खानदेशकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पहिल्या जळगाव दौऱ्याच्या आठवणी जागविणारी "गगन भरारी कर्तृत्वाची, नजर माहेरी ममतेची' ही स्मरणिका आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या सहस्त्रचंद दर्शन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध झालेला "गौरवांजली' हा गौरव ग्रंथ वाचनात आले. रचना, लेखांकन, संपादन, छायाचित्र संयोजन आणि गुणवत्तापूर्ण छपाई अशा विविध निकषांवर हे दोन्ही अंक अप्रतिम आहेत. अनेक आठवणी ताज्या करणारी ही "आनंद पाने' आहेत. त्याची दखल...
आठ फेब्रुवारी 2008 चा शुक्रवार तमाम जळगावकर विसरलेले नाहीत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तथा खानदेशकन्या प्रतिभाताई पाटील या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माहेरातील मान्यवरांनी त्यांचा "न भुतो न भविष्यती' असा सत्कार केला. तोच हा दिवस. लाडक्या लेकीच्या सत्कारासाठी, तिला माहेरीची साडीचोळी देण्यासाठी सारा खानदेश कसा अधीर, उत्साहित झाला होता हे आजही हजारो लोकांनी आठवते आणि ते प्रसंग काल- परवाच्या आठवणींप्रमाणे लाखभर डोळ्यांत अजूनही तरंगून जातात. राष्ट्रपती प्रतिभाताईंचा दौरा यशस्वी करण्याचे आव्हान जिल्हा नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या सोबत साऱ्याच राजकीय नेत्यांनी- शासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले होते. ताईंचा तो दौरा साऱ्या अर्थाने आठवणीतलाच ठरला.
या दौऱ्यातील अनेक प्रसंग पुन्हा ताजे टवटवीत करण्याचे काम गगन भरारी कर्तृत्वाची, नजर माहेरी ममतेची' या स्मरणिकेने केल्या आहेत. माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ आनंद गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध झालेल्या या स्मरणिकेत छायाचित्रांचा वापर आणि मजकुराची मांडणी हेच खरे वैशिष्ट्य आहे. या स्मरणिकेच्या प्रस्तावनेत श्री. गुप्ते सुरवातीलाच म्हणतात, सुगंधी वासाचं फूल पुस्तकांच्या पानात दाबून चुरगळतं खर, पण पुस्तक उघडल्यानंतर एक मंद सुगंध ते देत राहतं. महिनों- महिने. रम्य आठवणींचंही असंच असतं.' हेच वाक्य स्मरणिका वाचताना मनांत रुंजी घालत राहतं. पानोपानी ताईंच्या दौऱ्याचा सुगंध पुन्हा पुन्हा आठवणी ताज्या करतो. ताईंना सत्काराचे निमंत्रण देण्यापासून स्मरणिका सुरू होते. बैठका, सह्या, रॅली, व्यासपीठ उभारणी, ताईंचे आगमन, रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रस्त्यावर गर्दी, कार्यक्रमस्थळी गर्दी, सारी गर्दीच गर्दी, सत्काराचा क्षण आणि क्षण, क्रीडा संकुल उद्घाटन असे सारे प्रसंगच जिवंत करण्याचे कसब या स्मरणिकेच्या निर्मितीत साधले गेले आहे. ही स्मरणिका केवळ खासगी वितरणासाठी आहे मात्र, ती आपल्या संग्रही असावी या अपेक्षेने तिची प्रत मिळविण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा.
गौरवांजली...!
खानदेशचे लोकनेते तथा लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी गेल्या 16 जूनला वयाच्या 79 व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. हा कार्यक्रम खूप आधी झाला मात्र, त्यानिमित्त प्रसिद्ध केलेला "गौरवांजली' अलीकडे वितरित झाला आहे. लोकसेवक मधुकराव गौरव समितीतर्फे प्रकाशित ही स्मरणिका 324 पानांची आहे. त्याचे देणगी मुल्य पाचशे रुपये आहे. या अंकाची रचनाही अत्त्युत्तम आहे. श्री. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात समन्वयक प्रभाकर चौधरी व आदींनी मेहनतीने केलेले काम प्रत्येक पानांपानातून दिसून येते. श्री. मधुकरराव तथा बाळासाहेब चौधरी यांचे व्रतस्थ चरित्र आणि चारित्र्याविषयी समाजातील विविध मान्यवर अत्यंत आत्मियतेन लिखाण करतात, त्यातून बाळासाहेब यांना अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढतच जाते. राष्ट्रपती प्रतिभाताई (तेव्हा त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या), मधुमंगेश कर्णिक, कै. यशवंतराव चव्हाण, कै. पी. व्ही. नरसिंहराव, रा. सु. गवई, प्रा. ठाकूरदास बंग, ग. प्र. प्रधान, चंद्रशेखर धर्माधिकारी, राम शेवाळकर, प्रा. एन. डी. पाटील, वि. वि. चिपळूणकर,, डॉ. कुमार सप्तर्षी अशी शेकड्यांनी मान्यवर मंडळी बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्व या स्मरणिकेतून उलगडत जातात. (यातील काही लेख पूर्वीच्या इतर प्रकाशनातून संपादित केले आहेत.) कै. कुसुमताई चौधरी यांच्याही भावना "इकडच्या स्वारींचा वाढदिवस' म्हणून यात वाचता येतात. बाळासाहेब यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांची दूर्मिळ छायाचित्र या स्मरणिकेत आहेत. म्हणूनच ही पाने सुगंधी आनंदाची वाटतात.
ताईंची कृतज्ञता
या दोन्ही स्मरणिकांची पाने चाळताना एक प्रश्न सातत्याने डोक्यात फिरत राहतो. तो हाच की, राज्याच्या मंत्रिमंडळात समकालीन मंत्री असलेल्या ताई आणि बाळासाहेब यांचा एकमेकांच्या प्रती स्नेह कसा राहिला असेल ? त्याचा थोडा उलगडा "गौरवांजली' मध्ये ताईंच्या लेखात होतो. ताई म्हणतात, "बाळासाहेब जळगावला माझ्याकडे आल्यानंतर मोठा भाऊ बहिणीकडे आल्याचा आनंद व अनुभव मला येत असे' ताईंनी बाळासाहेब आदराने उल्लेख जळगावच्या नागरी सत्कार प्रसंगीही केला होता. मात्र, बाळासाहेब यांचे ताईंशी कशा प्रकारचे ऋणानुबंध होते ? हे अद्याप वाचनात आलेले नाही. बाळासाहेब यांच्या "लोकसेवक' या चरित्रात ताईंच्याविषयी कुठेही उल्लेख दिसत नाही. (बाळासाहेब यांनी ताईंच्या विषयी "सकाळ' च्या "राष्ट्रप्रतिभा स्वागतम् ' या पुरवणीत एक लेख लिहिलेला आहे)
सदराशी संबंध नसलेली गोष्ट
आश्रमातील तिघा शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी गुरूंकडे मागितली. गुरू म्हणाले उद्या सायंकाळी निर्णय घेऊ. दुसऱ्यादिवशी सकाळी गुरूंनी तिघांना शेजारच्या नदीतून हंडे भरून आणण्यास सांगितले. तिघे जेव्हा आश्रमाच्या बाहेर पडले तेव्हा तेथे पसरलेले काटे तिघांच्या तळ पायात रुतले. पहिला तेथेच काटे काढत बसला. दुसरा काटे काढून पाणी आणण्यास गेला. तिसऱ्याने मात्र झाडू रस्ता स्वच्छ करीत काटे बाजूला केले. त्यानंतर तो पाणी आणण्यास गेला. गुरू तिघांना पाहत होते. त्यांनी सायंकाळी तिघांना बोलावले. दोघांना आश्रमातच थांबण्याचे सांगून तिसऱ्याला गृहस्थाश्रम जाण्याचे सांगितले. ते म्हणाले, "शिक्षण आचरणात आणले नाही तर शिक्षण आंधळे असते आणि कृतीत शिक्षण दिसले नाही तर आचरण पांगळे असते.'
Monday, March 30, 2009
Tuesday, March 24, 2009
सकाळ खानदेश दिवाळी अंकाचा गौरव
सकाळ खानदेशतर्फे दिवाळी २००८ मध्ये ग्रामविकास, ग्रामविकास, ग्रामसमृद्धी या विषयावर दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला होता. यात केंद्रीय- राज्याचे ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, डाँ. आनंद कर्वे, मोहन धारीया, चैत्राम पवार यांच्या मुलाखती, ग्रामदूत म्हणून नीलिमा मिश्रा, अरुण निकम, विजया पाटील, देवाजी तोफा, साहेबराव पाटील, डाँ. धनंजय नेवाडकर यांच्या विषयी माहिती, विकासाच्या वाटेवरील २१ गावांची माहिती, गाव लईं न्यारं म्हणूनि २४ गावांची माहिती होती. या शिवाय ग्रामगीते म्हणून मान्यवर कविंच्या कविता व ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांची छायाचित्रे होती. या अंकाचे मुखपृष्ठ श्री. अनिल उपळेकर (पुणे) यांनी चितारले होते. या अंकाला तुका म्हणे पुरस्कार बुलडाणा येथे 15 फेब्रुवारी २००९ ला प्दान करण्यात आला.
Monday, March 23, 2009
झुलत्या मनोऱ्याचे 18 वे "श्राद्धवर्ष' !

एरंडोलपासून अवघ्या सोळा किलोमीटरवर असलेल्या फरकांडे येथील प्रार्थनास्थळातील जगप्रसिद्ध दोन झुलत्या मनोऱ्यांपैकी एक मनोरा कोसळल्याच्या घटनेला गेल्या 21 मार्चला 18 वर्षे पूर्ण झालीत. वास्तूशास्त्रात जगभर चमत्कार मानले जाईल असे स्थळ नामशेष होण्याचे हे 18 वे "श्राद्ध' वर्ष.
खानदेशातील ेऐतिहासिक स्थळे कालौघात नष्ट होत असल्याचे हताशपणे पाहण्याशिवाय आपण काही करू शकतो का......?ंफरकांडे. अवघ्या पाच हजार वस्तीचे गाव. सामुहिक सहभागातून गाव विकासाच्या काही योजना सध्या तेथे यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. त्यात तंटामुक्त अभियानसोबत व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, बचतगट स्थापना असे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने यशस्वी होत आहेत. तरीसुद्धा सामुहिक "दखल' घ्यावी असे कोणतेही कर्तृत्व अद्याप ग्रामस्थांनी दाखविलेले नाही.मात्र, इतिहासाच्या पानांमध्ये "फरकांडे' ची न पुसली जाणारी अशी नोंद झालेली आहे. ती तेथील "झुलत्या मनोऱ्यांमुळे'. जळगाव जिल्ह्याच्या इतिहासाचा आढावा किंवा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती फरकांडे शिवाय परिपूर्ण होत नाही. साऱ्या जगाची माहिती देणाऱ्या इंटरनेटवर सुद्धा "स्विगिंग टॉवर्स ऑफ फरकांडे' म्हणूनच फरकांडेची ओळख आहे. ही ओळख अत्यंत जुजबी माहिती देणारी आहे. जवळपास दहा- बारा वेबसाइटवर फरकांडेच्या झुलत्या मनोऱ्याची माहिती नोंदविताना सोबत पाटणादेवी मंदिर आणि तेथील दीपबुरूजांचे छायाचित्र दिसते. प्रथमदर्शनी तेच झुलतेमनोरे असावेत असा गैरसमज होऊ शकतो.जगाला माहिती देणाऱ्या या "महाजाला'त फरकांडेच्या मनोऱ्यांचे "शाब्दिक' चित्र (होय, एकाही वेबवर छायाचित्र नाही) जेवढ्या दुर्लक्षित पद्धतीने दिसते, तेवढ्याच उपेक्षेने राज्य शासन आणि पुरातत्त्व विभाग या मनोऱ्यांच्या देखभाल- दुरुस्तीबाबत वागत आहे. जळगाव जिल्हा गॅझेटीयर किंवा राजपत्रात आजही फरकांडे येथे दोन झुलते मनोऱ् असल्याची नोंद आहे. तीच माहिती इंटरनेटवरही आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे ?तब्बल 18 वर्षांपूर्वी म्हणजे 21 मार्च 1991 ला प्रार्थनास्थळालगतचा डाव्या बाजूचा मनोरा कोसळला. आता तेथे केवळ विटा- दगडांचा ढीग आहे. उरला दुसरा मनोरा. तो सुद्धा देखभाल- दुरुस्ती अभावी कधीही कोसळू शकतो. त्यानंतर गेल्या 18 वर्षांत या मनोऱ्यांच्या व्यथा सातत्याने मांडण्याचे काम केले ते तेथील मनोरा बचाव समितीने. 6 जुलै 1995 ला दरवर्षी उपोषण करणे, निवेदन देणे असा कार्यक्रम या समितीने सुरूच ठेवला. त्यांना पहिली मदत केली ती खानदेशचे नेते रोहिदास पाटील यांनी. ते धुळ्याचे नेते आहेत असे मुद्दाम म्हटले नाही, कारण जळगाव जिल्ह्यातील पुढाऱ्यांना उगाचच दुखावल्यासारखे वाटायला नको. श्री. पाटील यांनी 25 फेब्रुवारी 1997 ला तत्कालीन पर्यटनमंत्री प्रकाश मेहता यांना भेटून निवेदन दिले. अर्थात, कार्यवाही झाली नाही आणि मनोरा बचाव समितीला सलग 17 वर्षे एक दिवस उपोषण करण्यासाठी मिळाला. नाही म्हणायला शासनाने एक काम केले. ते हेच की, 25 नोव्हेंबर 1997 आणि 14 जून 2001 च्या राजपत्रात फरकांडेच्या झुलत्या मनोऱ्यांना (?) ऐतिहासिक स्मारक म्हणून मान्यता देवून टाकली, एकदाची ! पण ही मान्यता दिल्यानंतर काय केले जाते ? हे कोणालाही माहित नाही. कारण, आजपर्यंत कोसळलेल्या मनोऱ्याच्या पुनर्बांधणीसाठी किंवा जो उभा आहे त्याच्या दुरुस्तीसाठी एक रुपया सुद्धा शासनाकडून आलेला नाही. बघा आठवून, गेल्या अठरा वर्षांमध्ये युती- आघाडीच्या शासनात जळगावचे किती पुढारी मंत्री झाले आणि नंतर सत्तेवरून पायउतारही झाले. त्यांनी काय केले ?...आम्ही सुद्धा हताशपणे बघण्याशिवाय काही करू शकतो का ? (नाही...तसे करू शकतो...माणसी किमान एक एक रुपया गोळा करून मनोऱ्याच्या दुरुस्तीसाठी कलेक्टर यांच्याकडे लोकवर्गणी देवू शकतो. तसे करायचे असल्यास सकारात्मक प्रतिसाद द्या...9881099189 वर) अन्यथा काही वर्षांनी आपण मुलाबाळांना चित्रात हे मनोरे दाखवू शकू.मनोऱ्यांचे ऐतिहासिक महत्त्व फरकांडे जवळ उतावळी आणि अंजनी नद्यांचा संगम आहे. तेथून जवळ एका प्रार्थनास्थळाच्या दर्शनीबाजूस हे दोन मनोरे होते. या प्रार्थनास्थळावर तीन गोलाकार घुमटही आहेत. मनोऱ्यांची उंची 16 मीटर (पन्नास फूट) आहे. आतील बाजूस 15 मीटर लांबीची महिरपींची भिंत आहे. वर जाण्यासाठी गोलाकार 56 पायऱ्या आहेत. वर डंबरी असून तेथे उभे राहून मनोऱ्यास हलविण्याचा प्रयत्न केल्यास पूर्वी दोन्ही मनोरे हलत असत. म्हणून त्यांना झुलते मनोरे म्हणत. आता एकच मनोरा आहे.हे गाव हे भुईकोट किल्ल्यात (नगरदूर्गात) वसले होते. गावाच्या भोवती आजही तटबंदीचे भग्नावशेष दिसतात. हा किल्ला फारुकी राजांच्या काळात 400 वर्षांपूर्वी बांधला गेला असावा असा तर्क आहे. त्याच काळात प्रार्थनास्थळाचे काम झाले असावे. काहीजण मात्र हे प्रार्थनास्थळ 270- 275 वर्षांपूर्वी चांद मोमीन यांनी बांधल्याचे सांगतात. स्थापत्यकलेचा चाहता मिरान आदिलखान याच्या काळातही (1438- 41) हे बांधकाम झाल्याचा अंदाज केला जातो. (संदर्भ ः जळगाव जिल्ह्यातील किल्ले आणि गढ्या ः नि. रा. पाटील)झुलत्या दीपमाळापारोळा येथून अवघ्या सहा किलोमीटरवर म्हसवे आहे. तेथे झुलत्या मनोऱ्या प्रमाणेच झुलत्या दीपमाळा आहेत. या दीपमाळांचा परीघ 4.8 मीटर असून उंची 9.3 मीटर आहे. त्याचे बांधकाम विटा आणि चुन्यातच केले आहे. या दीपमाळाही फरकांडे येथील झुलत्या मनोऱ्याप्रमाणे हालतात. फरकांडे प्रार्थनास्थळातील मनोरे आणि म्हसवे येथील झुलत्या मनोऱ्यांचे स्थापत्य हे आधुनिक काळातील स्थापत्य विशारदांसाठी एक आव्हानच आहे. अशा प्रकारच्या दीपमाळा किंवा मनोरे हे भारतात इतत्र कुठेही नाहीत. ब्रिटिशांनी मनोऱ्यांचे स्थापत्य समजावून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. आपण हे अद्भुत स्थापत्य किमान एकदा तरी पाहिले आहे का ?