Saturday, August 8, 2015

नदीम आणि अदनानची इनसाइडर स्टोरी

भारतातील गुन्ह्यांसाठी ‘वॉन्टेड’ मात्र परदेशात आश्रित असलेल्या संशयित गुन्हेगारांच्या घरवापसीचा मुद्दा याकूब मेमनच्या फाशीनंतर चर्चेत आला. शरणार्थी असूनही याकूबला फाशी देण्यात आली, त्यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्‍वास उडतो आहे, असेही फसवे चित्र मुस्लिम धर्मियांमध्ये रंगविले जात आहे. हाच मुद्दा पुढे करून संगितकार नदीम सैफी हा सुद्धा भारतात परतायला तयार नाही असा चुकिचा प्रचार होत आहे. नदीमचे उदाहरण देत असताना पाकिस्तानचा गायक अदनान सामी हा मात्र, भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्‍वास ठेवून भारताचे नागरिकत्व मागत आहे, याकडे कडवी मुस्लिम मंडळी कसे काय दुर्लक्ष करू शकते?

Tuesday, February 3, 2015

होम चिकित्सा केंद्र - तपोवन


पारोळा- अमळनेर रस्त्यावर पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन हे होम चिकित्सा केंद्र आहे. तेथे जैविक ऊर्जा, वैद्यकशास्त्र, कृषिशास्त्र आणि हवामानशास्त्र याचा वैदीक पद्धतीने अभ्यास व प्रचार- प्रसार केला जातो. अग्निहोत्राच्या माध्यमातून या शास्त्रांचा सुरेख संगम घालून निसर्गदायी झालेली मानवी जीवनशैली येथे अनुभवता येते. त्याच्या अनोखा प्रवास...
देशदूत शब्दगंधमधील मूळ लेख

http://deshdoot.com/enewspaper.php?region=Jalgaon&date=1359829800&id=50325

यू ट्यूब वरील क्लिप
https://www.youtube.com/watch?v=bI-AcBocmHA&list=UUdKzXMOjfaFRS1G2C189voA&index=1


तपोवन हे फार्म हाऊस नाही. सहलीचे पर्यटन स्थळ नाही. पार्टी करण्याची जागा मुळीच नाही. तपोवन हे निसर्गाशी नाते जोडून निसर्गदायी मानवी जीवनशैली तयार करणारे केंद्र आहे. वेद- पुराणांचा अभ्यास करून त्यातील शास्त्र शुद्ध संकल्पनांचा आजही पाठपुरावा करीत त्याचे महत्व पटवून देणारी जीवनशाळा आहे.
होम- हवनचे महत्व ते काय?  असा प्रश्न अनेकांना पडतो. होम केल्याने पाऊस पडतो का? कोणाचे आरोग्य सुधारते का? होमातील आहुतीमुळे निर्माण होणार्‍या ज्वाला, भस्म व धुराशी मानवाच्या जीवनशैलीचा काय संबंध? असे प्रश्न विज्ञानवादी काही चिकित्सक विचारतात. या प्रश्नांच्या मागे बर्‍याचवेळा कुचेष्टा असते. मात्र, विज्ञानाच्या कसोटीवर जिज्ञासू म्हणून प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तपोवनमध्ये एकदा गेलेच पाहिजे.
पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन आहे. धुळे येथील  कै. वसंतराव परांजपे हे अक्कलकोटचे सदगुरू गजानन महाराज यांच्या संपर्कात होते. 1985 च्या सुमारास गजानन महाराजांचे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नापिंप्री (ता. पारोळा) येथे आगमन झाले. तेथे गजानन महाराजांनी त्यांना परिसरात अग्निहोत्राचा प्रचार- प्रसार करण्याचा संदेश दिला. महाराजांचा आदेश मानून परांजपे यांनी अग्निहोत्राच्या प्रचार- प्रसाराचे काम देशभर सुरू केले. महाराष्ट्रातील एक केंद्र रत्नापिंप्री येथेही सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामस्थांच्या व काही सहकार्‍यांच्या मार्फत त्यांनी तपोवनची रचना 1995 मध्ये केली.  प्रत्यक्ष 1997 पासून केंद्राचे काम सुरू झाले. आज या केंद्राला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. सुमारे एक तपाच्या वाटचालीत तपोवनची ओळख संपूर्ण जगात होम थेरपी सेंटर म्हणून झाली आहे. या केंद्राचे व्यवस्थापन कै. परांजपे यांचे पूत्र श्री. अभय परांजपे (रा. धुळे) पाहतात. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील ब्रुस जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी ऍन गॉडफ्रे यांचाही या केंद्राच्या व्यवस्थापनात सहभाग राहीला आहे. या दोघांनी अग्निहोत्र प्रचार- प्रसारासाठी आपले आयुष्यच समर्पित केले आहे.
तपोवनची रचना निसर्गशेतीचे सूत्र घेवून केली गेली. त्यामुळे येथील माळरानाच्या जमिनीवर निसर्ग फुलविण्याचे आव्हान वेदशास्त्राला आणि त्याच्या अनुयायांच्या समोर होते. रत्नापिंप्रीच्या काही ग्रामस्थांना हा प्रकल्प वेडेपणाचा वाटत होता. काही जण सोबत होते तर काही विरोधात होते. काहीशा खडकाळ, रुक्ष आणि निकस वाटणार्‍या जमिनीवर काय होणार?  याची उत्सुकता सार्‍यांना होती. आजचे तपोवन पाहिले म्हणजे काळाच्या प्रवाहात किती अनंत अडचणींचा सामना करावा लागला असेल याची कल्पना येते.
आज या खडकाळ जमिनीवर निसर्गशेती फुलली आहे. तालुक्यातील इतर ठिकाणापेक्षा या भागात पर्जन्याचे प्रमाण वाढले आहे. फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला, रोपवाटीका, वनौषधी, धान्यपिके, हळद असे अनेक शेती उत्पादन येथे पाहता येते. या सार्‍याची उगवण आणि वाढ काढणी ही निसर्गशेती किंवा सेंद्रीय शेती पद्धतीनुसार केली जाते. ब्रुस आणि ऍन यांनी या सार्‍या स्वप्नवत रचनेच्या वास्तवपूर्तीसाठी आयुष्याची 15-16 वर्षे दिली.
शेतीसाठी पाणी हवे. जमिन खडकाळ असल्यामुळे पाण्याची अडचण होतीच. भविष्यातील आव्हान लक्षात घेवून तपोवन परिसरात पर्जन्य संधारणाचा कार्यक्रमही राबविण्यात आला. शेतातून वाहणार्‍या नाल्यातील पाण्याचे नियोजन केले गेले. कोरड्या विहारी भरल्या. नाल्यात जास्तकाळ पाणी टीकून राहू लागले. शेतीला पाणी मिळाले. निसर्गशेतीच्या संकल्पनेतील प्रयोगांनी हळूहळू परिसर बहरत गेला.
तपोवनचा मुख्य हेतू अग्निहोत्र शेती पद्धतीचा प्रचार- प्रसार हाच होता. त्यामुळे 25 मार्च 2001 पासून येथे अखंड महामृत्यूंजय मंत्र जागरचा प्रयोग सुरू झाला. तेथे सूर्यादय आणि सुर्यास्ताच्या समयपासून अखंड अग्रनिहोत्र सुरू असते.
निसर्गशेतीच्या सोबत मानवी जीवनशेलीही निसर्गदायी कशी होईल?  याचाही विचार करण्यात आला. त्यामुळे होम- हवन तंत्र शिकण्यासोबतच मातीच्या घरांची निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय पद्धतीने बी- बियाणे निर्मिती, रोपांची निर्मिती हेही प्रयोग सुरू झाले. होम हवनसाठी गाईचे तूप लागते म्हणून गोशाळा सुरू झाली.  आज गोशाळेत 125 वर गाई असून तेथे दुधासह गावराण तूप व ताकाची मुबलक उपलब्धता आहे. यापैकी कोणत्याही उत्पानाची विक्री मात्र केली जात नाही.
तपोवनातील सेंद्रीयशेती व्यवस्थापन अनुभवताना एक बाब लक्षात येते, ती म्हणजे परिसरात जास्वंदाची खूप झाडे आहेत. विविध रंगी फुले नेहमी ताजी, टवटवीत दिसतात. यामागील कारण विचारले असता सांगण्यात येते की, जास्वंदावर मावा, बुरशी आदी रोगांचा प्रादुर्भाव सहज होतो. त्यामुळे झाड लवकर नष्ट होते. तपोवन परिसरात कोणत्याही रासायनिक किटनाशकांचा किंवा खतांचा वापर होत नसल्यामुळे येथे जास्वंद नैसर्गिक पद्धतीने वाढले असून आजपर्यंत एकही झाड कशामुळेही नष्ट झालेले नाही. हीच बाब तपोवनमधील रोपवाटीकेतील पोरनिर्मितीला लागू होते. तेथील भाजापालाही टवटवीत असतो. मध्यंतरी कोरफड व हळद लागवडीचा प्रयोग ही करण्यात आला.

