खानदेशकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पहिल्या जळगाव दौऱ्याच्या आठवणी जागविणारी "गगन भरारी कर्तृत्वाची, नजर माहेरी ममतेची' ही स्मरणिका आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या सहस्त्रचंद दर्शन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध झालेला "गौरवांजली' हा गौरव ग्रंथ वाचनात आले. रचना, लेखांकन, संपादन, छायाचित्र संयोजन आणि गुणवत्तापूर्ण छपाई अशा विविध निकषांवर हे दोन्ही अंक अप्रतिम आहेत. अनेक आठवणी ताज्या करणारी ही "आनंद पाने' आहेत. त्याची दखल...
आठ फेब्रुवारी 2008 चा शुक्रवार तमाम जळगावकर विसरलेले नाहीत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तथा खानदेशकन्या प्रतिभाताई पाटील या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माहेरातील मान्यवरांनी त्यांचा "न भुतो न भविष्यती' असा सत्कार केला. तोच हा दिवस. लाडक्या लेकीच्या सत्कारासाठी, तिला माहेरीची साडीचोळी देण्यासाठी सारा खानदेश कसा अधीर, उत्साहित झाला होता हे आजही हजारो लोकांनी आठवते आणि ते प्रसंग काल- परवाच्या आठवणींप्रमाणे लाखभर डोळ्यांत अजूनही तरंगून जातात. राष्ट्रपती प्रतिभाताईंचा दौरा यशस्वी करण्याचे आव्हान जिल्हा नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या सोबत साऱ्याच राजकीय नेत्यांनी- शासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले होते. ताईंचा तो दौरा साऱ्या अर्थाने आठवणीतलाच ठरला.
या दौऱ्यातील अनेक प्रसंग पुन्हा ताजे टवटवीत करण्याचे काम गगन भरारी कर्तृत्वाची, नजर माहेरी ममतेची' या स्मरणिकेने केल्या आहेत. माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ आनंद गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध झालेल्या या स्मरणिकेत छायाचित्रांचा वापर आणि मजकुराची मांडणी हेच खरे वैशिष्ट्य आहे. या स्मरणिकेच्या प्रस्तावनेत श्री. गुप्ते सुरवातीलाच म्हणतात, सुगंधी वासाचं फूल पुस्तकांच्या पानात दाबून चुरगळतं खर, पण पुस्तक उघडल्यानंतर एक मंद सुगंध ते देत राहतं. महिनों- महिने. रम्य आठवणींचंही असंच असतं.' हेच वाक्य स्मरणिका वाचताना मनांत रुंजी घालत राहतं. पानोपानी ताईंच्या दौऱ्याचा सुगंध पुन्हा पुन्हा आठवणी ताज्या करतो. ताईंना सत्काराचे निमंत्रण देण्यापासून स्मरणिका सुरू होते. बैठका, सह्या, रॅली, व्यासपीठ उभारणी, ताईंचे आगमन, रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रस्त्यावर गर्दी, कार्यक्रमस्थळी गर्दी, सारी गर्दीच गर्दी, सत्काराचा क्षण आणि क्षण, क्रीडा संकुल उद्घाटन असे सारे प्रसंगच जिवंत करण्याचे कसब या स्मरणिकेच्या निर्मितीत साधले गेले आहे. ही स्मरणिका केवळ खासगी वितरणासाठी आहे मात्र, ती आपल्या संग्रही असावी या अपेक्षेने तिची प्रत मिळविण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा.
गौरवांजली...!