सदराशी संबंध नसलेली गोष्ट"सुलभ इंटरनॅशनल' हे नाव सर्वांना परिचित आहे. डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या प्रथेचे उच्चाटन कसे करावे ? या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी या सेवेच्या माध्यमातून केला आहे. जेव्हा त्यांनी काम सुरू केले तेव्हा ते एकटे होते. आज त्यांनी किमान 10 लाखांपेक्षा जास्त शौचालये बांधली असून, डोक्यावरून मैला नेण्याची प्रथाही बंद झाली आहे. अर्थात मध्यंतरी वीस वर्षांचा काळ गेला असून, डॉ. पाठक निष्ठेने काम करीत राहिले आहेत.
Saturday, March 21, 2009
मायावतीच पंतप्रधान !

भारताच्या या पुढील पंतप्रधान महिला असण्याची शक्यता अधिक आहे. कारण, या पदासाठी बहुमताची जुळवाजूळव करण्यासाठी मायावती, जयललीता, ममता, सोनिया यांच्या सहकार्याची किंवा पसंतीची गरज पडणार आहे. या चारही महिलांच्या तुलनेत मायावती यांचे पारडे मला जड वाटते. त्याची कारणे १) मायावती सध्या उत्तरप्रदेश सारख्या सर्वांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. २) कोणत्याही घटकाशी- पक्षाशी त्या तडजोड करु शकतात. (राजकारणाच्या पूर्वार्धात त्यांनी सवर्णांना शत्रू मानले. आता उत्तर्धात त्यांनी चक्क यू टर्न घेत सर्व सवर्णांशी जमवून घेतले आहे नव्हेतर, सत्तेत सहभागही दिला आहे) ३) स्वतःच्या स्वार्थासाठी त्या कोणत्याही व्यक्तीशी तडजोड करु शकतात ४) त्यांचे अर्थकारणही सशक्त आहे ५) त्यांचे दलित असणे हे जसे त्यांना पंतप्रधानपदाकडे नेणारे आहे तसे ते इतरांना सहकार्यासाठी प्रवृत्त करणारे आहे. (देशाची पहिली महिला आणि त्यात पुन्हा दलित महिला पंतप्रधान करण्यासाठी आम्ही पाठींबा देत आहोत, हे अनेकांना सांगणे सोयीचे होईल). मायावती यांच्यानंतर महिला पंतप्रधान होण्याची संधी सोनिया यांनाच आहे. त्याची काही कारणे १) १८ व्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करताना घटक पक्षांनी काँग्रेसला अगदीच दुय्यम वागणूक दिली आहे. (उदा. लालूप्रसाद- रामविलास पास्वान यांचे बिहारमधील जागा वाटप, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली रस्सीखेच) हे पाहता काँग्रेस पक्ष फार काळ श्री. मनमोहनसिंग यांना नेते मानमार नाही. काँग्रेस खतरेमे है म्हणत, सारी सत्तालोभी मंडळी सोनियाजी तुम्हीच पंतप्रधान व्हा असा गळा काढतील. २) राहूल गांधी यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करुन सोनियाजींना कधीतरी पंतप्रधानपद स्वीकारावे लागेल ३) इतर घटक पक्षांतील काही मंडळींना सोनियाजींच्या नावाने दिल्लीतील सोयीचे राजकारण करणे शक्य होते, ती मंडळीही फार दिवस श्री. मनमोहनसिंग यांना नेता मानणार नाहीत. उर्वरीत जयललीता व ममता यांचा फारतर पाठींबा म्हणून सहभाग असेल. त्यांना पंतप्रधानपदाची संधी दिसत नाही. मात्र, त्यांची पसंती ग्राह्य राहील.
Subscribe to:
Posts (Atom)