तपावेनच्या जागेची निवड कशासाठी ?
तपोवनच्या रचनेसाठी सध्याची जागा का निवडली या विषयी सांगण्यात येते की, 1985 च्या सुमारास रत्नापिंप्री येथे मंदिरातील मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सदगुरू गजानन महाराज यांचे रत्नापिंप्रीला आगमन झाले होते. तेव्हा त्यांना येथील तप भूमीविषयी साक्षाःत्कार झाला. त्यांच्या प्रेरणेतून शिवधाम मंदिर आणि तपोवनची निर्मिती करण्यात आली. या भागात प्राचिनकाळी ऋषीमुनींचा वास होता. नेहमी जप- तप, होम- हवन सुरू असायचे. तपोवनमध्ये सध्या कोणतेही खोदकाम केले तर तेथे भस्म आढळून येते. म्हणूनच परांजपे यांनी केंद्राला तपोवन हेच नाव दिले. आज तपोवनमधील निसर्गदायी शेतीची माहिती घेण्यासाठी 50 हून अधिक देशांचे हजारो प्रतिनिधी येवून गेले आहेत. ऑस्टे्रलिया, जर्मनी, अमेरिका, चिली या देशांमध्ये अखंड अग्निहोत्र केंद्र सुरू आहेत. परांजपे यांना 14 भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी समाजाला अत्यंत प्रभावीपणे आणि सप्रयोग अग्निहोत्राची गरज समजावून दिली. सन 2004 मध्ये तपोवनमध्ये बार्शीच्या श्रीयोगीदान वेद, विज्ञान आश्रमातर्फे पर्जन्य जाग झाला. त्यानंतरच्या अनुभवातून परिसरात दरवर्षी सरासरी पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

काय आहे अग्निहोत्र?
तपोवनमध्ये अखंड अग्निहोत्र सुरू असते. कर्मकांडाचा भाग समजली जाणारी ही पद्धत वैदिक विधीतील विज्ञान प्रक्रिया आहे.  अग्निहोत्र म्हणजे ठिक समयी पवित्र पद्धतीने प्रज्वलित केलेल्या अग्नित आहुती देणे. अग्निहोत्र हे उलट्या पिरामीड आकाराच्या ताम्र पात्रात केले जाते. यात तांदूळ (अक्षत), गायीचे तूप, गाईच्या शेणापासून केलेल्या गोवर्‍या याची महा मृत्यूंजय मंत्रोच्चारात आहुती दिली जाते. यासाठी सूर्यादय व सुर्यास्ताची अचूक वेळ साधवी लागते.
अग्निहोत्र सुरू असताना ताम्रपात्राच्या भोवती प्रंचड चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. ही पवित्र ऊर्जा परिसरातील विघातक ऊर्जा (रेडीएशनचा प्रभाव असलेली किरणे) निष्क्रिय करते. हवनासाठी वापरलेल्या गाईचे तूप, गोवर्‍या व अक्षत यामुळे औषधी धूर निर्माण होतो. तो मानवी आरोग्यासाठी हितकारक असतो. त्यामुळे श्वसन विकार दूर होतात.
अग्निहोत्रामुळे मेंदुतील पेशी प्रसन्न होवून मज्जासंस्था कार्यप्रवण होते. रक्त शुद्धी होते. त्वचा चैतन्यदायी होते. फुफ्फूस, हृदय, रक्तप्रवाह यावर अप्रत्यक्ष परिणाम होतो. असाच रिणाम परिसरातील वृक्ष, वेली, झुडुपांवरही होतो.

अग्निहोत्र करताना मंत्र कसे म्हणावेत?
अग्निहोत्र दिवसातून दोन वेळा करतात. ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळेवर करावे. यासाठी तपोवनमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे अक्षांश व रेखांशनुसार सूर्योदय व सूर्यास्ताचे वेळापत्रक उपलब्ध आहे. अग्निहोत्र करताना पुढील मंत्र म्हणावेत-
सूर्योदयाच्यावेळी-
सूर्याय स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत पहिला भाग अग्नित टाकावा)
सूर्याय इदम्‌ न मम
प्रजापतये स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत दुसरा भाग अग्नित टाकावा)
प्रजापतये इदम्‌ न मम
सूर्यास्ताच्यावेळी-
अग्नये स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत पहिला भाग अग्नित टाकावा)
अग्नये  इदम्‌ न मम
प्रजापतये स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत दुसरा भाग अग्नित टाकावा)
प्रजापतये इदम्‌ न मम