खानदेशचे लोकनेते तथा लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी गेल्या 16 जूनला वयाच्या 79 व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. हा कार्यक्रम खूप आधी झाला मात्र, त्यानिमित्त प्रसिद्ध केलेला "गौरवांजली' अलीकडे वितरित झाला आहे. लोकसेवक मधुकराव गौरव समितीतर्फे प्रकाशित ही स्मरणिका 324 पानांची आहे. त्याचे देणगी मुल्य पाचशे रुपये आहे. या अंकाची रचनाही अत्त्युत्तम आहे. श्री. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात समन्वयक प्रभाकर चौधरी व आदींनी मेहनतीने केलेले काम प्रत्येक पानांपानातून दिसून येते. श्री. मधुकरराव तथा बाळासाहेब चौधरी यांचे व्रतस्थ चरित्र आणि चारित्र्याविषयी समाजातील विविध मान्यवर अत्यंत आत्मियतेन लिखाण करतात, त्यातून बाळासाहेब यांना अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढतच जाते. राष्ट्रपती प्रतिभाताई (तेव्हा त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या), मधुमंगेश कर्णिक, कै. यशवंतराव चव्हाण, कै. पी. व्ही. नरसिंहराव, रा. सु. गवई, प्रा. ठाकूरदास बंग, ग. प्र. प्रधान, चंद्रशेखर धर्माधिकारी, राम शेवाळकर, प्रा. एन. डी. पाटील, वि. वि. चिपळूणकर,, डॉ. कुमार सप्तर्षी अशी शेकड्यांनी मान्यवर मंडळी बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्व या स्मरणिकेतून उलगडत जातात. (यातील काही लेख पूर्वीच्या इतर प्रकाशनातून संपादित केले आहेत.) कै. कुसुमताई चौधरी यांच्याही भावना "इकडच्या स्वारींचा वाढदिवस' म्हणून यात वाचता येतात. बाळासाहेब यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांची दूर्मिळ छायाचित्र या स्मरणिकेत आहेत. म्हणूनच ही पाने सुगंधी आनंदाची वाटतात.
ताईंची कृतज्ञता
या दोन्ही स्मरणिकांची पाने चाळताना एक प्रश्न सातत्याने डोक्यात फिरत राहतो. तो हाच की, राज्याच्या मंत्रिमंडळात समकालीन मंत्री असलेल्या ताई आणि बाळासाहेब यांचा एकमेकांच्या प्रती स्नेह कसा राहिला असेल ? त्याचा थोडा उलगडा "गौरवांजली' मध्ये ताईंच्या लेखात होतो. ताई म्हणतात, "बाळासाहेब जळगावला माझ्याकडे आल्यानंतर मोठा भाऊ बहिणीकडे आल्याचा आनंद व अनुभव मला येत असे' ताईंनी बाळासाहेब आदराने उल्लेख जळगावच्या नागरी सत्कार प्रसंगीही केला होता. मात्र, बाळासाहेब यांचे ताईंशी कशा प्रकारचे ऋणानुबंध होते ? हे अद्याप वाचनात आलेले नाही. बाळासाहेब यांच्या "लोकसेवक' या चरित्रात ताईंच्याविषयी कुठेही उल्लेख दिसत नाही. (बाळासाहेब यांनी ताईंच्या विषयी "सकाळ' च्या "राष्ट्रप्रतिभा स्वागतम् ' या पुरवणीत एक लेख लिहिलेला आहे)
सदराशी संबंध नसलेली गोष्ट
आश्रमातील तिघा शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी गुरूंकडे मागितली. गुरू म्हणाले उद्या सायंकाळी निर्णय घेऊ. दुसऱ्यादिवशी सकाळी गुरूंनी तिघांना शेजारच्या नदीतून हंडे भरून आणण्यास सांगितले. तिघे जेव्हा आश्रमाच्या बाहेर पडले तेव्हा तेथे पसरलेले काटे तिघांच्या तळ पायात रुतले. पहिला तेथेच काटे काढत बसला. दुसरा काटे काढून पाणी आणण्यास गेला. तिसऱ्याने मात्र झाडू रस्ता स्वच्छ करीत काटे बाजूला केले. त्यानंतर तो पाणी आणण्यास गेला. गुरू तिघांना पाहत होते. त्यांनी सायंकाळी तिघांना बोलावले. दोघांना आश्रमातच थांबण्याचे सांगून तिसऱ्याला गृहस्थाश्रम जाण्याचे सांगितले. ते म्हणाले, "शिक्षण आचरणात आणले नाही तर शिक्षण आंधळे असते आणि कृतीत शिक्षण दिसले नाही तर आचरण पांगळे असते.'
Monday, March 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment