Monday, March 23, 2009

झुलत्या मनोऱ्याचे 18 वे "श्राद्धवर्ष' !


एरंडोलपासून अवघ्या सोळा किलोमीटरवर असलेल्या फरकांडे येथील प्रार्थनास्थळातील जगप्रसिद्ध दोन झुलत्या मनोऱ्यांपैकी एक मनोरा कोसळल्याच्या घटनेला गेल्या 21 मार्चला 18 वर्षे पूर्ण झालीत. वास्तूशास्त्रात जगभर चमत्कार मानले जाईल असे स्थळ नामशेष होण्याचे हे 18 वे "श्राद्ध' वर्ष.


खानदेशातील ेऐतिहासिक स्थळे कालौघात नष्ट होत असल्याचे हताशपणे पाहण्याशिवाय आपण काही करू शकतो का......?ंफरकांडे. अवघ्या पाच हजार वस्तीचे गाव. सामुहिक सहभागातून गाव विकासाच्या काही योजना सध्या तेथे यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. त्यात तंटामुक्त अभियानसोबत व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, बचतगट स्थापना असे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने यशस्वी होत आहेत. तरीसुद्धा सामुहिक "दखल' घ्यावी असे कोणतेही कर्तृत्व अद्याप ग्रामस्थांनी दाखविलेले नाही.मात्र, इतिहासाच्या पानांमध्ये "फरकांडे' ची न पुसली जाणारी अशी नोंद झालेली आहे. ती तेथील "झुलत्या मनोऱ्यांमुळे'. जळगाव जिल्ह्याच्या इतिहासाचा आढावा किंवा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती फरकांडे शिवाय परिपूर्ण होत नाही. साऱ्या जगाची माहिती देणाऱ्या इंटरनेटवर सुद्धा "स्विगिंग टॉवर्स ऑफ फरकांडे' म्हणूनच फरकांडेची ओळख आहे. ही ओळख अत्यंत जुजबी माहिती देणारी आहे. जवळपास दहा- बारा वेबसाइटवर फरकांडेच्या झुलत्या मनोऱ्याची माहिती नोंदविताना सोबत पाटणादेवी मंदिर आणि तेथील दीपबुरूजांचे छायाचित्र दिसते. प्रथमदर्शनी तेच झुलतेमनोरे असावेत असा गैरसमज होऊ शकतो.जगाला माहिती देणाऱ्या या "महाजाला'त फरकांडेच्या मनोऱ्यांचे "शाब्दिक' चित्र (होय, एकाही वेबवर छायाचित्र नाही) जेवढ्या दुर्लक्षित पद्धतीने दिसते, तेवढ्याच उपेक्षेने राज्य शासन आणि पुरातत्त्व विभाग या मनोऱ्यांच्या देखभाल- दुरुस्तीबाबत वागत आहे. जळगाव जिल्हा गॅझेटीयर किंवा राजपत्रात आजही फरकांडे येथे दोन झुलते मनोऱ्‌ असल्याची नोंद आहे. तीच माहिती इंटरनेटवरही आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे ?तब्बल 18 वर्षांपूर्वी म्हणजे 21 मार्च 1991 ला प्रार्थनास्थळालगतचा डाव्या बाजूचा मनोरा कोसळला. आता तेथे केवळ विटा- दगडांचा ढीग आहे. उरला दुसरा मनोरा. तो सुद्धा देखभाल- दुरुस्ती अभावी कधीही कोसळू शकतो. त्यानंतर गेल्या 18 वर्षांत या मनोऱ्यांच्या व्यथा सातत्याने मांडण्याचे काम केले ते तेथील मनोरा बचाव समितीने. 6 जुलै 1995 ला दरवर्षी उपोषण करणे, निवेदन देणे असा कार्यक्रम या समितीने सुरूच ठेवला. त्यांना पहिली मदत केली ती खानदेशचे नेते रोहिदास पाटील यांनी. ते धुळ्याचे नेते आहेत असे मुद्दाम म्हटले नाही, कारण जळगाव जिल्ह्यातील पुढाऱ्यांना उगाचच दुखावल्यासारखे वाटायला नको. श्री. पाटील यांनी 25 फेब्रुवारी 1997 ला तत्कालीन पर्यटनमंत्री प्रकाश मेहता यांना भेटून निवेदन दिले. अर्थात, कार्यवाही झाली नाही आणि मनोरा बचाव समितीला सलग 17 वर्षे एक दिवस उपोषण करण्यासाठी मिळाला. नाही म्हणायला शासनाने एक काम केले. ते हेच की, 25 नोव्हेंबर 1997 आणि 14 जून 2001 च्या राजपत्रात फरकांडेच्या झुलत्या मनोऱ्यांना (?) ऐतिहासिक स्मारक म्हणून मान्यता देवून टाकली, एकदाची ! पण ही मान्यता दिल्यानंतर काय केले जाते ? हे कोणालाही माहित नाही. कारण, आजपर्यंत कोसळलेल्या मनोऱ्याच्या पुनर्बांधणीसाठी किंवा जो उभा आहे त्याच्या दुरुस्तीसाठी एक रुपया सुद्धा शासनाकडून आलेला नाही. बघा आठवून, गेल्या अठरा वर्षांमध्ये युती- आघाडीच्या शासनात जळगावचे किती पुढारी मंत्री झाले आणि नंतर सत्तेवरून पायउतारही झाले. त्यांनी काय केले ?...