तपोवनातील गोधडी शिवण केंद्र
ब्रुस आणि ऍन यांनी तपोवनात काम करीत असताना परिसरातील महिलांना गोधडी शिवण्याचा एक अनोखा रोजगार दिला. मॅगसेस पुरस्कार विजेत्या व अलिकडे पद्मश्री मिळालेल्या बहादरपूरच्या खानदेशकन्या निलीमा मिश्रा यांच्या बचत गटांच्या माध्यमातून ही गोधडी देशाच्या बाहेर सातासमुद्रापार पोहचली.
ऍन या फॅशन डिझाईनर आहेत. त्यांनी कारखान्यातील चिंधी कापडाचा उपयोग करुन गोधडी, पर्स आणि महिलांचे कपडे शिवण्याचे काम सुरू केले. महिलांना शिवणकाम कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. शिवणकामाचे डिझाईन दिले जाते. त्याप्रमाणे महिला शिवणकाम करतात. आपल्याकडे ग्रामीण भागात जुन्या कपड्यांची गोधडी शिवतात. या केंद्रीतील गोधडी नव्या कपड्यांची असते. जुन्या गोधडीत उब मिळावी म्हणून पुरण (जुन्या कापडाची भर असते). तो प्रकार या गोधडीत नसतो. विविध कापडांचे तुकडे वापरून तयार होणारी गोधडी लक्ष वेधून घेते. परदेशात स्थायिक भारतीय ती खरेदी करतात. त्वचेशी संबंधीत विकार असलेले ती घेतात. काही दानशूर मंडळी या गोधडींचे गरजूना वाटप करतात. सातासमुद्रापार गेलेल्या गोधडीची कहाणी वेगळीच आहे.

तपोवनसाठी संपर्क
तपोवनचे व्यवस्थापक म्हणून सध्या संजय पाटील (मो. क्र. 9923552154) पाहतात. केंद्राची शेत जमिन 22 एकर आहे. या केंद्राचे व्यवस्थापन फाईव्ह फोल्ड पाथ मिशन या ट्रस्टच्या माध्यमातून केले जाते. या ट्रस्टसाठी कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही. येथे माहिती घेण्यासाठी येणारे साधक देणगी स्वरुपात मदत करतात.

इंटरनेट वापरणा-यांचे ""123456'' वर प्रेम

इंटरनेट'च्या मायाजालमध्ये प्रवेश व त्याच्या वापरासाठी पासवर्ड (सांकेतांक) हा महत्त्वाचा घटक. त्याच्याशिवाय संगणकीय किंवा नेट यंत्रणा हाताळता येत नाही. जेवढी माणसं त्यापेक्षा जास्त त्यांचे पासवर्ड. इंटरनेट वापरणारे कोट्यवधी ग्राहक आणि त्यांचे कोट्यवधी सांकेतांक. मात्र, यापैकी लाखो लोकांचे सांकेतांक हे सारखेच तयार होत असल्याचे लक्षात येत आहे. सोपा आणि लक्षात राहणारा "पासवर्ड' हवा या हेतूने तयार केले जाणारे अंक- अक्षर समुह नेहमीच्या वापरातील असल्याचे जगभर केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. जगभरात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक ग्राहक "123456' या अंक समुहाचा पासवर्ड म्हणून वापर करतात असे लक्षात आले आहे. त्याची ही दखल...


इंटरनेटचा वापर व्यक्तीगत, संस्था किंवा समुह पातळीवर झपाट्याने वाढतो आहे. जगभराची लोकसंख्या सन 2008 अखेरीस 610 कोटी 29 हजार एवढी गृहीत धरल्यास त्यापैकी158 कोटी 15 लाख 71 हजार लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणानोंदले गेले आहे. इंटरनेट वर्ल्ड स्टॅट डॉट कॉमतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 41.1 टक्के इंटरनेट ग्राहक हे आशिया खंडातील आणि उर्वरित 58.9 टक्के हे उर्वरित खंडातील आहेत. भारताचा समावेश आशिया खंडात असून त्यात इंटरनेटचा सार्वधिक वापर असणाऱ्या टॉपच्या दहा देशांमध्ये प्रथम क्रमांकावर चीन (लोकसंख्येच्या 22 टक्के वापर), द्वितीय क्रमांकावर जपान (73.8 टक्के वापर) आणि तृतिय क्रमांकावर भारत (अवघा 7.1 टक्के वापर) यांचा समावेश आहे. त्याखालोखाल इतर देश येतात. हॉंगकॉंग, साऊथ कोरिया, मलेशिया, सिंगापूर, तैवान, आदी ठिकाणचे इंटनेट वापराची टक्कवारी 69 ते 70 टक्के आहे. ही सगळी आकडेवारी लक्षात घेता इंटरनेट हे कशा प्रकारे वाढणारे मायाजाल आहे ? त्याची कल्पना येते.

