 20 सप्टेंबर 1954 ला त्यांचा जन्म झाला. त्यावेळी कुटुंबाची स्थिती हलाखीचीच होती. वडिलोपार्जित व्यवसाय शेती. शेतीची कामे करीत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण शिंदखेड्यात पूर्ण केले. शिरपूर येथील "एसपीडीएम' महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. पदव्युत्तर शिक्षण धुळे येथे विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले. त्यानंतर 1976 मध्ये भोरस (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील बेलगंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सहाय्यक लेखापाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 1979 ते 1982 पर्यंत त्यांनी धुळे तालुक्‍यातील नवलनगर परिसरातील संजय सहकारी साखर कारखान्यात लेखा विभागात काम केले. अनुभव व प्रशासनातील कार्यकुशलतेमुळे त्यांना 1983 मध्ये स्थापन झालेल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात उपमुख्य लेखापाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिचे त्यांनी सोने केले.
परिश्रमाच्या बळावर अल्पावधीतच त्यांना डिसेंबर 1983 मध्ये मुख्य लेखापाल म्हणून पदोन्नती मिळाली. सहकारी साखर कारखान्यात नोकरीचे सर्वोच्चपद कार्यकारी संचालकाचे असते. परंतु त्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक होते. वयाच्या चाळिशीत जिद्दीने अहोरात्र अभ्यास करून त्यांनी 1993 मध्ये पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत घेण्यात येणारी कार्यकारी संचालकपदाची प्रवेश परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. त्यानंतर 1994 ते 98 पर्यंत ते शिरपूर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक होते. प्रशासनातील अनेक धाडसी निर्णय घेत त्यांनी कारखान्याच्या प्रगतीस हातभार लावला. काही कारणास्तव त्यांनी 1998 मध्ये शिरपूर साखर कारखाना सोडला. 1998 मध्ये गुजरातमधील बोडोली येथे बोडोली सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हा हा कारखाना उभारला जात होता. अवघ्या दोन वर्षांत कमीत कमी खर्चात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेला सहकारी साखर कारखाना त्यांनी उभा केला. त्यानंतर 2003 ते 06 पर्यंत त्यांनी बडोदा शुगर मिलमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. श्री. शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा 2006 मध्ये शिरपूर साखर कारखान्याच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळली. हा कारखाना काही काळ बंद अवस्थेत होता. पुन्हा कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तथापि, संचालक मंडळातील काही जणांच्या दुराग्रहामुळे आणि श्री. शिवाजीराव पाटील यांनीही "धरसोड भूमिका' घेतल्याने 12 जुलै 2007 ला व्ही. यू. पाटील यांना कार्याध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, या आघाताने ते खचले नाहीत. हा कारखाना एकदा आपण चालवूच, या जिद्दीने त्यांनी व्यूहरचना केली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचे शेतकरी पॅनल 17 पैकी 16 जागा जिंकून सत्तेत आ
ले. काळाने व्ही. यू. पाटील यांनाच आता अध्यक्षपद मिळवून दिले आहे. 10 एप्रिलला पहाटे त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. हा सत्ताबदल अनुभवताना श्री. शिवाजीराव पाटील यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
श्री. व्ही. यू. पाटील उत्तम प्रशासक आहेत. विविध कारखान्यांत जबाबदारीच्या पदांवर काम केलेले असल्यामुळे कामगारांचे प्रश्‍न, वेतन, ऊसतोडणी, ऊस वाहतूक, उसाचा भाव, संचालकांचे सत्तेतील वागणे अशा कळीच्या मुद्यांची त्यांना चांगलीच माहिती आहे. खानदेशात कधीकाळी पुरुषोत्तमनगर, बेलगंगानगर, नवलनगर, भोरस, जिवरामनगर असे अनेक नागरी परिसर सहकार प्रकल्पांमुळे फुललेले होते. आज तेथे काय आहे? यावर चर्चा करण्याची गरज नाही. सहकार प्रकल्पांच्या अवस्थेवरही बोलण्याची सोय नाही. अशा परिस्थितीत एक प्रशिक्षित कुशल प्रशासक सहकार तत्त्वावरील कारखान्याला कशा पद्धतीने ऊर्जितावस्थेत आणतो? हेच पाहण्याची साऱ्यांना उत्सुकता आहे. व्ही. यू. नानांची "सावली' मोठी व्हावी. मात्र, भविष्यात ती कधीही हरवू नये, अशाच शुभेच्छा या वेळी त्यांना द्यायला हव्यात...

सदराशी संबंध नसलेली गोष्ट
जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या संदर्भातील हा किस्सा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, ते आणि त्यांचा गौरवर्णीय मित्र एकदा फिरायला निघाले होते. वाटेत समोरून एक कृष्णवर्णीय व्यक्ती येत होती. त्याने श्री. जॉर्ज यांना ओळखून मंद स्मित केले आणि डोक्‍यावरील हॅट काढून नम्रपणे अभिवादन केले. उत्तरादाखल श्री. जॉर्ज यांनीही त्याला अभिवादन केले. तो काळ गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील संघर्षाचा होता. श्री. जॉर्ज यांच्यासमवेत असलेल्या गौरवर्णीय मित्राला श्री. जॉर्ज यांनी त्या कृष्णवर्णीयाला केलेला नमस्कार आवडला नाही. मित्र म्हणाला, "अरे तू एका कृष्णवर्णीयाला नमस्कार करतो. हे तुझ्या पदाला आणि तुला शोभत नाही.' त्यावर श्री. जॉर्ज म्हणाले, "मित्रा, त्या कृष्णवर्णीयाने मला नमस्कार करीत त्याची सभ्यता, शिष्टाचार आणि संस्कृती दाखविली. मी तर राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या कितीतरी पटीने मला अशा गोष्टींचे पालन करणे आवश्‍यक आहे. केवळ वर्ण हेच माणसाच्या मूल्यमापनाचा निकष नाही. सभ्यता ही सुद्धा एक मोजपट्टी आहेच.'

No comments:

Post a Comment