आम्ही सुद्धा हताशपणे बघण्याशिवाय काही करू शकतो का ? (नाही...तसे करू शकतो...माणसी किमान एक एक रुपया गोळा करून मनोऱ्याच्या दुरुस्तीसाठी कलेक्‍टर यांच्याकडे लोकवर्गणी देवू शकतो. तसे करायचे असल्यास सकारात्मक प्रतिसाद द्या...9881099189 वर) अन्यथा काही वर्षांनी आपण मुलाबाळांना चित्रात हे मनोरे दाखवू शकू.मनोऱ्यांचे ऐतिहासिक महत्त्व फरकांडे जवळ उतावळी आणि अंजनी नद्यांचा संगम आहे. तेथून जवळ एका प्रार्थनास्थळाच्या दर्शनीबाजूस हे दोन मनोरे होते. या प्रार्थनास्थळावर तीन गोलाकार घुमटही आहेत. मनोऱ्यांची उंची 16 मीटर (पन्नास फूट) आहे. आतील बाजूस 15 मीटर लांबीची महिरपींची भिंत आहे. वर जाण्यासाठी गोलाकार 56 पायऱ्या आहेत. वर डंबरी असून तेथे उभे राहून मनोऱ्यास हलविण्याचा प्रयत्न केल्यास पूर्वी दोन्ही मनोरे हलत असत. म्हणून त्यांना झुलते मनोरे म्हणत. आता एकच मनोरा आहे.हे गाव हे भुईकोट किल्ल्यात (नगरदूर्गात) वसले होते. गावाच्या भोवती आजही तटबंदीचे भग्नावशेष दिसतात. हा किल्ला फारुकी राजांच्या काळात 400 वर्षांपूर्वी बांधला गेला असावा असा तर्क आहे. त्याच काळात प्रार्थनास्थळाचे काम झाले असावे. काहीजण मात्र हे प्रार्थनास्थळ 270- 275 वर्षांपूर्वी चांद मोमीन यांनी बांधल्याचे सांगतात. स्थापत्यकलेचा चाहता मिरान आदिलखान याच्या काळातही (1438- 41) हे बांधकाम झाल्याचा अंदाज केला जातो. (संदर्भ ः जळगाव जिल्ह्यातील किल्ले आणि गढ्या ः नि. रा. पाटील)झुलत्या दीपमाळापारोळा येथून अवघ्या सहा किलोमीटरवर म्हसवे आहे. तेथे झुलत्या मनोऱ्या प्रमाणेच झुलत्या दीपमाळा आहेत. या दीपमाळांचा परीघ 4.8 मीटर असून उंची 9.3 मीटर आहे. त्याचे बांधकाम विटा आणि चुन्यातच केले आहे. या दीपमाळाही फरकांडे येथील झुलत्या मनोऱ्याप्रमाणे हालतात. फरकांडे प्रार्थनास्थळातील मनोरे आणि म्हसवे येथील झुलत्या मनोऱ्यांचे स्थापत्य हे आधुनिक काळातील स्थापत्य विशारदांसाठी एक आव्हानच आहे. अशा प्रकारच्या दीपमाळा किंवा मनोरे हे भारतात इतत्र कुठेही नाहीत. ब्रिटिशांनी मनोऱ्यांचे स्थापत्य समजावून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. आपण हे अद्भुत स्थापत्य किमान एकदा तरी पाहिले आहे का ?सदराशी संबंध नसलेली गोष्ट"सुलभ इंटरनॅशनल' हे नाव सर्वांना परिचित आहे. डोक्‍यावरून मैला वाहून नेण्याच्या प्रथेचे उच्चाटन कसे करावे ? या सामाजिक प्रश्‍नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी या सेवेच्या माध्यमातून केला आहे. जेव्हा त्यांनी काम सुरू केले तेव्हा ते एकटे होते. आज त्यांनी किमान 10 लाखांपेक्षा जास्त शौचालये बांधली असून, डोक्‍यावरून मैला नेण्याची प्रथाही बंद झाली आहे. अर्थात मध्यंतरी वीस वर्षांचा काळ गेला असून, डॉ. पाठक निष्ठेने काम करीत राहिले आहेत.

No comments:

Post a Comment