इंटरनेट वापरासाठी मुलभूत गरज अत्याधुनिक प्रणालीचा संगणक आणि त्या सोबत ब्रॉडबॅंण्ड कनेक्‍शन ही असते. त्यानंतर इंटरनेटवरील मायाजालात प्रवेशासाठी कुठल्यातरी सर्च इंजिनचे (गुगल, याहू, रेडिफ या सारख्या) सभासद व्हावेलागते. इंटरनेट कायम हाताळणीसाठी (साईन इन करण्यासाठी) वापरणाऱ्याचे नाव (यूजर्सनेम)व सांकेतांकची (पासवर्ड) रचना करावी लागते. अशा प्रकारची नोंदणी करणे म्हणजेच इंटरनेटवरील मुसाफिरीस प्रारंभ करमे होय. इंटरनेट वापरणाऱ्यांची जगभरातील आकडेवारी जेव्हा आपण पाहतो तेव्हा वाटते की, संबंधितांचे सांकेतांक किता विभिन्न रचनेचे राहत असतील ? तसे असतेही. सांकेतांक तयार करण्यासाठी 1 ते 0 अंकांचा आणि ए टू झेड या अक्षरांचा तसेच की बोर्डवरील काही चिन्हांचाही वापर करता येतो. त्यामुळे सांकेतांक तयार करण्याच्या शक्‍यशक्‍यता वाढतात. परंतु, सांकेतांक सोपा असावा सहज लक्षात असणारा असावा या हेतूने केलेली अक्षरांची रचना सर्वसमान्य होवू पाहत आहे. त्यातूनच संगणकीय सेवा- सुविधेत गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींची संख्या वाढते आहे.

"व्हाट्‌समायपास डॉट कॉम' या संस्थेने पासवर्ड रचनेच्या संदर्भात 34 हजार इंटरनेट ग्राहकांच्या केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. त्यातील पहिला निष्कर्ष असा की, "123456' हा शब्द समुह सांकेतांक म्हणून वापरणाऱ्यांची जगभरात सर्वाधिक संख्या आहे. या संस्थेने जगभरातील सांकेतांक नोंदणीचा अभ्यास करुन 500 सांकेतांकांची यादी तयार केली आहे. जगभरात कोणत्याही नव्या 50 ग्राहकांचा गट जेव्हा इंटनेटचा वापर सुरू करतो, त्यापैकी 20 ग्राहक या 500 सांकेतांकमधील अक्षरांची रचना वापरतात, असा निष्कर्ष आहे. यात 123456 ही रचना प्रथम क्रमांकवर, पीएएसएसडब्लूओआरडी (पासवर्ड) दुसऱ्या क्रमांकवर, 12345678 ही रचना तिसऱ्या क्रमांकवर, 1234 ही रचना चौथ्या क्रमांकवर, पीयूएसएसवाय ही रचना पाचव्या क्रमांकवर आणि पुन्हा 12345 ही अक्षर समुह रचना सहाव्या क्रमांकवर आहे.

या शिवाय एनसीसी1701 (स्टारशिप जहाजाचा क्रमांक), टीएचएक्‍स 1138 (जॉर्ज लुकासचा पहिल्या चित्रपटाचे नाव), क्‍यूएझेडडब्लूएसएक्‍स (संगणकावरील की बोर्डची रचना), 666666 (सिक्‍स सिक्‍सेस), 7777777 (सेव्हन सेव्हन्स) या अक्षर समुहासह बॅटमन, बॉण्ड007, कोकाकोला, पासवर्ड1, एबीसी123, मायस्पेस1, ब्लींक182 या शब्द समुहांचाही वापर मोठ्या प्रमाणात सांकेतांक म्हणून होताना दिसतो.

हे सर्वेक्षण करताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे, हौसे खातर इंटरनेटवर खाते सुरू करणारी अनेक मंडळीनंतर यूजर्सनेम आणि पासवर्डही विसरतात. सुमारे 28हजार ग्राहकांचे पासवर्ड विस्मृतीत गेल्याचे दिसून आले. यातील 16 टक्के लोकांनी त्याचे स्वतःचे नाव (फर्स्टनेम), 14 टक्के लोकांनी की बोर्डवरील अक्षरांचा समुह सांकेतांक म्हणून वापरला होता. याशिवाय लक्षात राहण्यासाठी सोपे म्हणून टीव्हीवर सादर होणाऱ्या लहानमुलांच्या कार्यक्रमांची नावेही काहींनी पासवर्ड म्हणून दिलेली होती. त्यात पोकमॉन, मॅट्रीक्‍स, आयर्नमॅन या शब्दांचा समुह होता.

इंटरनेटवर कोणत्याही सर्च इंजिनवर खाते सुरू करताना द्यावा लागणारा सांकेतांक किमान आठ अंक- अक्षर किंवा त्या सोबत चिन्हांचा समुह असावा लागतो. खरेतर हा सांकेतांक अर्थपूर्ण शब्द असावा किंवा विशिष्ट क्रमाची अंक लिपी असावी असे नाही. मात्र, बरेच ग्राहक सोपा आणि लक्षात राहणारा शब्दच सांकेतांक म्हणून वापरतात. उपरोक्त सर्वेक्षणाच्या दरम्यान बहुतांश ग्राहकांनी आठपेक्षाही कमी अंक- अक्षरांचा वापर केलला दिसला. केवळ एका ग्राहकाचा सांकेतांक 32 अंक- अक्षरांचा समुह होता. काही जणांनी "आय डोन्ट केअर', "व्हाटेव्हर', "यस' आणि "नो' चाही वापर केल्याचे आढळून आले.

पासवर्डला पर्यायी शब्द "वाचवर्ड' हाही आहे. अलिकडे कार्यालयाच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या संगणकीय प्रणालीत संगणक सुरू करण्यासाठी, संगणकाला लॅन- व्हॅन प्रणालीत जोडण्यासाठी, संगणकातील विशिष्ट प्रोग्राम (उदा. वेबकॅमेरा) सुरू करण्यासाठी, मोबाईल फोनसाठी, केबल टीव्हीच्या प्रसारणासाठी (डिकोडर्स), एटीएमसाठी सांकेतांक लागतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे सांकेतांक तयार करण्यासाठी निरुत्साह दाखविणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे उपरोक्त सर्व प्रणालीत एकच सर्वमान्य (युनिक) सांकेतांक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.

पासवर्ड तयार कण्याची संकल्पनाच मुळात अनेकांच्या लक्षात येत नाही. केवळ अंक, अक्षर किंवा चिन्हांचा वापर म्हणजे सांकेतांक नाही. तो तयार करताना, एखाद्या म्हणीचा, वाक्‍प्रचाराचा, सुभाषिताचा, कवितेच्या ओळीचाही विचार करायला हवा. यातील शब्दांचे अद्याक्षर किंवा त्यातील विशिष्ट शब्दांचा वापर सांकेतांक म्हणून करता येतो. हे करीत असताना किबोर्डवरील कॅपिटल लेटर्स (इंग्रजी लिपीतील मोठे अक्षर) आणि स्मॉल लेटर्स (लहान अक्षर) यांचाही कल्पकतेने वापर करता येतो. अशा पद्धतीने केलेला सांकेतांक सहजासहजी इतर कोणाला समजू शकत नाही. दरमहा, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी सांकेतांक बदलावा असेही सांगितले जाते. मात्र, येथे एक लक्षवेधी बाब नमुद करावी लागेल ती हीच की, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या बिल गेट्‌स यांनी अद्याप एकदाही पासवर्ड बदललेला नाही.

पासवर्डची कल्पना आली कशी ?

रोमन साम्राज्यात सम्राटाच्या निवासाच्या तंबू किंवा प्रासादाच्या भोवती पायदळ आणि घोडदळातील शिपाई रोज गस्त घालायचे. या दोन्ही दलातील रोज नव्या शिपायांची साठी निवड व्हायची. एकाच्यानंतर दुसऱ्या कोणाची गस्तसाठी निवड झाली आहे, हे कळविण्यासाठी लाकडाच्या चिन्हांचा वापर केला जायचा. हे चिन्ह कमांडरच्या उपस्थितीत एकाकडून दुसऱ्याला दिले जायचे. ते दोघांनाच माहित असायचे. तो शब्द होता "वाचवर्ड' नंतर झाला "पासवर्ड'

सदराशी संबंध असेला गोष्ट
कॉर्नेल विद्यापिठातील रॉबर्ट मॉरिस या विद्यार्थाने संगणकासाठी 2 नोव्हेंबर 1988 ला एक प्रोग्राम तयार केला. त्याचे नाव वर्म (किडा) असे होते. हा वर्म संगणकात स्वतःच्या प्रती तयार करुन त्याचा विस्तार करीत असे. त्याने हा प्रोग्राम इंटरनेटवर घुसवला. त्यानंतर वर्मने स्वतःच्या असंख्य प्रती तयार करुन अमेरिकेतील प्रत्येक संगणक क्रॅश केला. नंतर मॉरिस यांने या वर्मला नष्ट कसे करावे याचाही प्रोग्राम पाठविला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाल नाही. या गुन्ह्याबद्दल मॉरिसला नंतर चारवर्षे कैद आणि 10050 डॉलर दंड झाला.

शरददादांची भावकी !

नेत्यांनाही अडचणीत आले. त्यापैकी "दखल' घ्यावी लागेल ती मंत्री डॉ. विजय गावित यांचे बंधु शरद गावित यांनी "बहुजन समाजवादी पक्षा'तर्फे केलेल्या उमेदवारीची. श्री. शरद गावित एवढे फोकसमध्ये नव्हतेच. मात्र, मंत्र्यांचे भाऊ आणि कॉंग्रेस विरोधातील उमेदवारी यामुळे ते चर्चेत आले आहेत...

लोकसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागा वाटपाचा घोळ अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरू होता. नंदुरबारची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावी म्हणून रस्सीखेच झाली. रावेरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला नको असतानाही कॉंग्रेसने बहाल केली. त्यामुळे दोन्ही ठीकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते- कार्यकर्त्यांचे संबंध ताणले गेले. अखेर नंदुरबार कॉंग्रेसकडेच राहणार म्हटल्यावर डॉ. गावीत यांचे बंधू श्री. शरद गावीत यांनी "बसपा' तर्फे अर्ज भरला. पक्षाचे प्रदेशस्तरावरील नेते श्री. ईश्वरलाल जैन यांनी श्री. शरद यांना समजावण्याचा प्रयत्न केला. "मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य नाही. त्यामुळे इतरांचे ऐकण्याचा प्रश्‍न नाही' असे म्हणत श्री. शरद गावित यांनी अर्ज कायम ठेवला. "भाऊ ऐकत नाही. त्यामुळे मी आघाडीचेच काम करेन' असे डॉ. गावित यांनी अखेर जाहीर केले. त्यानंतरही कॉंग्रेस नेत्यांचा आणि डॉ. गावित यांचा "सांधा' या मतदार संघात जुळलेला नाही. श्री. शरद गावित यांच्या रुपाने रावेर आणि जळगाव मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोघा उमेदवारांना ग्रहण लागण्याची शक्‍यता आहे.
या सगळ्या घटनां- घडामोडीत केंद्रस्थानी राहिलेले श्री. शरद गावित हे कोण आहेत ? त्याचा राजकारणाशी काय संबंध ? मंत्री डॉ. गावित यांच्या कार्यव्यवस्थापनात त्यांचा सहभाग काय ? असे अनेक प्रश्‍न नंतर खानदेशातील तमाम मतदारांच्या मनांत निर्माण झाले.
मंत्री डॉ. गावित यांचे बंधू अशी ओळख असलेल्या श्री. शरद गावित यांना नंदुरबार जिल्हा पातळीवर "शरददादा' म्हणून ओळखले जाते. डॉ. गावित यांच्या मार्फत राबवायच्या विविध योजनांचे सीत्रसंचालन श्री. शरद गावित हेच करतात.
नटावद (ता. नंदुरबार) येथील कृष्णा गावित या शिक्षकाच्या कुटुंबात शरद यांचा जन्म झाला. गावित परिवार प्रारंभा पासून राजकारणाकडे ओढला गेलेला. त्यांचे काका तुकाराम हुरजी गावित कॉंग्रेसचे खासदार होते. त्यानंतर कृष्णा गावित यांनीही विधानसभेत जाण्याचे प्रयत्न केले. त्यात अपयश आले. मात्र, 1995 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रस्थापितांना विरोध करीत डॉ. विजय गावित हे अपक्ष म्हणून निवडणून आले. त्याअगोदर ते औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेव्हा पासून आजपर्यंत यशाची एक एक शिडी चढत जाणाऱ्या डॉ. गावित यांची कारकिर्द यशस्वी ठरली आहे.
डॉ. गावित हे प्रथम राज्यमंत्री, नंतर कॅबिनेटमंत्री व त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्या कामाची व्याप्ती नंदुरबार मतदार संघ, जिल्हा व राज्यात वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांना विश्‍वासू सहकाऱ्याची गरज भासू लागली. मंत्रालयात कक्ष अधिकारी असलेले बंधू राजेंद्र गावित प्रशासकीय पातळीवर त्यांना मदत करू लागले. मंत्री डॉ. गावित यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांची अधिकृत नियुक्‍ती झाली. त्यांना घरातलाच एक विश्‍वासू सहकारी मिळाला. मुंबईतील, मंत्रालयातील कामे होऊ लागली. प्रशासनातील अडचणी दूर झाल्या. हे काम करीत असतांनाच राजेंद्र गावित यांनी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या शाखा वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले. या सोसायटीच्या सुमारे 36 वर शाखा आहेत.
डॉ. गावित यांचे दुसरे बंधू प्रकाश गावित हे शेती कामाकडे लक्ष देत होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केही जिल्हा परिषद सदस्य झाले. दुसरे बंधू संजय गावित हे नाशिक पोलिस विभागात उपनिरीक्षक आहेत. प्रत्येकाची अशी स्वतंत्र रचना असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संपर्कासाठी अजून सहकारी अपेक्षीत होता. राज्यपरिवहन महामंडळाच्या सेवेत लेखा लिपिक असलेले श्री. शरद यांनी पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली. त्यावेळी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. या निवडणूकीत त्यांना अपयश आले. त्यांच्या राजीनाम्या समवेत त्यांच्या पत्नीनेही आरोग्य विभागातील सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर श्री. शरद यांनी डॉ. गावित यांना सहकार्य करण्यात लक्ष घातले. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, सामुहीक लाभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना त्यांनी तळागाळा पर्यंत पोहोचवल्या.
श्री. शरद गावित यांना ही कामे करताना लोकांशी संपर्काची विशिष्ट शैली सापडली. ज्या गावात योजना द्याची आहे तेथे जावून ते चर्चा करतात. योग्य लाभार्थ्यांची निवड करतात. सामुहीक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचा जनतेला अधिकाधिक लाभमिळावा यासाठी तळागाळापर्यंत प्रय्तन करतात. लोकांचे अर्ज घेणे, आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे ही कामे त्या त्या गावातील स्थानिक सहकारी कार्यकर्त्यांकडून करुन घेतात. आदिवासी प्रकल्प विभागातून त्याला मंजूरी मिळवतात. त्यानंतर लाभात दिल्या जाणाऱ्या गायी, म्हैस, बकरी गट, विविध यंत्र आदी स्वत: घेऊन जातात आणि संबंधितांपर्यंत त्या पोहोचवतात. या प्रत्येक टप्प्यात त्यांचा स्वत:चा संपर्क प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी असतो. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ डॉ. गावित यांच्यापेक्षा श्री. शरद गावित यांनीच मिळवून दिला, अशी प्रतिमा ग्रामीण भागात तयार झाली आहे. कोणतेही काम करण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला श्री. शरद गावित यांची भेट घ्यावी लागते. त्यांनी हिरवा कंदिल दाखविला तर काम मार्गी लागते. व्यक्तिगत लाभाची योजना असो की सामुहीक कामाचे उद्‌घाटन असो.
आतातर जिल्हा परिषदेत डॉ. गावित यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी गावित अध्यक्षा आहेत. त्यामुळे तेथील योजनांचाही लाभ आता श्री. सरद गावित यांच्या मार्फतच लोकांच्यापर्यंत पोटत आहे. सुमारे नऊ वर्षापूर्वी नंदुरबार नगर पालिकेत सत्तेवरून वाद होत होते. दोन गट निर्माण झाले होते. त्यात डॉ. गावित यांचे शालक जगदीश वळवी (चोपडा, जि. जळगाव येथील रहिवासी) हे काही काळ नंदुरबार येथे वास्तव्यास होते. ते पालिकेचे सदस्य झाले. डॉ. गावित यांच्या विरोधी गट असलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या सहकार्याने ते नगराध्यक्षही झाले होते. डॉ. गावित यांचे सासरे रमेश पान्या वळवी हे माजी गृहराज्यमंत्री आहेत.
डॉ. गावित यांचे काम सांभाळणाऱ्या श्री. शरद गावित यांच्या संपत्तीचा तपशिलही लक्षवेधी आहे. त्यांच्याकडे रोकड 48 हजार रुपये, पत्नीकडे रोकड 20 हजार रुपये, मुलगा राजश्रीच्या नावावर 3 आणि जयश्रीच्या नावावर 2 दोन हजार रुपये बॅंकेत आहेत. युनियन बॅंकेत सात लाख 12 हजार, डीडीसीसी बॅंकेच्या धानोरा शाखेत 17 हजार 144, जयकृष्ण पतपेढीत 1 लाख 59 हजार रुपयांच्या टेवी आहेत. नटावद येथे 5.32 हेक्‍टर, नटावद येथेच 3. 2 हेक्‍टर, कोठली येते 0.80 हेक्‍टर, विठ्याफळी येथे 0.80 हेक्‍टर शेत जमिन आहे. तोरणमाळ येथे 128 चौमी, कोठली येथे 36000 चौफु, नागाई नगर 208 चौमी, विमल प्लाझा दुकानमध्ये 20.84 मीटरचे दुकान आहेय त्यांच्यानावावर युनियन बॅंकचे कर्ज 3 लाख 85 हजार, व्यक्तिगतकर्ज 6 लाख रुपये आहे.


असे आहेत शरद गावित

नाव : शरद कृष्णराव गावित
जन्म तारीख : 11 एप्रिल 1963
पत्ता : नटावद (ता. जि. नंदुरबार)
जात : हिंदू भिल (अनुसूचित जमाती)
शिक्षण : बी.ए. मानसशास्त्र - प्रथम श्रेणी (मार्च 1987)
एम. ए. इतिहास - ऍपियर (मार्च 1989).
विविध पदे - माजी अध्यक्ष - आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद (ता. जि. नंदुरबार),
संचालक - आदिवासी युवक क्रिडा विकास मंडळ, नटावद (ता. जि. नंदुरबार), माजी अध्यक्ष - प्रकल्पस्तरीय समिती, नंदुरबार.

दखल
सोमवार
ता. 13 एप्रिल 2007 साठी